सुहाना सफर …25 वर्षांचा

0
945

सुहाना सफर …25 वर्षांचा

बघता,बघता आज पंचवीस वर्षे झाली.हे 9,125 दिवस कसं निघून गेले कळलंच नाही.सुरूवात तर खडतर झाली होती.लग्नाची तारीख ठरल्यानंतर पाचच दिवसांनी नौकरी गमवावी लागली .लग्नाची पत्रिका घेऊन व्यवस्थापकांकडं गेलो तर  त्यांनी माझ्या हाती टर्मिनेशन ऑर्डर ठेवली.वरती झालेल्या महिन्याचा पगारही दिला नाही.खिश्यात दमडी नव्हती.अशा स्थितीत लग्न करून शोभनाला अडचणीत आणणं जिवावर येत होतंं”तिला फोन केला.नोकरी गेलीय,परत विचार कर” असं बजावलं.मात्र “नोकरी गेली तर गेली आपण ठरलेल्या तारखेला लग्न क रूच” असं तिनं सांगितल्यानं विश्वास थोडा बळावला.औरंगाबादहून गावाकडं गेलो,माझी नोकरी गेल्याची वार्ता अगोदरच तेथे धडकली होती.मग पोरीच्या पायगुणाची चर्चा होणं अटळ होते .लग्न जमताच हे संकट तर पुढं आयुष्यात काय काय वाढून ठेवलंय म्हणत आईची काळजी वाढली होती.त्यातच वडिलांचा लग्नाला विरोध.म्हणतात ना,नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न .आमचं असंच चाललं होतं.अखेर ठरल्या तारखेला म्हणजे 13 मे रोजी एकदाचं शुभमंगल झालं.माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्यावर अक्षता पडल्या.हा योगायोग होता.

लग्न करून परत औंरंगाबादला आलो.रिकाम्या खिश्यानंच.नव्या नवरीला सकाळचा चहा मिळणंही मुश्कील होतं.एक वर्ष आम्ही दोघांनी कसे  काढले असेल  ते आमच्या आम्हाला माहित.घरात अशी अवस्था आणि कंपनीच्या विरोधात कोर्टात गेलेलो असल्यानं कोर्ट कचेऱ्यासाठी लागणारा पैसा वेगळा.मित्रांची मदत होत होती.असेच बारा महिने निघून गेले.औरंगाबादहून नांदेडला आलो.संकटं काही आमचा पिच्छा  सोडत नव्हती. शोभनाची खंबीर साथ होती.त्यामुळं ही संकंटं कधीच गाभीर्यानं घेतली नाहीत. आपला नवरा एक हाडाचा पत्रकार आहे आणि त्याची काही तत्वं आहेत हे तिला एव्हना कळल्यानं तीनं कसलाच हट्ट केला नाही.जे मिळेल ते आनंदानं स्वीकारलं.नांदेडलाही अनेक चढ-उतार पहावे लागले.ताब्याचा बंब,गॅस सिलेंडर विकून काही दिवस काढले.तेही दिवस सरले,अलिबागला आलो,तिथं अठरा वर्षे आनंदात गेले.मस्त काम केलं.भरपूर फिरलो.लिहिलं,वाचलं.शोभनाही पत्रकारिता करीत होती,आहे.आज सारं व्यवस्थित आहे.मुलं चांगली शिकली.मोठा नौकरीला लागला.मी रिकामटेकडे उद्योग करायला आणखी रिकामा झालो.पत्रकारांचे प्रश्न वगैरे ‘थॅक लेस‘ काम करीत आहे.कोणी काहीही म्हटलं तरी मला हे आवडतं.मी करतो.करीत राहणार आहे.

पंचवीस वर्षांचा हा सारा प्रवास आम्ही दोघांनीही मस्त एन्जॉय केला हे नक्की.जीवनात चढ-उतार आल्याशिवायही मजा नाही.माणसंही कळत नाहीत.कठीण प्रसंगी जवळची माणसं दूर जातात आणि ज्याच्याकडून काही अपेक्षा केलेली नसते अशी माणसं मदतीला धाऊन येतात माझ्या बाबतीत अनेकदा हे असं झालयं.त्याशिवायही अनेकांची मदत झाली.रायगडमध्ये सर्वच तरूण पत्रकारंानी माझ्यावर मनस्वी प्रेम केलं.राज्यात माझ्यावर ‘आपला हक्काचा  माणूस’ समजून प्रेम करणारे असंख्य पत्रकार आहेत.व्यवहारात मी शुन्य आहे.मला तो कधीच कळला नाही.त्यामुळं काही मिळवायचं जमलं नाही.पण मोठा मित्र परिवार मला जोडता आला.राज्यातल्या 350 तालुक्यात मला ओळखणरे पत्रकार आहेत.त्यांचा माझ्यावर विश्वासही आहे.सर्वत्र अविश्वासाचं वातावरण असताना मी ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायातील मंडळींचा हा विश्वासआणि प्रेम,आपलेपणा मला लाख मोलाचा वाटतो.मी सर्व पत्रकार मित्रांचा मनापासून आभारी आहे.

