76 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या आणि मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेचा स्वतःचा ध्वज असावा अशी अनेक सदस्यांची जुनी इच्छा होती.वेळोवेळी तशी सूचनाही अनेकांनी केलेली आहे.मात्र या ना त्या कारणानं ते शक्य झालेलं नाही.आता नव्यानं ही मागणी पुढं आल्यानं मराठी पत्रकार परिषद आपला स्वतः ध्वज तयार करणार आहे..पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहाचं दर्शन तर त्यातून घडावं त्याचबरोबर परिषदेच्या उज्जवल परंपरेचीही ओळख ध्वजातून नव्या पत्रकारांना व्हावी अशी अपेक्षा आहे..
आम्ही राज्यातील तमाम पत्रकार तसेच नागरिक आणि कलावंताना आवाहन करीत आहोत की,परिषदेला आपला ध्वज करण्यासाठी आम्हाला आपली मदत हवी आहे.ध्वज कसा असावा?,त्याचा रंग कोणता असावा?,त्यावर काही चिन्हं असावीत काय? या संबंधीच्या काही सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे.एवढंच नव्हे तर संपूर्ण ध्वज कोणी तयार करून देणार असेल तर संबंधित कलावंताला योग्य तो पुरस्कार देऊन त्याचा जाहीर सन्मान केला जाणार आहे.नव्याने तयार होणार्या ध्वजाचं अनावरण पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात होणार आङे.27 मार्च रोजी हे अधिवेशन पुण्यात होत आहे.हा ध्वज राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका संघांचाही असेल .सर्वांना विनंती आहे की,या कामी परिषदेला सहकार्य करावे.