पनवेल: पनवेल येथील दैनिक कर्नाळा या दैनिकाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात घडला आहे.शनिवारी रात्री १० च्या सुमारास शिरढोण गावातील तीन युवकांनी योगेश मुकादम या २६ वर्षीय पत्रकाराला मारहाण केली.व जीवे मारण्याची धमकी दिली.वर्तमान पत्रात बातमी दिल्याचा राग मनात ठेऊन या तिघांनी योगेश मुकादम यास मारहाण केली.
पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.अशा पत्रकारांवर हल्ला होणे ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी व दुर्दैवी गोष्ट आहे.पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.समाजातील सर्व चांगल्या,वाईट गोष्टींचे लेखन तो आपल्या लेखणीतून करत सतो.मात्र काही समाजकंटक याच पत्रकाराना आपला निशाणा बनवतात.व त्यांच्यावर हल्ला करतात.असाच प्रकार शनिवारी रात्री शिरढोण येथे घडला.कर्नाळा या वर्तमानपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करणारा योगेश मुकादम शनिवारी रात्रीच्या वेळी शिरढोण येथील घरी जात असताना गावातील यतिन बाळाराम भोपी,कुंदन मुकादम,रविराज ठाकूर या तिघा जणांनी रस्त्यात अडवले.व दिल्ली पब्लिक स्कूलच्या विरोधात बातमी का दिलीस अशी विचारणा केली व मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यापुढे गावातील कोणतीही बातमी द्यायची नाही,तसेच द्यायची असेल तर आम्हाला विचारायचे,असे धमकावले व जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच गाडीखाली ढकलून देण्याचा देखील प्रयत्न केला.यावेळी योगेशच्या मदतीला गावातील काही ग्रामस्थ धावून आल्याने योगेशचा जीव वाचला.याविरोधात रविवारी (ता.११) रोजी सकाळी या गाव गुंडांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिरढोण येथील दिल्ली पब्लिक स्कूल मुळे येथील ग्रामस्थांवर अन्याय होत असल्याची बातमी दैनिक कर्नाळा मध्ये प्रसिध्द झाली होती.त्याचा राग मनात ठेऊन या तिघांनी योगेशला शनिवारी मारहाण केली.या साऱ्या प्रकाराचा पनवेलच्या पत्रकारांनी निषेध नोंदविला असून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली.पेण,कर्जत,माणगाव या ठिकाणी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.या बाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी आरोपींना ताबडतोब पकडले जातील असे आश्वासन दिले.व भविष्यात पनवेलमध्ये असा कोणी पत्रकारांना दमदाटी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिला.