मॅन ऑफ दि पीपल, हुतात्मा भाई कोतवाल

0
1500

स्वातंत्र्य लढ्यात अफाट शौर्य गाजवून आणि सर्वस्वाचं बलिदान देऊनही स्वातंत्र्योत्तर काळात   ज्याच्या वाट्याला उपेक्षाच आली अशा क्रांतिकारकांमध्ये माथेरान येथील विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील या भारत मातेच्या दोन सुपूत्रांचा प्राधान्यानं उल्लेख करावा लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट उपसणारे,त्यासाठी हसत हसत संसार वाऱ्यावर सोडून देणारे आणि अंतिमतः देशासाठी हौतात्म्य पत्करणा़ऱ्या भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना स्वातंत्र्योत्तर काळात योग्य न्याय मिळाला नाही . सरकार आणि समाजानेही त्यांच्या बलिदानाची, त्यागाची उपेक्षाच केली असं सखेद म्हणावं लागतंय.बॅरिस्टर अ.र.अंतुले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात स्वातंत्र्य लढ्यातील विरांची जी स्मारकं महाराष्ट्रभर उभारली त्यापैकी हुतात्मा भाई कोतवाल यांचं  एक स्मारक माथेरानमध्ये  उभारलं गेलं.हे स्मारक वगळता सरकारनं कोतवालांची ओळख नव्या पिढीला राहावी यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही.त्यामुळं भाई कोतवाल हे नाव जगासमोर फारसं आलंच नाही.भाई कोतवाल हे रायगडचे सुपूत्र.मात्र माथेरान,कर्जतचा परिसर सोडला तर जिल्हयात अन्यत्र नव्या पिढीतील किती युवकांना भाई कोतवालांचे नाव माहिती असेल हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.याचा खेद सरकारला किंवा सरकारी यंत्रणेला आणि राजकारण्यांना वाटण्याचं कारण नव्हतं.मात्र एका थोर स्वातंत्र्ययोद्याची समाज उपेक्षा करतोय याची बोच रायगडमधील पत्रकारांना नक्कीच  होती.म्हणूनच रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लबने एकत्र येत माथेरानकडं जाणाऱ्या चौकात नेरळ इ थं  हुतात्मा स्मारक उभारून कोतवाल आणि हिराजी पाटलांच्या स्मृती जतन कऱण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकारांनी उभारलेलं हे स्मारक भलेही भव्य-दिव्य नसेल पण मुख्य चौकात हे छोटसंच स्मारक असल्यानं येणाऱ्या जाणाऱे ति थं नतमस्तक होतात.जिल्हयातील पत्रकार 2 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणूज साजरा करतात.नेरळच्या स्मारकाजवळ भव्य कार्यक्रम आयोजित करून मान्यवरांचे व्याख्यान आणि गुणवंतांच्या सत्काराचा कार्यक्रमही आयोजित केला जातो.हा प्रय़त्न छोटासाच असला तरी त्यामागची प्रामाणिक तळमळ महत्वाची आहे.सरकारनं भाई कोतवाल यांचं छायाचित्र असलेलं पोस्टाचं तिकिट काढावं अशी पत्रकारंाची मागणी आहे.त्याची दखल कोणी घेत नाही.राजकीय पातळीवरही त्याचा पाठपुरावा होत नाही.एक आनंदाची घटना अशी घडतेय की,भाई कोतवालांच्या जीवनावर एक चित्रपट तयार होतोय.यापुर्वी अर्जुन या चित्रपटाची निर्मिती करणारे एफ.एम.इलियाज हा चित्रपट निर्माण करीत आहेत.या सिनेमामुळं  भाईचं अलौकिक कार्य तमाम मराठी जनतेपर्यत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

 भाई कोतवाल यांचा जन्म माथेरानमध्ये एका गरीब कुटुंबात झाला.1 डिसेंबर 1912 ही त्यांची जन्मतारीख.लहानपणापासूनच कुशाग्रबुध्दीचं वरदान लाभलेल्या भाईचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं.पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला गेले.पुणं हे त्याकाळी चळवळीचं शहर होतं.स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्वही लोकमान्यांच्या निमित्तानं पुण्याकडंच होतं.पुण्यातील या वातावरणाचा भाई कोतवाल यांच्या मनावर खोलपर्यत परिणाम झाला.झपाटलेलं वातावरण आणि मुळातच वाचनाची आवड असलेल्या भाई कोतवाल यांनी शालेय जीवनातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे 1857 चे स्वातंत्र्य समर वाचून काढले.शि.म.परांजपे यांचा ङ्काळङ्घही ते नियमित वाचत.काळमधील वक्रोक्तीपूर्ण लेख नव्या पिढीला विचारकरायला लावत.