आठवणीची शिदोरी
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणासाठी घरावर तुळशीपत्र ठेऊन निधड्या छातीने संघर्ष करणारे भीष्माचार्य आ.एस.एम. देशमुख यांचा आज वाढदिवस.
एस.एम. यांच्या रूपाने राज्यातील पत्रकारांना समर्थ नेतृत्व लाभले. सर्व साधारण खेडयातील पत्रकारांपासून ते शहरातील पत्रकारांपर्यंत सर्वांशी त्यांचे जीवाभावाचे नाते आहे. केवळ एक रिंग वाजल्यानंतर लगेच मोबाईल रिसिव्ह करुन बोलणारे व प्रत्येकाचे समाधान करणारे हे अजब व्यक्तीमत्व. कुटुंबाला दुय्यम स्थान देऊन संघटनेला तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे एस.एम. महाराष्ट्राने वेळी वेळी अनुभवले आहेत.
स्पष्टवक्तेपणा, रोखठोक भुमिका ही त्यांची विशेष खासीयत. लाळघोटेपणा आणि लांगून चालन या गोष्टी उभ्या आयुष्यात त्यांना शिवल्या नाहीत. तत्वनिष्ठतेचा करारी बाणा त्यांच्या स्वभावाचे वेगळे वैशिष्टय आहे.
सर्व सुख सोई पायावर लोळण घेत असताना केवळ संघटनेच्या हितासाठी दै. कृषीवलचे संपादकपद त्यांनी केवळ पाच मिनिटात सोडले. असा स्वाभीमान आणि मराठी पत्रकार परिषदेची उर्मी अंगात बाळगायला जीगर लागते.
पत्रकार संरक्षण कायदा असो, पेन्शन, अधिस्विकृती, विमायोजना असा असंख्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एस.एम. नावाचा हा झंझावात महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात आश्वासक होतो. पायात भिंगरी बांधल्यागत एस.एम. चांदयापासून बांदयापर्यंत पिंजून काढतात. त्यांच्यातील या उर्जेचे माझ्या सारख्या मध्यम वयातील पत्रकाराला नवलच वाटते.
एस.एम. यांच्या नेतृत्वामुळे आज राज्यातील पत्रकारांना आत्मविश्वासाचे मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे आणि तमाम पत्रकारांचे ऋणानुबंध थोरल्या आणि धाकटया भावासारखे आहेत.
महाराष्ट्रात अस एक ही गाव नाही जिथे एस.एम. यांच नाव नाही. त्यांच्या संघटन कौशल्याची ही पावती आहे. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारा एक परिवार महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. मराठवाडयाच्या मातीतील हे अस्सल सोनं असलेले हे व्यक्तीमत्व आज पत्रकरांचा मुकूटमणी आहे त्यामुळेच आज एस.एम. यांना सेलिब्रिटी पेक्षा मोठा दर्जा प्राप्त झाला आहे. एकादया कार्यक्रमात त्यांच्या सभोवली होणारी गर्दी आणि सेल्फीसाठी चाललेली चढाओढ पाहून भल्या भल्या राजकारणाऱ्यांच्या भुवया उंचावतात हे चित्र नेहमीच महाराष्ट्रात पहावयास मिळते.
एस.एम. यांना महाराष्ट्रात सर्वदूर प्रेम मिळत असले तरी त्यांच आणि नांदेडच नात आगळ वेगळ आहे. बहुदा लग्नानंतर दोन वर्षानंतर नांदेडला दै. लोकपत्र मध्ये वृत्त संपादक म्हणून रुजू झाले. कार्यकारी संपादक संतोष भाऊ महाजन यांच्यासह दै. तरुण भारत ची अख्खी टिम लोकपत्रमध्ये रुजू झाली.
माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी दै. लोकपत्रची सुरुवात केली होती.
