चळवळीतून जन्मलेले दैनिक- कृषीवल
तब्बल सहा वर्षे चाललेला जगातील शेतकऱ्यांचा पहिला संप म्हणून अलिबाग तालुक्यातील चरीच्या संपाचा उल्लेख केला जातो.या संपामुळं जिल्हयातील शेतकरी संघटीत झाला,त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला.संप तब्बल सहा वर्षे चालला.पूर्वी जमिनीदारांच्या जमिनी शेतकरी खंडानं करायचे. शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबायचे आणि वर्ष अखेरीस त्यांच्या पदरात एकूण उत्पन्नाच्या 25 टक्के वाटाही मिळायचा नाही.हा वाटा वाढून मिळावा आणि खंडानं जमिनी घेताना जमिनदारांकडून ज्या जाचक अटी करारपत्रावर लिहून घेतल्या जायच्या ते बंद व्हावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती.अर्थातच मालकांना हे मान्य नव्हतं.त्यामुळं जमिनदारांच्या जमिनी कसायच्याच नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.परिणामतःचरी आणि आसपासच्या परिसरातील जमिनदारांच्या जमिनी सहा वर्षे तशाच पडून राहिल्या.संप ऑक्टोबर 1933 मध्ये सुरू झाला.1939मध्ये मोरारजीभाई देेसाईंच्या मध्यस्थीनंतर हा संप मिटला.
या संपामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले हे जरी खरे असले तरी यातून एक चांगली घटना घडली ती म्हणजे ‘कृषीवल’ची सुरूवात झाली.संप काळात रामभाऊ मंडलिक यांच्या ‘कुलाबा समाचार’मधून मालकांची बाजू आक्रमकपणे मांडली जायची.शेतकरी कसे चूकत आहेत हे सांगितलं जायचं.त्याला उत्तर देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शेतकऱ्यांकडे माध्यम नव्हते त्यामुळे ‘मालक सांगतात तेच खरं आणि शेतकरी जे करताहेत ते चुकीचं’ असा समज सर्वत्र पसरत होता.अशा अपप्रचारामुळं अस्वस्थ असलेले नारायण नागू पाटील हे गप्प बसले नाहीत.त्यांनी कुलाबा समाचारचा समाचार घेण्यासाठी 7 जून 1937 रोजी कृषीवलला जन्म दिला.त्यानंतर कुलाबा समाचार आणि कृषीवल यांच्यातील जुगलबंदी पुढे अनेक वर्षे चालत राहिली.कुलाबा समाचार आणि कृषीवलमधील हा संघर्ष प्रामुख्यानं मालक विरूध्द शेतकरी यांच्यातील संघर्ष होता.रामभाऊ यांच्यानंतर कुलाबा समाचार वाढला नाही.नंतरच्या पिढीनं त्याचं निट संगोपन केलं नाही.त्यामुळं शंभर वर्षानंतरही कुलाबा समाचार आहे त्याच स्थितीत राहिला , मात्र कृषीवल क्रमशः विकसित होत गेला .प्रारंभी कृषीवल साप्ताहिक स्वरूपात होते.नंतर ते ब्रॉडसिट आणि दैनिक स्वरूपात प्रसिध्द होऊ लागले.नंतरच्या काळातही रायगड जिल्हयातील अनेक शेतकऱी लढ्याचं पुढारपण कृषीवलनं केलं.शेतकऱ्यांचा आवाज बुलंद कऱण्याचं काम कृषीवलं करीत राहिले .नारायण नागू पाटील यांनी ज्या उद्देशानं हे दैनिक सुरू केलं होतं तो बाणा नंतरच्या संपादकांनी कायम ठेवत कृषीवल चळवळीचं मुखपत्र बनविलं.कृषीवल केवळ बातम्या देण्याचंच काम करीत नसे तर अन्याय ,अत्याचाराच्या विरोधात जनमत संघटीत करणं,व्यवस्थेच्या विरोधात आवाज देणं ही कामं कृषीवलनं हिरीरिने केली.त्यामुळंच ‘कृषीवल- वृत्तपत्र नव्हे एक चळवळ’ हे ब्रिदवाक्य कृषीवलसाठी यतार्थ ठरते ..कृषीवल ज्या पक्षाची मंडळी चालविते त्या पक्षाची राजकीय धोरणं परिस्थितीनुसार जरूर बदलली कृषीवल मात्र कायम लोकांबरोबरच राहिले हे या पत्राचं वैशिष्ये आहे.विशिष्ठ विचारांना वाहिलेली पत्रे चालत नाहीत (( विशाल सहयाद्री,दैनिक मराठवाडा,पुणे तरूण भारत ही पत्रे बंद पडली ) अशा स्थितीत कृषीवल आज 79 वर्षांचा झाला आहे. ही गोष्ट फारच महत्वाची आणि आश्वासक आहे.तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे.प्रिन्टला भवितव्य आहे की नाही यावरही चर्चा झडत आहेत.मात्र कृषीवल सारखी पत्रे पाहिली की,आणखी पाच पन्नास वर्षे तरी प्रिन्टला मरण नाही याची खात्री पटते. कृषीवलचा आज वर्धापन दिन . कृषीवलला माझ्या मनापासून शुभेच्छा.
कृषीवलमध्ये दीर्घकाळ काम करण्याची आणि कृषीवलच्या माध्यमातून अनेक लोकचळवळी उभ्या कऱण्याची संधी मला मिळाली याचा नक्कीच आनंद आहे.एखादे जिल्हा दैनिक थेट लोकांच्या प्रश्नांना भिडते आणि त्यांना न्याय मिळेपर्यत कायम त्यांची साथ देते हे अपवादात्मक दिसते.कृषीवल त्याचे उत्तम उदाहरण आहे हे नक्की.(SM )