खुदीराम बोस,मदनलाल धिंग्रा,चाफेकर बंधू आदि क्रांतिकारकांच्या पुस्तकांचे आणि चरित्रग्रथांचे ते वाचन करीत.जोसेफ मॅझिनी,गॅरीबाल्डी यांच्या चरित्रांनीही त्यांच्या मनातील स्वातंत्र्याच्या उर्मी जाग्या केल्या.सेनापती बापटांचा मुळशीचा सत्याग्रह,तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर,चंद्रशेखर आझाद,भगतसिंग,राजगुरू सुखदेव या क्रांतिकारकाच्या चळवळी आणि त्याच्या संबंधीच्या बातम्या वाचून भाई कोतवाल याचं रक्त उसळून यायचं.भारत मातेच्या पायातील पारतंत्र्याच्या शृखला तोडण्यासाठी सुरू असलेले लढे पाहात आणि वाचतच  भाई कोतवाल मॅट्रिक झाले.त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण स्वातंत्र्याच्या उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या.काही तरी केलं पाहिजे असं मन सांगत होतं पण नेमकं काय करायचं? याचा रस्ता सापडत नव्हता.कोतवाल अशा दोलायमान मानसिक स्थितीत असतानाच  भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना ब्रिटिश सरकारनं फासावर लटकविल्याचं वृत्त त्याच्या कानी पडलं.तरूण भाई अस्वस्थ झाले. संतापलेही.देशात अनेक क्रांतीकारक अशा प्रकारे हसत हसत फासावर जात होते तर  दुसऱ्या बाजुला महात्मा गांधी यांची असहकार चळवळही सुरू होती.ठिकठिकाणाहून त्यासंबंधीच्या बातम्या येत होत्या.या साऱ्या बातम्या तरूणांनी पेटून उठावं अशाच होत्या.अशा वातावरणात मुळातच बंडखोर स्वभावाचे भाई कोतवाल स्वस्थ बसणे शक्य नव्हते.त्यांनी आपल्या मित्रांची बैठक बोलावली.निर्णय घेतला.एका संध्याकाळी त्यांनी घर सोडलं.गाठलं ते मुंबईतलं कॉग्रेस भवन.तिथं त्यांनी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदविलं.इकडं घरची मंडळी काळजीत पडली.शोधा शोध झाली.अखेर ते मुंबईत असल्याचं कळल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परत पुण्यात आणलं.ते पुण्यात परतले.  मन बैचेन होतं.त्याच्या मनाची चाललेली ही घालमेल घरच्यांच्या लक्षात येत होती.व़िठ्ठल ला शांत करायचं तर त्याचं लग्न करणं हाच त्यावरचा उपाय आहे असं समजून त्याचं लग्न केलं गेलं.खडकीचे डॉ,तिर्लापूरकर यांची नात कु.इंदिरा हिच्या समवेत भाईंचा विवाह झाला.लग्नानंतर उपजिविकेसाठी खडकीलाच एक नोकरी पत्करली.पण ति थं गोरा साहेब असल्यानं जास्त दिवस जमलं नाही.त्यांनी नोकरी सोडली.नंतर ते कुलाबा जिल्हयातील माणगावला गेले.तेथे काही काळ नोकरी केली.आपल्या कार्यानं ते तेथे बरेच लोकप्रिय झाले.”अण्णा” ही आदरार्थी उपाधी देखील त्यांना तिंथेंच मिळाली.पण देशात अनेक घडना घडत असताना आपण माणगावसारख्या दूरच्या गावात पडलो ही जाणीवही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.अखरे त्यानी नोकरी सोडली.याच काळात त्यांच्या आयुष्यात दोन घडना घडल्या .ते पदवीधर झाले होते.बापही झाले होते. कालांतराने वकिलही झाले.माथेरानला परत आल्यावर ते भाऊसाहेब राऊत ,भगत मास्तर आदिंच्या सपर्कात आले.तेथे त्यानी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले.माथेरान नगरपालिकेकडं त्यांनी आपला मोर्चा वळवला.माथेरानमधील बाहेरचे बंगलेवाले आणि स्थानिक असा वाद  होता.तत्कालिन कायद्यानुसार 18 रूपये भाडे किंवा टॅक्स भरणाऱ्याला नगरपालिकेसाठी मदतानाचा हक्क होता.जो कर देत नाही त्याला मतदान करता येत नसे.कुत्र्याला 3 रूपये टॅक्स होता.म्हणून कुत्र्याचा मालकही मतदार होता.या नियमाचा गैरफायदा घेत बंगलेवाले आपल्या माळी,नोकराच्या नावाने कुत्र्याचा टॅक्स भरून त्यांना मतदार करून घेत आणि त्यामाध्यमातून नगरपालिकेवर हुकूमत गाजवत.हे भाईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी मतदार याद्या अद्ययावत करून घेतल्या.नंतरच्या निवडणुकीत स्थानिकांनी आपला उमेदवार उभा केला.त्यावेळेस बंगलेवाल्यानी अनेक लबाड्या केल्यामुळे स्थानिकांना यश आले नसले तरी जनता आता जागी झालीय हा संदेश बंगलेवाल्यापर्यत पोहोचला.

