तरूण पत्रकाराचा अवेळी मृत्यू

0
1106

सामनाचे पालघर येथील तरूण पत्रकार नामदेव गरूड याचं ह्रदयविकारानं निधन झालं आहे.धक्का देणारी ही बातमी आहे.अर्थात ही घटना पहिली नाही.मध्यंतरी लोणावळा येथील प्रवीण कदम नावाच्या तरूण पत्रकाराचा असाच ह्रदयविकारानं मृत्यू झाला होता.अशी एखादी बातमी आली की,आपण काय करतो आरआयपी हे तीन अक्षर टाइप करतो,थोडा वेळ असेल तर फुलं वाहतो आणि इतिकर्तव्य सपल्याचं समाधान मानत हॉटसंऍप वरील अन्य मेसेज वाचत बसतो.मात्र एखादा तरूण पत्रकार जातो तेव्हा त्याचं कुटुंब रस्त्यावर येतं हे आपण विसरतो,विसरलो नाही तरी त्यासाठी काही करीत नाही.मध्यंतरी औरंगाबादचा पत्रकार रमेश राऊत स्वाईन फ्लयूनं गेला.कुटुंबाची वाताहात झाली.कोणी मदतीला आलं नाही.नाही सरकार,नाही पत्रकार.असं अनेकांच्या बाबतीत घडतं.सरकारकडून आता अपेक्षा कऱण्यासारखी स्थिती नाही.आपणच आपल्यासाठी काही करावं लागेल.रायगडमध्ये प्रकाश काटदरे काविळंनं गेले.कुटुंब निराधार झालं.रायगडमधील पत्रकारांनी 51 हजारांचा निधी उभारला.काही दिवसांपुर्वी साताऱ्यात एका पत्रकाराचं निधन झालं.सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पटणे यांच्या पुढाकारानं लाख रूपये जमा करून संबंधित पत्रकाराच्या कुटुबियाना मदत केली गेली. रत्नागिरीतही अशीच मदत एका पत्रकाराच्या नातेवाईकाला तेथील पत्रकारांनी एकत्र होत दिली . मात्र रमेश राऊत असेल,किंवा नाशिकचे सुरेेश अवधूूत असतील यांना सरकारची किंवा पत्रकारांची मदत झाल्याचं किमान माझ्या तरी ऐकिवात नाही.अवधूत,रमेश राऊत,प्रवीण राऊत यांच्याप्रमाणेच अनेक मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना समाजानं,सरकारनं आपण पत्रकारांनीही वाऱ्यावर सोडलं आहे.हे ठीक नाही.
गरूड यांची पत्रकारितेवर किती निष्ठा होती,गरूड म्हणजे पालघर विभागातील चालता बोलता इतिहास होते अशा भावना गरूड यांच्या एका मित्रानं व्हॉटसऍपवर व्यक्त केल्या आहेत.अशा स्थितीत पत्रकारितेवर कमालीची निष्टा असलेल्या आणि तेवढ्याच निष्ठेनं पत्रकारिता कऱणा़ऱ्या गरूड यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देणं हे पालघर आणि परिसरातील पत्रकारांचे कर्तव्य आहे असं मला वाटतं.ही मदत आय़ुष्यभर पुरणारी नक्कीच नसते पण आपल्या पत्रकार पतीच्या निधनानंतर आपण एकटे नााहीत आहोत हा विश्वास मृत कुटुबांच्या मनात निर्माण करण्यासाठी ही मदत आवश्यक असते.दोन गोष्टी आहेत.एक तर गरूड यांना मी प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी ते निष्ठावान पत्रकार आहेत म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसणार हे ओघानं आलंच.दुसरी गोष्ट त्यांच्याकंडं अधिस्वीकृती पत्रिका ( पत्रकारितेचा पासपोर्टच म्हणा ना ) नसणारच. म्हणजे सरकारी मदतही त्यांना मिळणार नाही अशा स्थितीत आपल्या एका सहकाऱ्याला केवळ श्रध्दांजलीच वाहून मोकळे व्हायचे की,त्यांच्या कुटुंबाला मदत करून त्यांना खऱ्या अर्थानं श्रध्दांजली अर्पण करायची याचा निर्णय प्रत्येक पत्रकारानं घेतला पाहिजे.रायगडच्या पत्रकाराचं उदाहरण मी वारंवार यासाठी सांगतो की,तिथं सारे पत्रकार एका कुटुंबाच्या भावनेनं वागतात.तीच भावना महाराष्ट्रभर निर्माण झाली पाहिजे असा प्रय़त्न असला पाहिेज.पत्रकारांचं आपसात पटणं कठीण असतं.हे मतभेद राहू द्या पण कोणी अडचणीत आलं तर मात्र मतभेद बाजूला ठेवत मदतीसाठी धावणं आवश्यक आहे.कारण आज कोणी जात्यात असेल तर कोणी सुपात असते हे प्रत्येकानंच लक्षात ठेवलं पाहिजे.
जाता जाता आणखी एक.मध्यंतरी आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेतली होती.त्याचा मला स्वतःला लाभ झाला.त्यावर काही पत्रकार मित्रांनीच अशी शिबिरं घेणं पत्रकार संघटनेचं काम आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत आम्हाला अपशकून कऱण्याचा प्रय़त्न केला होता.मला वाटतं जो घटक समाजासाठी आयुष्य वेचतो त्या घटकासाठी समाज काही करीत नसेल तर त्यानं स्वतःसाठी काही कऱणं चुकीचं नाही.सर्वच पत्रकार प्रकृत्तीबद्दल निष्काळजी असतात.त्याचा फटका बसतो. त्यामुळं वेळच्या वेळी आरोग्य तपासणी कऱणं पत्रकारांना आता आवश्यक झालं आहे.लोणावळ्यात ज्या पत्रकार प्रवीण कदमचं निधन झालं,त्याच्या छातीत महिनाभर अगोदर वेदना होत होत्या.आज डॉक्टरकडं जाऊ उद्या जाऊ करीत प्रवीणनं दुखणं अंगावर काढलं आणि एक दिवस सकाळी सहा वाजताच काही मिनिटातच त ो आपल्याला सोडून गेला.ही वेळ कोणावर येऊ नये यासाठी आम्ही 2014 प्रमाणंच दरवर्षी 3 डिसेंबरला महाराष्ट्र भर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेणार आहोत.सरकार ठराविक पत्रकारांना आजारी पडल्यावर मदत करते पण पत्रकार आजारी पडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे.त्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्र येत प्रयत्न कऱणं अगत्याचं झालं आहे.नामदेव गरूड यांच्या निधनानंतर तरी आपण सावध झालं पाहिजे.
गरूड यांना विनम्र श्रध्दांजली.

(SM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here