रायगड जिल्हयात ग्रामसेवकांची तब्बल 79 पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होताना दिसते आहे.
रायगड जिल्हयात 834 ग्रामपंचायती असून त्यासाठी 687 ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्यांची पदे मंजूर आहेत.मात्र त्यातील 608 पदेच भरली गेली आहेत.उर्वरित रिक्त पदे भऱण्यास शासकीय स्तरावर उदासिनता दिसून येत असल्याने एक एका ग्रामसेवकाकडे दोन-दोन ,तीन-तीन पंचायतींचा कारभार सोपविला गेला आहे.ग्रामपंचायत स्तरावर सध्या विविध योजना राबविल्या जातात.त्यात यशवंत ग्रामसमृध्दी योजना,रोजगार हमी योजना,मुद्रांक शुल्क अनुदान ,पंतप्रधान स्वच्छता अभियान या योजनांची अंमलबजावणी कऱण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असते.त्याच बरोबर पंचायतीची नैमित्तिक कामेही असतात.मात्र रिक्त जागांमुळे ग्रामसेवकांवर ताण पडत असून जनतेच्या कामांचाही खोळंबा होत आहे.त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्तपदे तातडीने भरली जावीत अशी मागणी केली जात आहे.