धान्य कोठीची निर्मिती.

भाई कोतवाल बोलके सुधारक नव्हते.क र्ते सुधारक होते.समाजवादी विचारांचा त्यांचावर प्रभाव असल्यानं  ते जात-पात मानत नसत.लग्नातील उधळपट्टीही त्यांना मान्य नसायची.आपल्या बहिणीचा विवाह त्यांनी केवळ 60-70 रूपयांत करून आणि जात-पात विरहित सहभोजनाचा आनंद घेऊन त्यांनी माथेरानमध्ये नवा आदर्श घालून दिला.गरीब शेतकरी,सामांन्य माणसांना सावकार कसे नाडतात हे भाई कोतवाल डोळ्यानं बघत होते.भात लावणीच्या वेळेस दिलेलं खावटी कर्ज भात आल्यावर सावकार ते दिढी-दुप्पटीनं वसूल करीत.हे टाळण्यासाठी त्यांनी धान्य कोठीची योजना कार्यान्वित केली.म्हणजे भात आल्यावर शेतकऱ्यांनी गावात ठराविक भात कणग्यांमधून ठेवायचा आणि तो गरज लागल्यावर घ्यायचा.त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला.माथेरान को-ऑपरेटीव्ही सोसायटी स्थापन केल्यानंही लोकांची होणारी अडवणूक थांबली.या सा़ऱ्या कार्यामुळं तसेच सावकार आणि पोलिसांच्या त्रासाच्या विरोधात  वकिलीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करीत असल्यानं नेरळ,कर्जत,माथेरान परिसरातील जनतेला ते आधार वाटत.त्यामुळंच असेल कदाचित मुंबई शासनाने एका गोपनीय अहवालात भाई कोतवालांचा उल्लेख  मॅन ऑफ दी पीपल असा केला आहे. लोकसवेच्या या कामातून भाई कोतवालांचा परिसरात चांगलाच जनसंपर्क वाढला होता.त्याचा उपयोग त्यांना पुढच्या काळात नक्कीच झाला.भाई कोतवाल माथेरानला असले तरी त्यांचा मुंबई-पुण्यातील कॉग्रेस,समाजवादी नेत्यांशी संपर्क होता.तेथील बारिक-सारिक घडामोडींची माहिती त्यांना मिळत असे.तिकडच्या बैठकांनाही त्यांची हजेरी असे.छोडो  भारत आंदोलनास प्रत्यक्षात आरंभ होण्यापुर्वी पुण्यात युसूफ मेहरअली यांच्या मार्गदर्शनाखाली जी महत्वाची बैठक झाली होती त्या बैठकीस भाई कोतवाल हजर होते.आंदोलनाचा आरंभ झाल्यावर साम्राज्यवाद्यांचा युध्द प्रयत्न कसा हाणून पाडायचा याबाबतचा एक आराखडा या बैठकीत तयार कऱण्यात आला.लोहमार्ग उखडून टाकणे,पुणे आणि मुंबईचा वीज पुरवठा तोडून टाकणे आणि त्यासाठी कुलाबा जिल्हयातील भिरा,भिवपुरी आणि खोपोली वीज केंद्रापासूनच्या वीजवाहिनी तारांचे पायलॉन पाडण्यााचा त्यात समावेश होता.या कामगिरीवर बैटकीत कोतवाल यांची नेमणूक झाली होती.ठरल्यानुसार 7 आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी  मुंबईत गोवालिया टॅंकवर कॉंग्रेसची सभा झाली.तेथे महात्मा गांधींचे व्याख्यान आणि करेंगे या मरेंगे चा ठराव संमत झाला.त्यानतर 9 ऑगस्टपासून पोलिसंानी नेत्यांची मोठ्‌या प्रमाणात धरपकड सुरू केली.अनेक मान्यवर नेते भूमिगत झाले.भाई कोतवालही पोलिसांना चकवा देत आपले काम करीत होते.स्वीकारलेले काम पुर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह एक गट तयार केला होता.आझाद-दस्ता या नावानं तो इतिहासात प्रसिध्द आहे..