बीजिंग – चीनमधील प्रमुख वृत्तसंघटनांचे माजी अध्यक्ष शेन हाओ यांना येथील न्यायालयाने चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आज सुनावली. शेन हे “ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी मीडिया‘ या कंपनीचे अध्यक्ष व संस्थेच्या मालकीच्या “बिझिनेस हेरल्ड‘ या वृत्तपत्राचे ते प्रकाशक होते. लाच घेणे, पिळवणूक करणे आणि निधीचा गैरवापर करणे, अशा आरोपावरून शांघाय पोलिसांनी त्यांना गेल्या वर्षी अटक केली होती. बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्याकडून पैसे उकळले होते, असे शिनुआ या वृत्तसंस्थेने सांगितले. शेन यांना तुरुंगवासाबरोबरच नऊ हजार 260 डॉलर दंडही ठोठावण्यात आला आहे. अन्य एका वृत्तपत्राचे अधिकारी ली बिंग यांनाही निलंबित करून तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
चीनमधील वृत्तसंस्था सरकारच्या नियंत्रणाखाली असली तरी, त्यांचे व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने अनेक वृत्तसंस्थांकडून कंपन्यांवर पैसे देण्यासाठी दबाब आणला जातो. (सकाळवरून साभार)