शेतकर्‍यांनो भिऊ नका

    0
    953

    शेतकर्‍यांनो भिऊ नका

    ‘शेतकर्‍यांनो, भिऊ नका’

    “शेतकर्‍यांनो, भिऊ नका”

    असे आवाहन केलंत  तुम्ही,

    पण

    उसवलेलं आयुष्य

    सांधायचं कसं?

    हे  नाही सांगितलंत तुम्ही!

     

    धीर धरा,कळ काढा

    असा सल्ला

    दिलात तुम्ही,

    पण

    पीक गेलं.कर्ज वाढलं,

    सावकाराच्या फासातून

    सुटायचं कसं ?

    त्यावर बोलला नाहीत  तुम्ही!

     

    कापसाला  ‘भाव’ येईल

    ऊसही ‘गोड’ होईल,

    बाजारही  ‘गरम’ होईल

    असं भाकित केलंत  तुम्ही

    पण

    बळीला ‘मोल’ कधी येईल ?

    यावरचं मौन  सोडलं नाहीत तुम्ही!

     

    शेती सोडा,

    धंदा काढा

    नोकरीसाठी  नका झिजवू जोडा

    असा सल्ला दिलात तुम्ही,

    पण

    हे सारं करायला

    ‘उभं’ कसं राहायचं?

    हे नाही शिकविलत तुम्ही!

     

    दुःख सरंल,

    सुख येईल

    दिसं जातील,दिसं येतील

    अशी आशा दाखवलीत तुम्ही,

    पण

    शेतकर्‍यांना ‘नागवलं’ कुणी?

    शेतकर्‍यांना ‘लुबाडलं’ कुणी?

    शेतकर्‍यांना ‘वापरलं’ कुणी?

    हे मात्र  नाही सांगितलंत तुम्ही!

     

    ‘भिऊ नकोस ,मी तुझ्या पाठिशी आहे’!

    असा विश्‍वास ‘पुन्हा एकदा’ दिलात तुम्ही

    पण

    मिठू मिठू  बोलून

    शेतकर्‍यांना झुलवत ठेवणं

    थांबणार कधी?

    हे ही नाही सांगितलं तुम्ही!

    सूर्या देवडीकर

     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here