या दस्त्यात गोमाजी रामा पाटील,हिराजी पाटील,हरिभाऊ भडसावळे,आर.बी.पोफळे आदिंचा समावेश होता.या पथकानं 25सप्टेंबर 42 रोजी पहिला429 नंबरचा पायलॅान कापून टाकला .त्यानंतर वेगवेगळे पायलान कापले गेले. त्यामुळं टाटा कंपनीचं चार हजार रूपयांचं नुकसान झालं होतं.मात्र  टाटा कंपनीचे कर्मचारी  पायलॉन नव्याने बसवून वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळीज घेत.नंतर पायलॉनच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक तैनात कऱणे सरकारला भाग पडले.मुंबई-कल्याण-पुणे आणि कल्याण -भुसावळ आणि मुंबई-सुरत मार्गाच्या संरक्षणासाठी मग लष्करी पथके तैनात केली.गाव-गस्त पथके निर्माण केली गेली.सेना दलाव्यतिरिक्त उत्तम शस्त्रांनी सुसज्ज अशी गव्हर्नरची खास युरोपीय बॉडीगार्ड सेना नेरळ,वांगणी,बदलापूर,अंबरनाथ भागात तैनात केली. मात्र कोतवाल गॅंगने सरकारच्या या उपाययोजनांना भिक घातली नाही.उलटपक्षी अधिकाधिक पायलॅान कापण्याचा सपाटाच स्वातंत्र्यवीरांनी सुरू केला. अंमरनाथनजिक पायलॉन संरक्षणासाठी ठेवलेल्या सुरक्षा पथकाच्या चौकीवरच 100 आंदोलकांच्या सशस्त्र पथकानं हला चढवून पाच बंदुका आणि गोळीबाराची सामुग्री हिसकावून घेतली.या घटना सरकारची झोप उडविणाऱ्या होत्या.त्यामुळं सरकारनं अधिक कठोर पाऊल उचलत खास रेल्वेने अजमेर रेजिमेंटच्या  चार पलटणी अंबरनाथ, कर्जतला  पाठविण्यात आल्या.  मात्र घातपाती कारवायंाना पायबंद घालण्याचे  सरकारचे हे सारे प्रयत्न विफल ठरत होते.पायलान बरोबरच  पुल उखडणे,रेल्वे उलथवणे अशा घातपाती कारवाया देखील सुरू  होत्या.रेल्वे पुल उडविण्यासाठी लागणारे डायनामाईट जुम्मापट्टी स्टेशनात असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे धाड टाकून दोन पेट्या बारूद ,बंदुकीची दारू,फ्यूज तारा,स्फोटकं आणि अन्य बरेच साहित्य मिळविले.या लुटीच्या वेळेस काही स्वातंत्र्यसैनिकांनी गोऱ्या साहेबांसारखा युरोपीय पोषाख घातला होता.या धाडसी कारवाईने पोलिस दलात एकच खळबळ ऊडाली. पोलिसांकडून त्यांच्या बंदुका हस्तगत करणे,पोलिस यंत्रणेवर दहशत बसविणे अशी कामं आझाद-दस्ता करीत होता.भाई कोतवाल गांधीवादी  होते तरीही ते अशी घातपाती कामं कशी करीत असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.त्याचं उत्तर सोपं आहे.अहिंसेवर श्रध्दा ठेऊन साम्राज्यवादी इंग्रजांना राज्य कऱणे अशक्य करणे हे कॉंग्रेसचे ध्येय असल्यानं घातपाती कारवायांचा मार्ग अ नुसरला गेला होता.त्यासाठी त्यांना मुंबईतील कॉंग्रेसच्या गुप्त केंद्रातून आर्थिक सहाय्य देखील मिळत असे.घातपाती कारवायांबरोबरच सरकारला कर न देण्याची मोहिमही कोतवाल चालवत.परिसरातील शेतकऱ्यांना त्यांनी या मोहिमेत सहभागी करून घेतले. भक्कम  संघटना,मोठा जनाधार,आणि जीवावर उदारहोऊन काम करणारे सहकारी असल्यानं आझाद-दस्ता किंवा कोतवाल गॅंगने कुलाबा-मुंबई परिसरात चांगलाच दबदबा निर्माण केला होता.