ठाणे : प्रतिनिधी
डान्स बारवर पडलेल्या छाप्याची बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराला डान्सबार वाल्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच डान्सबार विरुद्ध बातमी प्रसिद्ध का केली याची फोन वरून विचारणा करतांनाच त्या फोनची रेकॉर्डिंग करून ग्रुपवर टाकण्याचा प्रताप चक्क ठाणे पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने केला आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्या रस्त्याने जातात? कधी जातात? अशी सगळी माहिती संबंधित पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्याने संबंधित पत्रकाराकडून घेतल्याने व ती सर्व माहिती रेकॉर्ड केल्याने ही रेकॉर्डिंग नेमकी कुणाला पाठवण्यात येणार होती? असा सवाल उपस्थित होत आहे.
दैनिक पुढारीचे क्राईम रिपोर्टर नरेंद्र राठोड यांनी २० जुलै रोजी शिळडायघर मध्ये छमछम पुन्हा जोरात या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याच शिळडायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापूर्वी एका डान्सबार वर पडलेल्या छाप्यात एक डायरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हाती लागली होती. त्या डायरीत पोलीस हप्ते घेत असल्याची नोंद आढळून आली होती. याची दखल घेवून ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी तब्बल ५८ पोलिसांच्या मुख्यालयात बदली केली होती. या कारवाई नंतर देखील बार पुन्हा सुरु झाल्याचे सविस्तर वृत्त संबंधित बातमीत प्रसिद्ध करण्यात आला होता. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ठाणे पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी गजानन काब्दुले यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता फोन केला आणि बार विरुद्ध बातमी प्रसिद्ध का केली याबाबत जाब विचारला. इतकेच नव्हे तर संबंधित पत्रकार कुठल्या रस्त्याने घरी जातो, किती वाजता जातो अशी सविस्तर माहिती घेवून त्याची रेकॉर्डिंग केली व ती एका ग्रुपवर टाकली. मात्र ही रेकॉर्डिंग चुकून पत्रकारांच्याच ग्रुपवर पडल्याने जनसंपर्क अधिकाऱ्याचा बनाव उघड झाला. पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्याने संबंधित पत्रकाराला तू कार्यालयातून कधी जातोस, किती वाजता जातोस, कोणत्या रस्त्याने जातोस? असे विचारण्याचे कारणच काय ? आणि ते ही रेकॉर्डिंग कोणाला पाठवणार होते याबाबत सवाल उपस्थित होत आहे. मात्र मीरा रोडची पत्रकार हत्येची घटना ताजी असतांनाच असा धक्कादायक प्रकार दस्तुरखुद पोलीस अधिकाऱ्याकडून झाल्याने या घटनेचा सर्व पत्रकारांनी निषेध केला आहे.