राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ; उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार
मृत पत्रकारांच्या कुटूंबियांना मदत देण्याचे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे निवेदन

सातारा :
पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडी तील आम्ही सर्व घटक एकत्र बसून निर्णय घेऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी साताऱ्यात दिली .
उपमुख्यमंत्री अजितदादा शुक्रवारी कोव्हीड आढावा बैठकीसाठी रात्री उशिरा पर्यन्त साताऱ्यात होते .रात्री 10.15 वाजता त्यांची पत्रकार परिषद सुरू झाली . पत्रकार परिषद नंतर होईल आधी आमचे निवेदन ऐका अशी भूमिका सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी घेतली . कोरोनामुळे राज्यातील सुमारे 140 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातही 7 पत्रकारांचे बळी गेले आहेत. राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा न मिळाल्याने त्यांच्या लसीकरणामध्ये अडथळे येत आहेत. देशातील 12 राज्यांनी पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून जाहीर करुन त्या अंतर्गत मिळणार्‍या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची अनेक कुटुंबे बाधित आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आमची आपणाला विनंती आहे की आपण महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा द्यावा, त्यांचे सरसकट लसीकरण करण्याला मान्यता द्यावी. ज्या पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकार मार्फत मदत करावी. माध्यमांमधील सर्व घटकांना तातडीने बेड उपलब्ध करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना द्याव्यात. मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना तत्काळ मदत करावी. वृत्तपत्र व मिडीयामधील सर्व घटकांचे तातडीने लसीकरण करावे. बाधित पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ बेड मिळावेत या आमच्या मागण्या आहेत त्यावर आधी बोला नंतर पत्रकार परिषद सुरू करा अशी मागणी पाटणे यांनी केली .
त्यावर ना अजितदादा म्हणाले पत्रकारांच्या लसीकरणा बाबत राज्यात पत्रकारांची निवेदने आली आहेत ,मंत्र्यानी ही ती पाठवली आहेत .पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी आपण केलेल्या मागण्याबाबत आम्ही सगळे एकत्र बसतो तिथे निर्णय घेऊ .
पत्रकार परिषदेत फ्रंट लाईन वर्कर दर्जा बाबत अजित पवार यांनी साशंकता व्यक्त केल्यानंतर हरीष पाटणे,विनोद कुलकर्णी सुजित आंबेकर तुषार तपासे ओंकार कदम सनी शिंदे या शिष्टमंडळाने व्यासपीठावर जाऊन निवेदन देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली .12 राज्यांनी फ्रंट लाईन वर्कर बाबत चा दर्जा दिल्याचे अजितदादा यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले .त्यावर त्यांनी असे असेल तर लगेच माहिती घेतो .आपण ही राज्याचे 1 शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवावे ,मी ही त्याना सांगेन अशी ग्वाही दिली . जाहीर पत्रकार परिषदेत साताऱ्यातील पत्रकारांनी कोरोनवरून मंत्री ,आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाम घाम फोडला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here