कोतवाल गॅंगच्या घातपाती कारवायांनी इंग्रज सरकार आणि त्यांचे पोलिस अक्षरशः जेरीस आले होते.भाई कोतवाल याना पकडण्यासाठी गुप्तचरांची मोठी पलटन कामाला लावली गेली ,लोकांमध्य दहशत बसावी यासाठी गावंामधून पोलिसांचे संचलनही केले जात होते.या कशाचाही सरकारला उपयोग होत नव्हता.गुप्तचरांना कसलीच माहिती मिळायची नाही.उलट सरकारी योजनांची इत्यंभूत माहिती आंदोलकांना मिळत असे.शासनाच्यादृष्टीनं हे सारं अनपेक्षित आणि कठिण होत चाललं होतं.कोतवाल गॅंगच्या  कारवायांनी जेरीस आलेल्या सरकारने अखेर भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले.ही क्लुप्ती फलद्रुप ठरली.द्रव्यलोभापाई एका फितुरानं घात केला आणि भाई कोतवाल यांना हौतात्म्य पत्करावं लागलं.

फितुरीमुळं घात झाला.

 भारतीय स्वातंत्र्य लढ्याला फंद फितुरीची एक काळी किनार आहे.शीर हातावर घेऊन देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे देशभक्त जसे होते तसेच थोड्या पैश्यासाठी आपले इमान विकणारे हरामखोरही स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बघायला मिळतात.त्यांची संख्या कमी असेल पण त्यांनी केलेलं नुकसान मोठं होतं हे पदोपदी जाणवतं.फंदफितुरीनंच भाई कोतवाल आणि हिराजी पाटलांचा घात केला.असं झालं नसतं तर हे रायगडचे हे  वाघ पोलिसांच्या हाती लागले नसते हे नक्की.कारण  घातपाती कृत्ये करायची आणि नंतर नेरळ,कर्जत,माथेरान परिसरातील घनदाट जंगलात  पसार व्हायचं असा कोतवाल गॅंगचा दिनक्रम  होता.जंगलातील वाटा आणि जंगलाची माहिती इंग्रजांकडं नसल्यानं इंग्रज अधिकारी,आणि पोलिसांना त्यांचा सुगावा लागायचा नाही.कोतवालांच्या कारवायांनी  सरकारी यंत्रणा त्रस्त झाली होती.त्यामुळंच कोतवालांचा ठावठिकाणा सांगणा़ऱ्याला सरकारनं बक्षिस जाहीर केलं होतं.पाच हजार  कोतवालांसाठी आणि पाच हजार गोमाजी पाटलांसाठी जाहीर केली गेली होती. दहा हजार ही रक्कम आज कमी वाटेल पण त्यावेळेस ती रक्कम मोठीच होती.या रक्कमेसाठी काही गद्दारांनी कोतवालांचा सिध्दगडवरचा  ठिकाणा पोलिसांना सांगितला आणि सारंच संपलं.सिध्दगडची जागा लपण्यासाठी सर्वार्थानं सुरक्षित होती.घनदाट जंगल,अ़रूंद खिंडीतून जाणारा रस्ता,पाण्याची सोय,निवाऱ्यासाठी मोठी घळ आणि शत्रू आल्यास मोर्चे बांधून माराही करता येईल आणि जंगलाचा आणि घळीचा आडोसाही घेता येईल अशी ही जागा होती. कोतवाल आणि त्यांचे सहकारी  चार-पाच दिवस मुक्काम करायचा असं नियोजन करूनच सिध्दगडावर आले होते.पहिली रात्र तेेथेच घालविली.तथापि दुसऱ्या दिवशी सकाळी काय वाढून ठेवलंय याची कोणालाच कल्पना नव्हती. 2 जानेवारी 1943 ची सकाळ होती.ती कोतवाल गॅंगसाठी काळरात्रच बनूनच उगवली.सका़ळी सहाच्या सुमारास पहाऱ्यावर असलेला हिराजी पाटील मशेरी लावत बसला होता.तेवढ्यात फटाका फुटावा असा आवाज आला आणि त्यापाठोपाठ मेलो बाबा मेलो असा हिराजीचा काळीज चिरनारा आवाज आला.