‘हिवरगाव’ होणार ‘हिरवंगार गाव’,

0
996

‘हिवरगाव’ होणार ‘हिरवंगार गाव’,
करमाळा तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम

जलबिरादरीचे प्रमुख डॉ.राजेंद्रंसिहजी मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरीतील अधिवेशनास आले तेव्हा त्यांनी प्रत्येक तालुका पत्रकार संघाने एक गाव दत्तक घेऊन तेथील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी सूचना केली होती.अधिवेशनास दीड हजारावर पत्रकार उपस्थित होते . त्यातील किती पत्रकारांनी राजेंद्रसिहजी यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले सांगता येणार नाही.करमाळा तालुका पत्रकार संघाने मात्र राजेंद्रसिंहजी यांच्या आवाहनापुर्वीच करमाळ्यापासून पाच किलो मिटर अंतरावर असलेलं 700 लोकवस्तीचं हिवरगाव (किंवा हिवरवाडी) दत्तक घेऊन जिल्हयातील एक मॉडेल गाव बनविण्याचा संकल्प सोडलेला आहे.केवळ संकल्प सोडूनच पत्रकार संघ थांबलेला नाही तर गावच्या विकासालाही त्यांनी प्रारंभ केलेला आहे..”हिवरगाव भविष्यात हिरवगार गाव” बनविण्याचा करमाळा तालुका पत्रकार संघाचा प्रयत्न आहे.परिषदेला याचा नक्कीच अभिमान आहे.कारण त्यांचा हा प्रकल्प पुढील काळात महाराष्ट्रासाठी एक आदर्श आणि पत्रकारांच्या सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण ठरणार आहे.
करमाळा तालुका तसा दुष्काळी भाग.400 मिली मिटर देखील पाऊस पडतो की नाही माहिती नाही.त्यामुळं सर्वत्र पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवते.काही वर्षापुर्वी कुकडीच्या धरणातून करमाळ्याला पाणी येणार असं चॉकलेट दाखविलं गेलं.त्यासाठी कॅनॉलही खोदला गेला मात्र दहा वर्षे झाली या कॅनॉलमध्ये एकदाही पाणी सोडलं गेलं नाही.हा कॅनॉल आजही करमाळ्याच्या जनतेला वाकुल्या दाखवत कोरडा पडलेला आहे.शरद पवार माढ्यातून उभे राहिले,या परिसरात मोठी इन्ड्स्ट्री आणण्यासोबतच कुकडीचं पाणी करमाळ्याला देण्याच्या थापा मारल्या गेल्या.यापैकी काहीच झालं नाही..कॅनॉलला पाणीही सोडलं गेलं असतं तर करमाळ्याचा परिसर सुजलाम सुफलाम झाला असता.दुदैर्वानं तसं होऊ दिले गेले नाही.त्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न संपूर्ण तालुक्यासमोर उभा आहे.पत्रकार संघानं जे हिवरगाव दत्तक घेतलं आहे तिथंही पाण्याचा प्रश्‍न आहेच.तो भेडसाऊ नये म्हणून जलयुक्त शिवारची काही कामं पत्रकार संघाच्या पुढाकाराने केली गेली आहेत.पाऊस झाला असता तर बर्‍याच ठिकाणी पाणी दिसले असते.पण पाऊसच न पडल्यानं कामं झाली तरीही पाणी नाही अशी स्थिती आहे.हिवरगावमध्ये विकासाची इतर अनेक कामं पत्रकार संघाच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत.हिवरगाव निर्मलगाव करण्याचा पत्रकार संघाचा आता प्रयत्न आहे.पत्रकार संघाच्या या प्रयत्नांना गावकर्‍यांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे..करमाळा तालुका पत्रकार संघ शासकीय पातळीवर पाठपुरावा करते,गावात योजना घेऊन येते,गाव पातळीवरच्या विविध योजना गावात येतील यासाठी प्रयत्न करते आणि ग्रामस्थ त्या योजना राबवून घेण्याचा प्रयत्न करतात.पत्रकार आणि ग्रामस्थ यांच्यात एक चांगला समन्वय निर्माण झालेला आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात हिवरगावचा कायापालट झालेला दिसेल यात शंकाच नाही. काल मंगेश चिवटे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक कांबळे तसेच सुनील वाळुंज यांच्या समवेत हिवरगावला भेट देऊन तेथे पत्रकारांनी केलेल्या कामाची पाहणी कऱण्याचा योग आला.नक्कीच आनंद आणि समाधान वाटले।
पत्रकार संघाच्या माध्यमातून देवीच्या मंदिरातही मंदिराची माहिती देणारे होर्डिग्ज लावली गेली आहेत.त्याचा फायदा येणार्‍या भाविकांना मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी होतो.मंगेश चिवटे यांनी मंदिराची माहिती देणारे पुस्तकही लिहिले आहे.पत्रकारांसाठी कार्यशाळा,परिसरातील, मान्यवरांचा “करमाळा रत्न” म्हणून गौरव करण्याचा उपक्रमही पत्रकार संघ दरतीन वर्षाने राबवत असते.यापुर्वी चंदिगडचे कलेक्टर अजीत जोशी,पत्रकार संजय आवटे तसेच इतर काही मान्यवरांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला आहे,यंदा आयएएस होऊन आंध्रपदेशात कार्यरत असलेल्या मंजुळे यांचा गौरव करणयाचा पत्रकार संघाचा मानस आहे.
करमाळा तालुका पत्रकार संघ हा मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न पत्रकार संघ आहे.महेश चिवटे हे या संघाचे अध्यक्ष आहेत.तालुका पत्रकार संघाचे सदस्य म्हणून ते परिषदेचेही सदस्य आहेतच.त्यांचे वडिल नरसिंह चिवटे हे देखील परिषदेचे सदस्य असून त्यांचे आजोबा देखील परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत.म्हणजे चिवटे घराण्याच्या तीन पिढ्या परिषदेशी जोडल्या गेलेल्या आहेत.परिषदेला नक्कीच चिवटे घरण्याचा अभिमान आहे.पत्रकारांच्या अनेक संघटना निर्माण झाल्या तरीही चिवटे घराण्याची परिषदेवरील निष्ठा ,जराही कमी झालेली नाही.स्वतः नरसिंह चिवटे हे परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनास उपस्थित असतात,राज्यातील परिषदेचे ते सक्रीय कार्यकर्ते आहेत.बिहार प्रेस बिलाच्या विरोधात मराठी पत्रकार परिषदेने तेव्हा सोलापुरात आंदोलन केलं होतं.त्यात ज्या 81 पत्रकाराना अटक आणि तुरुंगवास भोगावा लागला होता त्यात नरसिंह चिवटे यांचाही समावेश होता.. त्यांचीही काल बर्‍याच दिवसांनी भेट झाली तेव्हा ते बिहार प्रेस बिल विरोधी आंदोलनाच्या आठवणी भरभरून सांगत होते.(एसेम)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here