चित्तरंजन पंडित गेल्याची बातमी काल मुंबईत कळली.वाईट वाटलं.चं.प भिशिकर,मा.गो.वैद्य यांच्या परंपरेतल्या एका चतुरस्त्र संपादकांना आपण गमविल्याचं दुःख झालं.कमालीचा शिस्तप्रिय,रोखठोक भूमिका मांडणारा कडक शिस्तीचा पण तेवढाच सहकार्यांवर प्रेम करणारा संपादक म्हणून चिदपंं माझ्या तरी कायम स्मरणात राहिले आहेत.तरूण भारतमध्ये दर गुरूवारी दुपारी बारा वाजता बैठक व्हायची.बैठकीस कोणी एक मिनिटही उशिरा आलेलं त्यांना चालायचं नाही. बारा वाजून एक मिनिटांनी आलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढल्याचे मला आठवते.रोजचा सारा अंक ते वाचून काढत.त्यामुळं बारीक सारीक चुकाही त्यांच्या नजरेतून सुटत नसत. मग चुका करणारांची खैर नसायची.गुरूवार म्हणजे काही उपसंपादकांना घातवार वाटायचा.बैठकीच्या दिवशी तरूण भारतमध्ये संचारबंदी असायची.बैठकीच्या अगोदर आम्ही चर्चा करायचो आज कुणाची सालटी सोलली जाणार म्ङणून. पंडित चुका करणार्यांना फाडून खात.पण चांगलं काम कऱणाऱाचं ते तोंड भरून कौतुकही करीत.मला त्याचा दोन वेळा अनुभव आला.मी सोलापूरला असताना एकदा चिवरीच्या यात्रेची बातमी दिली होती.ती पंडित यांना एवढी आवडली की,ती त्यांनी पुणे आवृत्तीत पहिल्या पानावर पहिल्या दोन कॉलममध्ये उभी छापली.तरूण भारतमध्ये माझं नाव एस.एम.देशमुख असं छापलं जायचं नाही.सूर्यकांत देशमुख असं छापलं जायचं.या नावानं 1985 मध्ये छापून आलेली बातमी आजही माझ्या संग्रही आहे.बातमी वाचून माझं कौतूक करणारं सविस्तर पत्र पंडितांनी मला सोलापूरला पाठविलं.केवळ पत्रच पाठविलं नाही तर माझे दोन इन्क्रीमेंन्टही वाढवून दिले.दुसर्या एका बातमीबद्दलही त्यांनी असंच कौतुकाचं पत्र मला पाठविलं होतं.यह आकाशवाणी आष्टी है या शिर्षकाखाली ती बातमी प्रसिध्द झाली होती.ही दोन्ही पत्र मी जपून ठेवली आहेत.म्हणजे केवळ फटकारणे एवढाच विषय नव्हता तर चांगलं काम कऱणार्यांना ते प्रोत्साहनही देत.त्यांचं अक्षर मोत्यांसारखं होतं आणि सही पल्लेदार होती.त्याचं ते टपोरं अक्षर आजही माझ्या स्मरणात आहे.त्याचं व्यक्तीमत्वच असं होतं की,त्यांच्याबद्दल आपोआप आदर निर्माण व्हायचा.भितीही वाटायची.त्यांच्या लेखणीचा,विचाराचा,वर्तवणुकीचा हा दरारा होता.
पंडित हे एक सिध्दहस्त संपादक होते.हार आणि प्रहार हे त्याचं सदर तेव्ही भिशिकरांच्या सदराएवढंच तरूण भारतच्या वाचकांत लोकप्रिय होतं.सदराखाली चिदपं असं नाव ते देत.तरूण भारतमधील माझ्या पिढीतले निरंजन आगाशे,चंद्रहास मिरासदार,राजीव खांडेकर,मंजिरी जोगळेकर-दामले ही तरूण मंडळी आवर्जुन पंडितांचे अग्रलेख आणि सदरं वाचीत असू.त्याच्या लिखाणाचा आमच्या पुढील प्रवासात नक्कीच आम्हाला लाभ झालेला आहे.आम्ही नंतर पत्रकारितेत जे थोडं फार काम करू शकलो त्यात तरूण भारतमधील या दिवसांचा नक्कीच मोठा वाटा होता आणि आहे हे नाकारता येणार नाही.
ंमी तरूण भारतमध्ये रूजू झाल्यानंतर दोन वर्षानी पंडित निवृत्त झाले.त्यानंतर कधी त्यांची भेट झाली नाही.ते कुठं असतात हे देखील कळलं नाही.मी देखील तरूण भारत सोडून सारा महाराष्ट्र भटकत राहिलो.या प्रवासात पंडित विस्मृतीआड गेले नसले तरी त्याची स्मरण होण्यचंही कााही कारण उरलं नव्हतं.त्यामुळं परवा बातमी वाचली तेव्हा हे सारं आठवलं.त्यानी माझा इन्टरव्हू घेताना मी जे उध्दटपणाचं उत्तर दिलं होतं ते ही आठवलं.परंतू माझ्या उध्दट उत्तरातही त्यांना माझा आत्मविश्वास दिसला आणि नंतर माझ्या कामातून मी त्यांच्या पसंतीस उतरलो.परंतू जास्त दिवस त्यांच्या हाताखाली काम मात्र करता आलं नाही.ते गेल्यानंतर विद्याधर ताठे यांना फोन केला.पंडित मुंबईत होते आणि त्याचं वय 92 वर्षाचं होतं असं त्यांनी सांगितलं.जुन्या आठवणी आम्ही दोघांनीही शेअर केल्या.चांगल्या संपादकांच्या हाताखाली काम करायला मिळणं हे देखील भाग्य असतं आम्ही त्या अर्थानं भाग्यवान ठरलो.
एसएम