पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करणारे येळावीचे डॉक्टर दोन महिने सक्तीच्या रजेवर
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची कारवाई तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार

पत्रकारांच्या एकजुटीचा विजय !

तासगाव तालुक्यातील पत्रकार प्रशांत सावंत यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करायला लावणारे येळावी प्राथ आरोग्य केंद्रातील डॉक्टर रविंद्र चौगुले याना दोन महिने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा व तासगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या आक्रमक पवित्र्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ही कारवाई केली आहे.

पत्रकारांची एकजूट असेल आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची मानसिकता असेल तर कारवाई होतेच याचा प्रत्यय आज सांगली जिल्ह्यात पत्रकारांना आला. पत्रकाराविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याची खोटी फिर्याद द्यायला लावणे तासगाव तालुक्यातील येळावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चौगुले महोदयांना चांगलेच महागात पडले. 
सांगली जिल्ह्यात आरोग्य विभागाचे चांगले कार्य होण्यास पत्रकारांनीही मोठी भूमिका घेतली असून पत्रकार सावन्त यांच्यावरील गुन्हा मागे घेऊ असेही देशमुख यांनी सांगितले.

येळावी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती साठी आलेल्या महिलेला दाखल करून न घेतल्याने दारातच प्रसूती झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याचा डॉक्टर चौगुले याना राग होता, त्यातच काही कार्यकर्ते आरोग्य केंद्रात आंदोलनास आले, ते पाहून डॉक्टर पळून गेले. आंदोलकांनी दवाखान्याच्या परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या शेण आणून डॉक्टरांच्या टेबलवर मांडले . या घटनेचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकार सावंत यांच्यावरच गुन्हा दाखल करायचा चंग बांधला.आपल्या हाताखालील परीचारिकेवर दबाव आणून पत्रकाराला आंदोलनाचा मुख्य आरोपी बनवून महिलेस धक्काबुक्की व सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा दाखल करायला लावला. त्यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना होती. तासगाव तालुका पत्रकार संघाने त्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला.
दरम्यान आपल्यावर डॉक्टर यांनी दबाव आणल्याचे तक्रारदार महिलेने तासगाव पोलिसांना सांगितले. कर्मचारी संघटनेचे नेतेही आमच्या कर्मचाऱ्याचा पत्रकाराविरुद्ध वापर केला आहे अशी तक्रार करू लागले.

मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, तासगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू जमदाडे, माजी अध्यक्ष संजय माळी, प्रवीण शिंदे, प्रमोद चव्हाण, विनायक कदम, प्रदीप पोतदार, शाहजहान बारगीर, उत्तम जानकर, दिलीप जाधव, अमोल पाटील, मिलिंद पोळ, दत्तात्रय सपकाळ, राजू सकटे, गजानन कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड, बालाजी न्यूजचे संपादक संजय देसाई, सरफराज सनदी, विजय पाटील, दीपक चव्हाण, असिफ मुरसल, आप्पा पाटणकर व अन्य पत्रकारांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यापुढे कैफियत मांडली. येळावी येथील पत्रकार प्रशांत सावंत हे या प्रकरणाचे वार्तांकन करत होते. तरीही आकसाने त्यांना आरोपी बनवले. सावंत यांच्यावर डॉक्टरनी नर्समार्फत शासकीय कामात अडथळा आणणे, व धक्का बुक्की केल्याची खोटी फिर्याद तासगाव पोलिसात दिली आहे. डॉक्टरकी पेशाला कलंक लावणा-या व कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करणा-या या डॉक्टर महोदय यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा व त्यांचे निलंबन करावे अशी आमची करण्यात आली.
त्याची गंभीर दखल अध्यक्ष यांनी घेतली आणि डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे तसेच चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गिरीगोसावी यांनी डॉक्टर चौगुले याना 2 महिने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. त्यांचा पदभार दुसऱ्या कडे सोपवून तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांना चौकशी अधिकारी नेमले आहे, त्यात दोषी आढळल्यास निलंबन करण्याचा इशारा डॉ गिरीगोसावी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here