101 पत्रकारांना देणार जीवनावश्यक वस्तूंचे कीट
पुणे जिल्हा पत्रकार संघाचा अभिनंदनीय उपक्रम
पुणे : पुणे जिल्हा पत्रकार संघाला यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत की, राज्यात प्रथमच मोठ्या संख्येनं पत्रकारांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय जिल्हा संघानं घेतला आहे.. 101 किट्स येत्या दोन दिवसात प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांच्या मार्फत गरजू पत्रकारांना दिले जाणार आहेत..
पत्रकार सुखवस्तू आहेत, त्यांना काही अडचणी नाहीत असा एक चुकीचा समज समाजात पसरलेला आहे.. मात्र वास्तव काय आहे याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला आहे.. मराठी पत्रकार परिषदेला ही आहे.. त्यामुळे जिल्हा संघाने किट देण्यासाठी जेव्हा नावं मागितली तेव्हा तब्बल 90 पत्रकारांनी आपली नावं जिल्हा संघाकडे नोंदविली हा आकडा जिल्हा संघाला देखील अचंबित करणारा होता.. पुणे जिल्ह्यातील पत्रकारांची ही अवस्था आहे.. अन्य ठिकाणची स्थिती यापेक्षा विदारक आहे..
आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की, ज्या पत्रकारांना हे किट दिले जाणार आहे त्या सर्व पत्रकारांची नावं गोपनिय ठेवली जाणार आहेत.. किट देतानाचे फोटो सोशल मिडियावर टाकले जाऊ नयेत अशी सर्वांना विनंती केली गेली आहे.. पत्रकारांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाला तडा जाता कामा नये याची काळजी घेतली गेली पाहिजे.. ही बाबही तेवढीच महत्वाची आहे.. जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांसाठीच ही योजना आहे.. हा अत्यंत आवश्यक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषदेचे पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांचे अभिनंदन आणि आभार.
एस.एम.देशमुख