एका पत्रकाराच्या अंत्ययात्रेत 4 पत्रकार,4 नातेवाईक
पत्रकार संजय मोघे यांच्या अंत्ययात्रेला अवघे चार पत्रकार आणि त्यांचे चार नातेवाईक उपस्थित होते अशी काळजाला हात घालणारी एक पोस्ट कालपासून फिरते आहे.मोघे काही वर्षे पुण्यात फिचर सर्व्हिस चालवत होते.मात्र ते साताराकडचेच असल्याने नातेवाईकही तिकडेच आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवसात ते सातार्यात होते . त्यांचे निधनही तिकडेच झाले.त्यांचे लग्न झाले नव्हते असे समजते.ते 90च्या काळात सातार्यात होते .त्या नंतर पुण्याला गेले .त्यामुळे सातारकरांना ते फारशे परिचित असण्याची शक्यता नाहीच. आजच्या पिढीतल्या पत्रकारांना त्यांच्याबद्दलची फार माहिती नसणे स्वाभाविक आहे.त्यामुळे असेल कदाचित पण त्यांच्या अंत्ययात्रेत आठ-दहा माणसंही नव्हती.आयुष्यभर गर्दीत वावरणार्या पत्रकारांच्या वाट्याला अखेरच्या दिवसात असे भोग यावेत हे निश्चित क्लेशदायक आहे.त्यांच्यावर सातार्याच्या सरकारी रूग्णालायात उपचार चालू असताना सातारा जिल्हा पत्रकार संघाचे हरिष पाटणे,शरद काटकर ,विनोद कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेऊन चौकशी केली होती.मात्र प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्यांचे निधन झाले.फारशे कोणी नातेवाईक नसल्याने ही बातमी शहरातील पत्रकारांना समजली नाही.त्यामुळे अंत्ययात्रेतही उपस्थिती नव्हती.यात सातार्यातील पत्रकारांना दोष कोणी देत नाही.कारण पत्रकारांच्या हिताचे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.अशा घटना केवळ सातार्यातच घडतात असं ही नाही.अन्य शहरातही असे प्रकार घडलेले आहेत.कुणाला दोष देत बसण्यापेक्षा ही परिस्थिती कशी बदलेल हे पाहण्याची आज खरी गरज आहे.पत्रकारांना त्यांच्या उत्तरायुष्यात काळजी घेणारी काही तरी व्यवस्था सरकारने सुरू केली पाहिजे. सरकारनं पेन्शन योजना,आरोग्याचा खर्च आदि व्यवस्थाही केल्या पाहिजेत.
पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे असा जेव्हा आम्ही आग्रह धरतो तेव्हा आपलेच काही मित्र त्याला विरोध करतात.कारण मोघे यांच्या वाटयाला काय भोग आलेत याची त्यांना कल्पना नसते किवा निवृत्त झालेल्या पत्रकारांची हालाखी जाणून घेण्याची गरजही त्यांना वाटत नाही.कारण त्यांचे पोट भरलेले असते.माझ्या माहितीतल्या किमान शंभर पत्रकारांची नावं मी सांगू शकेल की,त्यांच्याकडे डायबेटीसच्या गोळ्या विकत घेण्यासाठी पैसे नाहीत.आयुष्यभर समाजाच्या हितासाठी झगडणारे आयुष्याच्या उत्तरार्धात अशा प्रकारे कफ्पलक स्थितीत जगतात आणि त्यामुळे अज्ञातवासातही जातात. असहाय जीवन जगतच एक दिवस जगाचा निरोप घेतात.समाजावर त्यांच्या जाण्याचाही काही परिणाम होत नाही.किंवा त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हायचे सोडाच त्यांच्यासाठी शोक व्यक्त करायलाही कुणाला वेळ नसतो हे सारंच दुःखद आङे.असी वेळ केवळ संजय मोघेंवरच येऊ शकते असं नाही ती कोणत्याही पत्रकारावर येऊ शकते हे आपण विसरता कामा नये.
.त्यामुळं ‘हे सातार्यातच होतंय आमच्याकडं असं होत नाही’ वगैरे भाषेत परेस्पराना टोमणे मारत बसण्यापेक्षा ही परिस्थिती बदलावी यासाठी एकसंघपणे काम कऱण्याची गरज आहे.ज्यांना पेन्शन घेणे,किंवा सरकारी मदत घेणे ही लाचारी आहे असे वाटते आणि जे तशी भाषणे ठोकतात त्यांनी ती नक्कीच घेऊ नये.मात्र ज्या पत्रकारांना आज कोणताच आधार नाही अशा पत्रकारांसाठी आम्हाला पेन्शन हवी आहे तेव्हा अशा पत्रकारांसाठी तर ज्याचं सारं भागलेलं आहे अशा महानुभावांनी झारीतील शुक्राचार्याची भूमिका पार पाडू नये.पत्रकारांना उत्तरार्धात सुखासीन नाही तरी जेमतेम का होईना आयुष्य जगता आलंच पाहिजे.आम्ही आमच्याकडच्या तुटपुंज्या साधनसामुग्रीच्या बळावर जे करता येईल ते करीत आहोतच.पण मोघेंचा विषय वाचल्यानंतर तरी सर्वांनी पेन्शनसाठी सरकारकडे .आग्रह धरला पाहिजे.सर्व गरजू पत्रकारांना मदतीसाठी एक व्यक्ती किंवा एक संघटना पुरेशी नाही.त्यासाठी आता सरकारनेच तातडीने पुढाकार घेऊन पत्रकार पेन्शन योजना राबविली पाहिजे.एवढीच अपेक्षा आहे.आपण वाद नेहमीच घालतो.पण आता संवाद साधून आपले काही विषय तरी मार्गी लावू.
एस.एम..