लॉकडाऊनला विरोध करणारे कोण आहेत बघा.. चंद़कांत पाटील, नवाब मलिक, संजय निरूपम, उद्योगपती महेंद्रा आणि असेच अन्य काही मान्यवर.. ही मंडळी तशी सुरक्षित आणि सुखवस्तू.. यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता तशी कमी.. कारण त्यांना बाजारात किराणा खरेदीला जावं लागत नाही, मंडईत भाजीसाठी जावं लागत नाही किंवा बससाठी रांगेत थांबावं लागत नाही.. हं , ते कार्यकर्त्यांना वगैरे भेटतात.. पण सुरक्षितपणे.. सुरक्षेसाठीची सारी साधनं त्यांच्याकडे असतात.. अन समजा यातूनही एखादा नेता, किंवा उद्योगपती बाधित झालाच तर त्याला मिळणारे उपचार “पंचतारांकित’ असतात.. एखादया नेत्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना बेड मिळाला नाही, ऑक्सीजन मिळाला नाही किंवा अॅम्ब्युलन्स मिळाली नाही अशा बातम्या कधी ऐकायला मिळाल्यात का? नक्कीच नाही.. त्यामुळे बाधित झालेले नेते, त्याचे नातेवाईक सुखरूप घरी आले.. सर्वसामान्यांना असे अनुभव येतात का? नक्कीच नाही..म्हणूनच आमचा पत्रकार मित्र संतोष पवार ऑक्शीजन न मिळाल्यानं गेला,पुण्यात पांडुरंग रायकर अॅब्युलन्स न मिळाल्यानं गेला,सदा डुंबरे वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने गेले..असे अनेक..सर्वसामांन्य व्यक्तींची होणारी ही परवड जीवघेणी असते.. लोक आज कोरोनापेक्षा उपचारांना जास्त घाबरतात.”भीक नको पण कुत्रं आवर” अशी स्थितीय..यातूनच मग कोरोना टेस्ट करायला टाळाटाळ होताना दिसतेय..लॉकडाऊनला विरोध करणारयांना कोरोनाला किंवा उपचाराला घाबरण्याची वेळ येत नाही.. त्याचं सारं सुखेनैव पार पडत असल्यानं ते जनतेच्या अडचणीचे पाढे वाचत कोरोनाला विरोध करीत आहेत..हा विरोध चुकीचा..पश्चाताप करायला लावणारा आहे..या विरोधाला आणखी एक कंगोरा आहे.. राजकारणाचा.. गेल्या वेळेस नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला.. लोकांचे अतोनात हाल झाले.. याचं कारण कोणतीही पूर्वसूचना न देता लॉकडाऊन जाहीर केला गेला.. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायला विरोध करणारया भाजप नेत्यांनी “तेव्हा लॉकडाऊन लाऊन मोदींनी मोठीच चूक केली” हे मान्य करायला राज्यातील भाजप नेते तयार आहेत का? तेव्हा थाळ्या वाजविणारे,दीवे लावणारे आज लॉकडाऊनवरून राजकारण करताहेत हे गंमतीशीर आहे..”केंद्र सरकार जे करतंय ते. योग्य आणि राज्य सरकार करतंय ते अयोग्य” असं असू शकत नाही.. बरं लॉकडाऊनला जे विरोध करताहेत ते दुसरा पर्याय देखील सांगत नाहीत.. लॉकांमध्ये स्वयंशिस्त नाही त्यामुळे मास्क, सोशल डिस्टस्टिंग, सॅनिटायझरचा वापर या सर्वांचा फज्जा उडाला आहे.. फेब़ुवारीत निर्बंध उठल्यानंतर लोक सुसाट सुटले.. परिणामतः दुसरी लाट आली.. असं दिसंयत की,विरोधकांना ही इष्टापत्ती वाटत असावी… कारण “सरकार कोरोनावर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरलं” असे आरोप भाजपचे नेते सर्रास करीत आहेत..सरकारची कोडी करायला कोरोनाची मदत घेतली जात आहे हे संतापजनक आहे.सरकार स्वतःच्या कर्मानं विरोधकांच्या हाती अनेक विषय देत असता कोरोनाचा वापर राजकारणासाठी व्हावा हे अशोभनीय आहे..काहीजण दुसरा पर्याय सांगतात तो व्यापक लसीकरणाचा.. लसीकरण व्हायलाच हवं.. पण ते के़दाच्या हातात आहे .. . कोणत्या राज्याला किती लसींचा पुरवठा करायचा ते केंद्र ठरवते..”आम्हाला अतिरिक्त लशी द्या” अशी मागणी महाराष्ट्राने वारंवार केल्यानंतरही जास्तीच्या लशी महाराष्ट्राला मिळालेल्या नाहीत..हे वास्तव दुर्लक्षिता येणार नाही..ज्या राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे त्या राज्याना अतिरिक्त लशींचा पुरवठा करणे गरजेचे नाही का ?मग महाराष्ट्राच्या बाबतीत का पक्षपात केला जातोय..?हे राजकारण नाही तर काय आहे.” .एवढंच नाही तर मुंबई मनपाने खरोघरी जाऊन लसीकरणाची परवानगी मागितली तर ती देखील मोदी सरकारने नाकारली.. म्हणजे एका बाजुनं “लॉकडाऊनला विरोध करायचा आणि दुसरया बाजुने लसीकरणावरून देखील कोंडी करायची” ही भाजपची नीती लोकांच्या अडचणीत भर टाकणारी आहे.. हं, हे खरंय की लॉकडाऊनमुळे सर्वसामांन्य माणूस भरडला जाणार आहे.. ही अडचण आठ दिवसापुरती होऊ शकते पण बाधित झाल्यानंतर होणारी अडचण जीवघेणी ठरू शकते.. जळगाव जिल्ह्यातील एका पत्रकाराच्या घरातील चार व्यक्ती दोन दिवसांत मृत्युमुखी पडल्या..सारं कुटुूंबच बाधित झाल्याचे आणि उपचाराच्या नावाखाली त्यांची प़ंचंड हेळसांड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.. “रूग्णांच्या होणारया हाल अपेष्टांपेक्षा आठ दिवसाचा लॉकडाऊन परवडला” असं अनेकांचं मत आहे. आपली आरोग्य यंत्रणा सक्षम असती, लोकांनी स्वयंशिस्त पाळली असती आणि एका झटक्यात सक्तीनं सगळ्याचं लसीकरण करणं शक्य झालं असतं तर लॉकडाऊनची गरज पडली नसती.. हे सारं होत नाही म्हणून अखेरचा उपाय लॉकडाऊन आहे.. तो करावाच लागेल..फक्त लोकांना पुरेसा वेळ देऊन लॉकडाऊन जाहीर करावा.. नरेंद्र मोदी यांच्या सारखा तो अचानक जाहीर करू नये एवढीच अपेक्षा..मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावण्याचं मनोमन ठरविलं दिसतंय..असं दिसतंय की, ते भाजपला आणि नवाब मलिक किंवा संजय निरुपम यांच्या सारख्या आघाडीतील नेत्यांच्या विरोधाला घाबरत आहेत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आणि राज्यातील सर्वसामांन्य जनतेच्या हिताचा निर्णय घेताना घाबरण्याचं कारण नाही.. यशाचे वाटेकरी सारेच असले तरी अपयशाचं ओझं एकट्या उध्दव ठाकरे यांनाच पेलावं लागेल. उध्दव ठाकरे याानी निर्धारानं निर्णय घेतला नाही आणि कोरोनाचा फैलाव थांबला नाही तर “महामारीवर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री” म्हणून इतिहासात त्यांची कायम नोंद होईल.. तेव्हा वेळ न घालवता आणि कोण काय म्हणतंय याचा जास्त विचार न करता मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका आणि निर्णय घ्यावा हीच अपेक्षा
एस.एम.देशमुख