रमेश राऊत, रवि चिंचोलकर, रजनीश जोशी, श्रीपाद सबनीस, धनंजय चिंचोलीकर, कोलिन पुरोहित, उन्मेश कुलकर्णी, गोपाळ कुलकर्णी, जयश्री कोष्टगांवकर, पद्मकुमार कारंजकर, विनोद कापसीकर आदी आणि मी असे सुरुवातीच्या काळात होतो. व्यवस्थापक राजा माने परभणीकर होते. वितरण व्यवस्थापक अनिल देशपांडे तर संजय न्यायाधीश व विजय दिवाण जाहीरात व्यवस्थापक होते. नंतरच्या काळात विजय जोशी, अनिकेत कुलकर्णी,श्याम जैन, दीपक शिंदे, देवानंद गरड, केशव घोणसे पाटील, संजय टाकळगव्हाण कर, प्रभाकर लोखंडे पाटील, अनंत कुसळे, कैलास खामकर असे अनेक जण लोकपत्र औरंगाबादला जाईपर्यंत कार्यरत होते. मा. संतोषभाऊ महाजन यांनी लवकरच लोकपत्र सोडले. सगळी धुरा एस.एम. यांच्या खांद्यावर आली.
कल्पक संपादक अशी त्यांची ख्याती होती. लोकपत्रची त्यांनी थेट वाचकांशी नाळ जोडली. औरंगाबाद, सोलापूर, लातूर,यवतमाळ, परभणी, विदर्भ अशा कितीतरी आवृत्या लोकपत्रच्या सुरु झाल्या. कै. अनिल कोकीळ हे देखील लोकपत्र मध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले.९५-९७ च्या काळात लोकपत्रने अंक विक्रीचा ५० हजारांचा पल्ला गाठला होता.
त्या काळात नक्षलवादी विजयकुमारचा धुमाकूळ सुरु होता. त्याची सनसनाटी मुलाखत त्या काळात प्रचंड गाजली होती. पत्रकार म्हणून आम्हा सर्वांच्या घडणघडणीत एस.एम. यांचा सिंहाचा वाटा होता. सकाळी ११ वाजता कार्यालयात आलेले एस.एम. रात्री १ वाजता घरी जात असत.
माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांची हत्या झाली. त्या रात्री सगळे संगणक बंद पडले.पेपर तर काढायचाच असे ठरऊन एस.एम. यांनी शक्कल लढविली. त्या रात्री रोटरिंग पेनने कै. प्रमोद दिवेकर, महंमद नासेर बदर हे आर्टिस्ट आणि मी असे आम्ही हाताने अंक अक्षरशः लिहून काढला. आणि सकाळी वाचकांच्या हाती अंक दिला. याचे सगळे श्रेय एस.एम. यांना जाते.
कै. अनंतराव भालेराव गेल्यानंतर एस.एम. यांनी श्रध्दांजलीपर अग्रलेख लिहिला होता. हे मृत्यू तुला अपवाद का नाही? या शिर्षकाचा अग्रलेख आजही वाचल्यानंतर डोळे पाणवतात.
एस.एम. यांच्या सहवासातील असे शेकडो प्रसंग आहेत. ज्यातून पत्रकारितेची मुल्य आणि बारकावे शिकता आले. कै. अनिल कोकीळ यांनी त्या काळात व्यवस्थापना विरोधात आंदोलन केले. भले भले त्या काळात दूर झाले पण एस.एम. त्यांच्या पाठीशी खंबीर होते.
देगलूरचा नविन वार्ताहर विवेक केरुरकर. त्याच्या परखड, वास्तवदर्शी बातम्यांमुळे अनेकांचा पोटशूळ उठला. देगलर बंदची हाक दिली. त्यावेळी पहिल्या पानावर विवेकचा फोटो टाकून आम्हाला यांचा अभिमान आहे. अशा शब्दात मोठी चौकट छापली.एका दया सामान्य पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एस.एम. सारखा संपादक आज सापडेल काय?
एस.एम. यांच अतूट नात नांदेडच्या मातीशी आहे. दै. लोकपत्र नंतर ते कोकणात दै. कृषीवल मध्ये गेले. तेथे गेल्यानंतर देखील नांदेडचे विलास ढवळे, श्याम निलंगेकर, रमेश चित्ते अशा कितीतरी जणांना त्यांनी बोलाऊन घेऊन कृषीवलमध्ये नोकरी मिळऊन दिली. त्यांच्यावर अतोनात प्रेम केले.
पत्रकारितेतील या तपस्वी दीपस्तंभास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच मंगल कामना.
🌹🌹🌹🌹
प्रकाश कांबळे
पत्रकार, नांदेड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here