पंचवीस वर्षांच्या या प्रवासात मोडून पडावं,असे अनेक प्रसंग आले.आता सारं संपलं,आपणही संपलो अशीही वेळ आली,दहा-दहा पैश्यासाठी तरसणं कश्याला म्हणतात ते  अनुभवलं,आणि लाख रूपये पगार घेतानाचा आनंदही उपभोगला.या साऱ्या चढउतारात माझी पत्नी शोभना माझ्या पाठीशी नसती तर आज जे थोडं फार अस्तित्व मला निर्माण करता आलं ते मी करू शकलो नसतो.तिनं सारं घर पेललं.मुलांना  शिकविलं.दोघांनाही चांगलं शिक्षण दिलं.त्यांच्या शाळेतल्या बैठकांपासून प्रवेश्यापर्यत तीच सारं बघायची.घरची जबाबदारी कधीच मला घ्यावी लागली नसल्यानं मी बाहेरच्या उठाठेवी करू शकलो.पत्रकार संघटनेचं काम असेल,मुंबई-गोवा रूंदीकरणासाठीचं आंदोलन असेल किंवा नागपूरच ं उपोषण.सेझ विरोधी लढा असेल,रायगडातील शेतकरी-भूमीपूत्रांच्या हक्काचे लढे असतील,पाणी वाटपाचा प्रश्न असेल नाही तर विमानतळ विरोधी आंदोलनं असतील शोभनानं मला कधी अडविलं नाही किंवा टोकलं नाही.बाकी काही नसलं तरी आपल्या नव़ऱ्याला लोकांसाठी भांडण्याचं व्यसन आहे याची तिला कल्पना होती.त्यामुळं माझं हे व्यसन तिनं प्रेमाने  जपलं.मी आज जो काही आहे तो केवळ माझी पत्नी शोभनामुळं.प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागं एक स्त्री असते असं म्हणतात,मी यशस्वी आहे की नाही मला माहित नाही पण मी आनंदी आहे आणि त्याचं कारण शोभना आहे.शोभना खरंच मी तुझा मनापासून आभारी आहे.मला सांभाळल्याबद्दल.मला साथ दिल्याबद्दल.

आमचा प्रेम विवाह.हे प्रेम गेल्या पंचवीस वर्षात फुलत गेलं आहे.वाढत गेलं . पंचवीस वर्षातील हे सारे प्रसंग आज एखादया चलचित्राप्रमाणं डोळ्यासमोर उभी आहेत.सुरूवात खडतर झाली असली तरी पिक्चरमधल्या सारखा शेवट गोड झाला हे नक्की.आज मी कृतार्थ आहे.माझ्या सारखा सुखी,आनंदी कोणी नाही.जीवनाच्या या प्रवासात अनेकांची मदत झाली.हाक दिल्यानंतर अनेकजण धाऊन आले.अशा सर्व मित्रांचे मनापासून आभार.आज लग्नाचा पंचवीसावा आणि माझा 55 वा वाढदिवस साजरा करीत असताना एकच मागणं आहे,पत्रकार पेनशन योजना आणि पत्रकार संरक्षण कायद्यासाठी आपण जो लढा उभारलाय तो यशस्वी व्हावा.कारण मी अनेक निवृत्त पत्रकारांच्या हालअपेष्टा पाहिल्यात.त्यांना मदतीची खरोखरच गरज आहे.एक ट्रस्ट स्थापन करून निवृत्त आणि गरजू पत्रकारांना मदत करण्याची कल्पना आहे.त्याला कधी मुहूर्त लागतो कोण जाणे? .पण करायचंय नक्की.तुर्तास आपणासर्वांचे मनःपूर्वक आभार.प्रेमाचा हो ओलावा कायम राहावा एवढीच मनोकामना.

एस.एम.देशमुख

13 मे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here