फुटपाथवरचे जिणे संपणार
■ टाटा कॅन्सर इस्पितळात उपचारासाठी आलेल्या रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक परिसरातील फूटपाथवर झोपतात. हे हृदयद्रावक चित्र अनेकदा बघायला मिळते. अनेक समाजसेवी संस्था रुग्ण व नातेवाइकांना चादरी, ब्लँकेट पुरवितात आणि त्यांच्या भोजनाचीदेखील व्यवस्था करतात. शासनाने ४00 सदनिका उपलब्ध करून दिल्यानंतर ही विदारकता बघायला मिळणार नाही, अशी अपेक्षा आहे.
यदु जोशी■ मुंबई
परळ येथील टाटा कॅन्सर इस्पितळाच्या रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी माहुल; वडाळा येथील एसआरएच्या दोन इमारतींमधील ४00 सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बाबतच्या प्रस्तावाला झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२६ जुलै २00५ च्या अतवृष्टीबाधितांसाठी या दोन इमारती बांधण्यात आल्या होत्या. मात्र, विविध वादांमुळे त्या ठिकाणी कोणीही राहायला गेले नाही. रिकाम्या असलेल्या या इमारती टाटा इस्पितळात कर्करोगावर उपचार घेण्यासाठी येणार्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्याव्यात असा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिला होता. टाटा इन्स्टिट्यूटचे संचालक, एसआरएचे अधिकारी आणि आपल्या विभागाच्या अधिकार्यांची त्यांनी या संदर्भात बैठकही घेतली होती. तसेच, इस्पितळाला भेट देऊन तेथील अधिकारी व रुग्णांशी चर्चादेखील केली होती.
या दोन्ही इमारती टाटा कॅन्सर इस्पितळाकडे सोपविण्यात येतील. त्या ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या तसेच या इस्पितळातील निवासी डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे. रुग्णांकडून अत्यंत नाममात्र भाडे आकारले जाईल. उपचाराच्या काळात त्यांना या ठिकाणी जवळच्या नातेवाइकासह राहता येईल. या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर एका डॉक्टरच्या राहण्याची व्यवस्था असेल. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना स्वयंपाकाचा गॅस मोफत उपलब्ध करुन दिला जाईल तसेच, दोन्ही इमारतींमध्ये किराणा दुकाने असतील.
रुग्णांना उपचारासाठी कधीकधी सहा-सहा महिने मुंबईत राहावे लागते कारण अधुनमधून उपचारासाठी येणे त्यांना परवडत नाही. म्हणून त्यांच्या मुलांसाठी बालवाडीही सुरू करण्यात येणार आहे.
इमारतींची देखभाल आणि इतर संचालनाची जबाबदारी टाटा कॅन्सर इस्पितळ स्वीकारेल. केंद्रीय अणुऊर्जा आयोगाच्या अखत्यारित हे इस्पितळ येते आणि त्याला केंद्र सरकारचे अनुदान मिळते.
सूत्रांनी सांगितले की अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ते लंडन दौर्यावरून परत आल्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे.