जनार्दन,लवकर बरा हो

20 – 21 वर्षांपुर्वीचा तो दिवस मला आजही आठवतोय..सायंकाळी सातच्या सुमारास एक २३ – 24 वर्षांचा तरूण माझ्या केबिनमध्ये आला.म्हणाला,”सर मला पत्रकार व्हायचंय,संधी द्यावी ही विनंती” ..रंगानं काळासावळा,अगदीच सडपातळ,केस वगैरे विस्कटलेले..वाटलं हा कसा पत्रकार होणार ..असं असलं तरी काही करून दाखविण्याची चमक मला त्याच्या डोळ्यात दिसत होती..पदवीधर होता..म्हटलं करतोस काय? कोणताही आडपडदा न ठेवता तो म्हणाला,” एका बिल्डरकडं छोटी-माठी कामं करतोय” ..म्हणजे अनुभव शून्य..परिस्थितीची असहय चटके झेलण्यातच बालपण गेलेलं असल्यानं आणि लहानपणीच पोटाच्या मागं धावावं लागल्यानं लिखाण करायला किंवा अन्य छंद जोपासायला वेळच नव्हता.. मनात म्हटलं,”एक संधी दिली पाहिजे” .,”जनार्दन आठ दिवस तुला संधी देतो,या काळात तु काही चमक दाखविलीस तर तुझी नोकरी पक्की” खूष झाला.. म्हणाला चालेल.. सर तुम्हाला निराश होऊ देणार नाही असा शब्द न विसरता त्यानं दिला होता.. उद्या येतो म्हणून तो गेला.नवीन काही करायला मिळतंय याचा आनंद घेऊन निघालेला पाठमोरा जनार्दन मी विसरलो नाही..

शुध्द लेखन,अक्षर,याबाबत सारा आनंद होता..मात्र कमालीचा न्यूजसेन्स आणि जबरदस्त जनसंपर्क हे जनार्दनचं मोठं भांडवल होत.जनार्दनला बातमीचा वास यायचा.. त्यामुळे पहिल्या
आठ दिवसांतच त्यानं चमक दाखविली..तीन-चार चांगल्या बातम्या दिल्या..त्या बातम्यांची चर्चा जिल्हाभर झाली.मला एक चांगला सिटी रिपोर्टर मिळाला होता.जनार्दननं बातमी आणायची,अन मी ती रिराईट करायची असा सिलसिला पुढे आठ – दहा वर्षे सुरू होता. .दररोज नवी काही तरी बातमी असायचंी..राजकीय ज्ञान आणि सामाजिक जाणिवा असल्याने बातम्यांमध्ये वैविद्य असायचे..जनार्दन नं अशा असंख्य बातम्या दिल्या की, किमान मी तरी अजून त्या विसरलो नाही..
एक दिवस सायंकाळी जनार्दनचा फोन आला,,म्हणाला,”सर उंदेरी किल्ला दोन कोटींना विकला गेलाय” ..किल्ला कसा विकला जाईल? हा माझा प्रश्‍न.. पण तो म्हणाला, “थोड्या वेळापूर्वीच रजिस्ट्री झालीय..त्याची कागदपत्रे माझ्या हाती आहेत” ..म्हटलं लगेच ये.. रजिस्ट्रेशन साडेचार वाजता झालं होतं.. जनार्दन च्या हातात पाच वाजता सारी कागदपत्रे होती..सर्व थरातील संबंधामुळे हे घडत होतं.. दुसर्‍या दिवशी मोठा धमाका झाला.या प्रकरणात रजिस्टारसह 17 अधिकारी सस्पेंड झाले..व्यवहार रद्द झाला.एका धनदांडग्यांच्या घश्यात जाणारा महाराजांचा उंदेरी किल्ला केवळ जनार्दनच्या जागरुकतेमुळे वाचला.टाइम्स ऑफ इंडियानं जनार्दनची मुलाखत घेतली.जनार्दनला विविध पुरस्कार मिळाले, “आम्हाला अभिमान वाटतो” अशा आषयाची जाहिरात मी पहिल्या पानावर छापून जनार्दनचं जाहिर कौतूक केलं.. जनार्दन रायगड जिल्हयातील स्टार पत्रकार झाला.आम जनता जनार्दनचं कौतूक करीत होती.. हितसंबंधी मात्र दुखावले होते..