शशिकांत पाटील यांच्यावर हल्ला

0
929

माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर यांच्या लातूरमधील स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन स्कूल मधील वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना चक्क शौचालय  बाथरूम साफ करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. या प्रकाराची माहिती विद्यार्थी-पालकांनी झी मिडियाला दिल्यानंतर माहिती घेण्यासाठी गेलेले  लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना धक्काबुक्की करीत त्यांच्यावर बंदूक रोखण्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे.आदिवासी विद्यार्थ्यांची आणि लोकशाहीतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यमांची लातूरमध्ये गळचेपी सुरु असल्याचेच यावरून दिसून येत आहे.

    १९९५ मध्ये आमदार झालेल्या शिवाजी पाटील कव्हेकर यांची ही जेएसपीएम संस्था. या संस्थे अंतर्गत स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन स्कूल असे या संस्थेचे नाव.आदिवासी मुलांसाठीच्या या शाळेच्या परिसरातच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून ही शाळा आणि वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी एका छळ छावणी सारखी झाली आहे. कारण येथील विद्यार्थ्यांना वसतिगृहातील शौचालय आणि बाथरूम साफ करायला लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार खुद्द विद्यार्थ्यांनी झी मिडियाला सांगितलय. तसेच  विद्यार्थ्यांना पाणी टंचाईचे कारण पुढे करत त्यांना अंघोळीसाठी पाणीही दिले जात नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे त्वचेचे आजार, ताप, खोकला असे आजार आढळून आले. तर निकृष्ठ दर्जाचे जेवणही विद्यार्थ्यांना दिले जाते.मात्र शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांना दवाखान्यात उपचार सुद्धा केले नसल्याचा आरोप यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी केलाय.
मात्र हा सर्व प्रकार झी मिडियाचा कॅमेरा टिपत असताना चवताळलेल्या सुरक्षा रक्षकाने झी मिडियाचे लातूर प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्यासोबत धक्काबुक्की करीत कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला. माध्यमांचा आवाज दाबण्याचा या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे चिडलेल्या सुरक्षा रक्षकाने झी मिडियाचे लातूर प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्या अंगावर बंदूक रोखून धरली. त्यानंतर उपस्थित पालकांनी हा प्रकार हाणून पाडला. त्यामुळे सुदैवाने कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
या सर्व प्रकारानंतर उपस्थित पालकांनी शाळेच्या गेटजवळ शाळा प्रशासनाचा निषेध केला. तसेच आपले विद्यार्थी आपण घरी घेवून जाण्याचा निश्चय केलाय. याविषयी माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरापुढे बोलण्यास असमर्थतता दर्शविली.एकूणच शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरमध्ये एका माजी आमदाराच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची अक्षरशः छळ छावणी सारखे हाल होत आहेत. तर याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यमांवर चक्क बंदूक रोखून धरत असतील हा माध्यमातील लोकशाहीवरील हल्लाच असून याचा सर्व स्तरातून निषेध होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here