सरकारच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन प्रणाली अंतर्गत इ-रूग्णालयासाठी रायगड जिल्हयातील अलिबागच्या सरकारी रूग्णालयाची निवड कऱण्यात आल्याने अलिबाग रूग्णालय हायटेक होण्याबरोबरच रूग्णालयाची आरोग्य सेवा आणि सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे.प्रायोगिक तत्वावरचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यातील अन्य जिल्हा रूग्णालयातही अशीच यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
आरोग्य व्यवस्थेमध्ये अधिक गुणवत्ता यावी,आणि रूग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी रूग्णालयाची कार्यप्रणाली पेपरलेस कऱण्याच्या उद्देशाने इ-रूग्णालायाची योजना आखली गेली असून त्यासाठी राज्यातून प्रायोगिक तत्वावर अलिबागची निवड कऱण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी 60लाख 94 हजार 353 रू पयांची सामुग्री उपवब्ध झाली आहे. त्यात 58 संगणकांचा समावेश आहे.नव्या व्यवस्थेनुसार आोपीडीत रूग्णांना केस पेपर काढावा लागणार नाही,रूग्णाची नोंद संगणकावर होईल,त्यानंतर त्याला एक युनिक आयडी कोड दिला जाईल.त्याच्यावर होणाऱ्या उपचाराचा सारा लेखाजोखा सर्व्हरमध्ये फिड होणार आहे.डिस्चार्ज देताना रूग्णाला फाईल दिली जाणार आहे.दररोज रूग्णालयात किती रूग्ण दाखल झाले,किती डिस्चार्ज झाले,किती रेफर झाले, कोणत्या वॉर्डमध्ये किती आणि कोणते रूग्ण आहेत याची माहिती एका क्लीकवर आता उपलब्ध होणार आहे.भविष्यात सारी रूग्णालये इ सेवेने जोडली गेल्यानंतर रूग्णाची केस हिस्टी्र देखील उपलब्ध होणार आहे.त्यासाठी सध्या जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर,कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.दोन महिने हे प्रशिक्षण सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांनी दिली.