जामखेडः पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करायला सरकार टाळाटाळ करीत असल्याने राज्यात पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे.जामखेड येथे आज एका छायाचित्रकारावर जीवघेणा हल्ला केला गेला.
जामखेड येथील प्रेस फोटोग्राफर अशोक वीर यांच्यावर त्यांच्याच गावातील काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. जखमी झालेल्या वीर यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप कळालेले नाही.
अशोक वीर यांच्यावर सोमवारी सकाळी त्यांच्याच गावातील काहीजणांनी लाकडी दांडका व कोयत्याने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वीर या हल्ल्यात थोडक्यात बचावले. वीर यांच्या हल्ल्याचा तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपींवर गंभीर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करवी अशी मागणीही पत्रकारांनी केली आहे.
मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने वीर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे