गांधीजी इंग्रजांचे एजंट होते!: काटजू

0
994

वादग्रस्त वक्तव्यांबद्दल ख्याती असलेले माजी न्यायमूर्ती व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी आता थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना लक्ष्य करून खळबळ उडवून दिली आहे. ‘महात्मा गांधी हे इंग्रजांचे एजंट होते आणि त्यांच्यामुळं भारताचं प्रचंड नुकसान झालं,’ असा सनसनाटी आरोप काटजू यांनी केला आहे.

आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये काटजू यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या काही घटनांचे दाखले देत गांधीजींवर जोरदार टीका केली आहे. ‘भारत हा धर्म, जात, पंथ व भाषांचे प्रचंड वैविध्य असलेला देश आहे. हे जाणूनच इंग्रजांनी येथे ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली. गांधीजींनी राजकारणात धर्म घुसवून त्यांना एकप्रकारे मदतच केली,’ असं काटजूंनी म्हटलं आहे.

काटजू म्हणतात…

> दक्षिण अफ्रिकेतून भारतात आल्यापासून ते मृत्यूपर्यंत गांधीजींनी आपल्या प्रत्येक भाषणांतून आणि लिखाणातून हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा प्रचार केला. रामराज्य, गोरक्षा, ब्रह्मचर्य, वर्माश्रम याच्या आधाराने विचार मांडण्यावरच त्यांचा भर होता. ‘मी सनातनी हिंदू आहे. वर्णव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. गायीची रक्षा करणं मला महत्त्वाचं वाटतं, असं गांधीजींनी स्वत: ‘यंग इंडिया’मध्ये लिहिलं होतं. गांधीजींच्या सभेत नेहमी ‘रघुपती राघव राजाराम…’ हे हिंदू भजन गायलं जायचं. हिंदूंविरोधात मुस्लिमांना चिथावण्यासाठी इंग्रजांना हे हवंच होतं.

> एखाद्या साधूनं किंवा स्वामीनं आपल्या आश्रमात बसून शिष्यांना धर्माबद्दल सांगणं समजू शकतो. पण एखादा राजकीय नेता दिवसरात्र हिंदू प्रथा-परंपरा व विचारधारेचा प्रसार करत राहिला तर सनातनी मुस्लिमांवर त्याचा काय परिणाम होईल? त्यावेळी नेमकं तेच झालं. गांधीजींच्या सनातनी विचारांमुळं मुस्लिम समाज मुस्लिम लीगसारख्या पक्षांच्या बाजूनं झुकला.

> इंग्रजांच्या विरोधात २०व्या शतकाच्या सुरुवातीलाच सूर्यसेन, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, अश्फाकउल्लाह, भगतसिंग, राजगुरू अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती. मात्र, गांधीजींनी चळवळीचा क्रांतिकारक मार्ग बदलून तिला सत्याग्रहाचे निरर्थक वळण दिले. इंग्रजांना त्याचा फायदाच झाला.

> नौखालीतील हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी स्वत: धावून गेल्याबद्दल काही लोक त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गातात. पण या हिंसाचारास तेच जबाबदार होते. सार्वजनिक सभांमध्ये धार्मिक विचार मांडून त्यांनीच एकप्रकारे त्यासाठी मदत केली होती. म्हणजे आधी घराला आग लावायची आणि मग ती विझविण्याचे नाटक करायचे, असंच आहे.

> ‘गांधींनी मांडलेली स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना ही गावखेड्यातील जातीवादाला प्रोत्साहन देणारी होती. त्याकाळी गावातील बहुतेक समजाघटक जमीनदार आणि सावकरांच्या मुठीत असल्यामुळं ती पूर्णत्वास येणं शक्य नव्हतं. औद्योगिकीकरणाला विरोध करून गांधींनी चरख्यावरील हातमागासारख्या तद्दन प्रतिक्रियावादी गोष्टींचा प्रचार केला. संपत्तीसाठी ‘विश्वस्त’ नेमण्याची त्यांची संकल्पना म्हणजे लोकांना फसविण्याचाच प्रकार होता.(मटा ऑनलाइन वृत्त) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here