जनार्दन आणि माझ्यावर हल्ला होण्याच्या भितीने पोलिसांनी आम्हा दोघांनाही महिनाभर पोलीस संरक्षण दिले होते.या प्रकरणातून तर आम्ही वाचलो होतो.मात्र अन्य एका बातमीच्या संदर्भात जनार्दनवर हल्ला झाला.जिल्हयातील तडीपार गुंडांच्या संदर्भातली ती बातमी होती.जनार्दनवर हल्ला झाला पण तेव्हा आजच्यासारखं पत्रकारांचं भक्कम संघटन नव्हतं.पोलिसात तक्रार दाखल होऊन आरोपीला अटक झाली तरी अन्य दैनिकांनी बातमी दिली नाही किंवा कोणी साधं निषेधाचं पत्रकही काढलं नाही.आमचे व्यवस्थापन आणि ,समाज गुन्हेगारांच्या बाजुने होता.अन्य वृत्तपत्रे मौन बाळगून होती.. मी आणि जनार्दनच फक्त लढत होतो.सारी परिस्थिती पाहून मी देखील इरेला पेटलो होतो.. माझी सर्व शक्ती मी पणाला लावली..साधा मारहाणीचा गुन्हा.. पण आऱोपीला तीन महिने जामिन झाला नाही..हा हल्ला जनार्दनसाठी मोठा धक्का होता..त्यातून सावरायला त्याला पुढील चार-सहा महिने लागले..
पत्रकारिता करीत असतानाच जनार्दनचं एलएलबीचं शिक्षण सुरू होतं..व्यवस्थापनाला जेव्हा हे कळलं तेव्हा मला सांगण्यात आलं की,”त्याला एक तर नोकरी कर म्हणावं किंवा शिक्षण” …त्याचं शिक्षण बंद होता कामा नये ही माझी भूमिका होती.”कॉलेजला जाऊ नकोस घरी बसून अभ्यास कर” असा सल्ला मी त्याला दिला..कालांतराने तो वकिल झाला.ज्युनिअर म्हणून एका ज्येष्ठ वकिलाकडे त्यानं प्रॅक्टिस सुरू केली.. ..थोडं आर्थिक स्थैर्य येण्याचा हा काळ होता..30 हजाराची एक मारूती त्यानं घेतली.ती घेऊन तो ऑफिसला येऊ लागताच मॅनजमेंटच्या पोटात गोळा उठला..अशी परिस्थिती निर्माण केली गेली की,त्यानं राजीनामा द्यावा..नोकरीची गरज त्यालाही उरली नव्हती..त्यानं राजीनामा दिला.पूर्णवेळ वकिली करू लागला.दांडगा जनसंपर्क आणि विश्‍वासार्हता असल्याने अल्पावधीतच तो नावारूपाला आला..मग स्वतंत्रपणे वकिली,स्वतंत्र ऑफिस,गाडी,बंगला सारं काही आलं..राजकारणातही तो सक्रीय झाला.राष्ट्रवादीचा जिल्हा सरचिटणीस झाला..आपलेपणानं लोक त्याला अगोदर जन्या म्हणत..आता तो जन्याशेठ झाला होता.पैसा आला होता आणि पत्रकारितेचा किडा वळवळत होता..मग त्यानं जनोदय नावाचं दैनिक ही सुरू केलं.ते फार काळ चाललं नाही..पण वकिली,राजकारण झकास सुरू होतं.अलिबागजवळ असलेल्या कुरूळ गावचा आता तो सरपंच झाला होता.. त्याची एवढया झपाट्यानं भरभराट सुरू होती की,त्याला कोणाची तरी दृष्ट लागली.कुरूळ ग्रामपंचायतीचा चार्ज घेण्याच्या दिवशीच तो आजारी पडला..अगोदर वाटलं किरकोळ आजार असेल पण तो गंभीर आजार निघाला..वीस वर्षात त्यानं स्वकर्तृत्वाने घेतलेली भरारी कोणालाही स्तिमित करणारी होती.. १६ ज्युनियर त्याच्या हाताखाली काम करीत होते.. मोठी कामं त्याच्याकडं येत होती.. पत्रकारिते प़माणेच तो वकिलीतही स्टार वकिल झाला होता..

