मुंबई : सांताक्रूझमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मीरा रोड परिसरात तीन पत्रकारांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह मीरा रोड परिसरात आढळला आहे. तर अन्य दोन पत्रकार जखमी झाले आहेत. राघवेंद्र दुबे असं मृत्यू झालेल्या पत्रकाराचं नाव आहे. दुबे हे मीरा भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक होते.शशी शर्मा आणि संतोष मिश्रा जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तरपोलिसांनी एका बारवर टाकलेल्या धाडीची बातमी कव्हर करण्यासाठी हे पत्रकार गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.
काय आहे प्रकरण?
मीरा भाईंदर रोडवर असलेल्या व्हाइट हाऊस बिअर बारवर पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. रात्री 1 वाजता पोलिसांनी ही छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी 15 मुलींना ताब्यात घेतलं होतं. यावेळी शशी शर्मा आणि संतोष मिश्रा हे पत्रकार बारवरील धाडीच्या वार्तांकनासाठी गेले होते. मात्र त्यावेळी दोघांवरही हल्ला झाला. या दोघांवर हल्ला झाल्याची तक्रार देण्यासाठी पत्रकार राघवेंद्र दुबे हे मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये अनेक बारमालक उपस्थित होते. त्यावेळी पोलिस, बारमालक आणि दुबे यांच्यात बाचाबाची झाल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर पहाटे पाचच्या सुमारास राघवेंद्र दुबे यांचा मृतदेहच आढळून आला. एस.के. स्टोन चौकीजवळ राघवेंद्र मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. आजच्या घटनेचा निषेध कऱण्यासाठी विधीमंडळात काम करणार्या पत्रकारांनी दंडाला काळ्या फिती लावून काम केले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पत्रकाराची हत्त्या करणार्या गुंडांना अटक करण्याची पत्रकार सुरक्षा कायदा कण्याची मागणी केली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला आहे.