उस्मानाबाद – उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत डोके यांनी मंगळवारी सकाळी अश्लिल शिविगाळ करून,जीवे मारण्याची धमकी दिली.त्याचा महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी जाहीर निषेध केला असून,डोके यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उस्मानाबाद नगराध्यक्षपद निवडणुकीला औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली.त्यामुळे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर यांना दिलासा मिळाला.यावर आधारीत सुनील ढेपे यांनी गोफणगुंडा goo.gl/WPFdk5 लिहिला होता.(सुनील ढेपे यांचे गोफणगुंडा हे सदर असून,ते उस्मानाबाद जिल्ह्यात लोकप्रिय आहे.)
हा गोफणगुंडा वाचून राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत डोके यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुनील ढेपे यांना फोन केला आणि अत्यंत खालच्या पातळीवर अश्लिल शिविगाळ केली,तसेच यापुढे लिखाण केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.त्याची ऑडियो क्लीप रेकॉर्ड करण्यात आलेली आहे.
संपत डोके यांच्या या शिविगाळ आणि धमकी प्रकरणी पोलीस अधीक्षकांना तातडीने व्हॉटस् एॅपवरून क्लीप पाठवण्यात आलेली असून,ई-मेल करून लेखी तक्रारही करण्यात आलेली आहे.संपत डोके यांच्या या धमकीची तक्रार मुख्यमंत्री,गृह राज्यमंत्री यांच्याकडेही करण्यात आलेली आहे.
दरम्यान,संपत डोके यांच्या या अश्लिल शिविगाळ आणि धमकीचा महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी निषेध केलेला आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनीही या शिविगाळ आणि धमकीचा निषेध केला असून,त्यांनी खालील निवेदन प्रसिध्द केले आहे.
………………
उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना धमक्या,शिविगाळ
…………………
उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना राष्ट्रवादीच्या पुढार्यानं केलेली शिविगाळ आणि दिलेल्या धमक्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत आहे.उस्मानाबाद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून नाव न घेता केलेली सौम्य टीकाही राजकारणातल्या लोकांना पचवता येत नाही.त्यातुन पत्रकारावर हल्ले केले जातात किंवा त्यांना शिविगाळ केली जाते,धमक्या दिल्या जातात.अशा घटना दररोज घडत आहेत.सरकार कायद्याचं केवळ आश्वासनच देते मात्र प्रत्यक्षात तो होत नसल्याने अशा शक्ती राज्यभर बोकाळल्या आहेत.त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.सुनील ढेपे यांना दिल्या गेलेल्या धमक्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत.महाराष्ट्रातील सर्व पत्रकार सुनील ढेपेंबरोबर आहोत हे धमक्या देणार्यांनी लक्षात असू द्यावे. हा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानी घालत आहोत.