एक दिवस जनार्दनचा फोन आला ..काय झालंय हे त्यानं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची वाळू सरकली..मी सुन्न झालो.तो माझ्यासाठी मोठाच धक्का होता.. कारण त्याचे हलाखीचे दिवस मी पाहिले होते..त्याचं कष्ट,त्यानं केलेली मेहनत मी जवळून पाहिली होती.. वेळकाळेचं भान न ठेवता बातमीच्या मागं धावणारा जनार्दन मी पाहिला होता.. कोणाचाही आधार नाही, पाठबळ नाही, उलट तंगड्या ओढणारेच अघिक अशा स्थितीत ही त्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं होत.सुखाचे दिवस आले होते..काही दिवसांपुर्वीच एक टोलजंग घर त्यानं बांधलं .”सर,तुम्ही घर बघायला या असा आग्रह वारंवार तो मला करीत राहिला” .एक दिवस मी मुद्दाम अलिबागला त्याच्याकडं गेलो.त्याचं वैभव पाहून मला झालेला आनंद वर्णनातीत होता.आपला सहकारी आज सुखी संपन्न आयुष्य जगतोय ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती …जनार्दन आणि माझं नातं केवळ एक संपादक आणि वार्ताहर एवढंच नव्हतं.तो माझ्या धाकट्या भावासारखा होता.त्याच्या प्रत्येक सुखदुःखात मी माझ्यापरीनं त्याला मदत केली होती..म्हणूनच आज दिनानाथ मंगेशकर रूग्णालायत त्याला भेटायला गेलो तेव्हा गर्भगळीत झालो.आजारानं कृश झालेल्या जनार्दनकडं पाहवत नव्हतं…त्याला धीर देण्याचं धैर्य देखील माझ्यात नव्हतं.नेहमी हिंमतीनं बोलणारा,वागणारा जनार्दन आज हतबल झाल्यासारखा दिसला..त्याच्या अनेक वाईट प्रसंगात मी त्याच्याबरोबर होतो..आज संकटच असंय की,मी काहीच करू शकत नाही..जवळच्या माणसाला अशा अवस्थेत पाहणं किती त्रासदायक असतं याची जाणीव मला झाली…मी निःशब्द झालो.. जनार्दनचा तो “अवतार” मला तीव्र वेदना देत होता..या क्षणापर्यंत मी त्या धक्क्यातून सावरलेलो नाही..खरं तर जनार्दनचा कालच फोन आला होता.. पण भेटायला जायची देखील हिंमत होत नव्हती.. आज रक्त पाहिजे म्हणून त्यानं फोन केला.. मग धावत गेलो.. आयुष्यभर पराकोटीचा संघर्ष जनार्दनच्या वाट्याला आला.. आता कुठं चांगले दिवस आले होते..पण परमेश्‍वराला ते पाहावलं नाही असंच म्हणावं लागेल..नेहमी घावणारा, धडपड्या जनार्दन अंधरूनाला खिळून निपचित पडला.. पोटात कळ येऊन तळमळणार्‍या जनार्दनला होणारया असह्य वेदना पाहवत नव्हत्या.. आता खोलीत थांबणं अशक्य होतं.. डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या होत्या.. डबडबलेल्या डोळ्यांनीच सुनील वाळुंज आणि प़मोद गव्हाणेला घेऊन बाहेर पडलो..एकच प्रार्थना आहे, एकच मनिषा आहे, जनार्दन तू लवकर बरा हो..जनार्दन तू अनेक संकटावर लिलया मात केलीस या संकटातून देखील तू नक्की बाहेर पडशील असा विश्वास मला आहे..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here