पिंपरी, : आगामी ५ ते १० वर्षात वृत्तपत्रे राहतील की नाही याची भीती वाटते, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शनिवार) व्यक्त केले. वरुणराज भिडे मित्र मंडळ आयोजित पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्काराच्या वितरण सोहळ्याप्रसंगी त्यांनी हे मत व्यक्त केले. आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तरच वेगळा विदर्भ करण्याच्या मुद्याचे स्वागत करीन, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मेपल प्रकरणात अग्रवालवर अद्याप पर्यंत कारवाई केली जात नाही, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.
पुण्यातील एसएम जोशी सभागृहात पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्काराने प्राची कुलकर्णी, दासश्री, गजेंद्र बडे यांना आश्वासक तर मधू कांबळे यांना मुख्य पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ पत्रकार सुहास पळशीकर, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार उल्हास पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्य स्थितीला माध्यमांनी अंतर्मुख होण्याची गरज असून आपण कोणाचे प्रतिनिधित्व करत आहे, हे पाहणे गरजेचे आहे, असे विचार ज्येष्ठ पत्रकार सुहास पळशीकर यांनी मांडले