नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा जाहीर करणारा पाकिस्तानभारतातील निवडणुकीवर वॉच ठेवून आहे. निवडणुकीतील प्रत्येक बारीकसारीक घटनांची माहिती पाकिस्तान घेत असून आपल्या नागरिकांना या निवडणुकीची इत्थंभूत माहिती मिळावी म्हणून पाकच्या एका वृत्तपत्राने त्यांच्या संकेतस्थळावर लाइव्ह ब्लॉग सुरू केला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भारतात भाजपला टीकेचा सामनाही करावा लागला होता. इम्रान यांनी मोदींबाबतचं वक्तव्य राजकीय हेतूने केलेलं असले तरी पाकिस्तानी मीडियाला मात्र भारतीय निवडणुकांमध्ये प्रचंड रस असल्याचं दिसून आलं आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानातील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय वर्तमानपत्राने भारतात लोकसभेच्या ७२ जागांवर सुरू असलेल्या मतदानाची अपडेट पाकिस्तानी जनतेला देण्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर विशेष लाइव्ह ब्लॉग सुरू केला आहे.
कोणत्या कोणत्या राजकारण्यांनी आणि सेलिब्रिटीजनी मतदानाचा हक्क बजावला आहे इथपासून ते कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा आहे इथपर्यंतची माहिती ‘डॉन’च्या संकेतस्थळावरून देण्यात येत आहे. कोणत्या सेलिब्रिटीजनी कोणत्या मतदारसंघात मतदान केलंय, याचीही माहिती देण्यात येत आहे. शिवाय कोणत्या कोणत्या व्हीआयपींनी उमेदवारी अर्ज भरलाय याचीही माहिती देण्यात येत आहे. करिना कपूर, अभिनेत्री रेखा, काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर, प्रियांका चोप्रा यांनी मतदान केल्याचंही या लाइव्ह ब्लॉगमध्ये नमूद करण्यात आलं असून अभिनेता सन्नी देओलने गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज भरल्याची माहितीही देण्यात आली आहे.