या आवाजानं थोडं गाफिल असलेले सारेच सावध झाले.बंदुका ,काडतुसं शोधू लागली.पण काडतुसं मिळत नव्हती.ती शोधायला वेळही नव्हता.कारण गोळ्यांचा वर्षाव सारखा सुरूच होता.भाई कोतवाल अचानक झालेल्या या हल्लयानं चकित झाले.स्वतःला वाचवा पुन्हा कधी तरी सूड घेऊ असा आदेश देत हातात बंदुक घेऊन ते वरच्या घळीकडं च ढू लागले.मात्र त्याच वेळेस सुसाट आलेल्या एका गोळीनं त्यांच्या मांडीचा वेध घेतला .कोतवाल रक्तबंबाळ झाले.अशा अवस्थेत ते पुढं जाऊ शकत नव्हते.एका झाडाच्या बुंध्याशी ते बेशुध्द होऊन पडले.मात्र गोळ्यांचा वर्षाव होतच होता.असं सांगतात की,नंतर काही दिवसांनी जेव्हा त्या झाडाच्या बुंध्यावर लागलेल्या गोळ्या मोजल्या तेव्हा त्यंाची संख्या80-90 होती.अत्यंत बेमुर्वतखोरपणे गोळ्यांचा वर्षाव केला गेला होता.एवढ्या गोळय़ा झाडल्यावरही  जखमी पडलेला माणूस काहीच हालचाल करीत नाही हे पाहिल्यावर डीवायएसपी हॉल तेथे आला.जखमी असलेला व्यक्ती भाई कोतवालच आहे हे समजल्यावर हॉलने आपल्या हातातील बंदुकीची नळी कोतवालांच्या डोक्याला लावली आणि चाप ओढला.डोक्याच्या चिंधडया झाल्या.भूमातेला बंधमुक्त करण्यासाठी लढणारा आणखी एक देशभक्त शहिद झाला.तो दिवस होता 2 जानेवारी 1943. सिध्दगडावर गोळीबार झाला तेव्हा कोतवालांच्या टोळीत 18 जण होते.त्यापैकी भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झालं.तांबट जखमी झाले.अन्य सहाजण पोलिसांच्या हाती लागले.काही  पसार होण्यात यशस्वी झाले पण रामलाल वगळता इतरांना पोलिसांनी नंतर अटक केली.या सर्वांचे पोलिसांनी नंतर जे हाल केले ते वाचूनही थरकाप उडतो.गोमाजी पाटलांना पोलिसांनी अक्षरशः – सोलून काढले,समोर मुलगा हिराजीचं शव आणि वरून पोलिसांच्या काठ्या अशा प्रसंगात गोमाजी पाटलांची मनःस्थिती काय झाली असेल याची कल्पना करता येऊ शकेल.बेशुध्दावस्थेत असलेले तांबट शुध्दीवर आल्यानंतर पाणी पाणी करून टाहो फोडू लागले पण त्यांना पाणी देण्याची माणुसकी दाखविली गेली नाही. भाई कोतवालाच्या मृतदेहाची तर प्रचंड विटंबना केली गेली.त्यांच्या पायाला दोर बांधूनच त्यांना फरफटत मुक्कामाच्या ठिकाणी नेले गेले.कोतवालांच्याा हौतात्म्याची बातमी माथेरानल कळली.तेथून कोतवालांचे वडिल आणि अन्य काही ग्रामस्थ आले पण कोतवालांचे प्रेत वडिलांना दिले गेले नाही.नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.

31 डिसेंबरपर्यत कोतवालांच्या मार्गदर्शनाखाली भूमिगत आंदोलन सुरू होतं.पण चुकीच्या माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेऊन सारी फसगत झाली होती.त्याचं असं झालं.भाई कोतवाल यांच्या सागण्यावरून भगत मास्तरांनी नांदगावच्या मारूती पाटलांना सिध्दगडावर येऊन भेटण्यासाठी एका व्य्कतीच्या हस्ते  चिट्टी पाठविली  होती.परंतू मारूती पाटील घरी नसल्यानं ती चिठ्‌टी गोविंद साबळे यांच्या हातात पडली.दहा हजाराच्या लालचेनं गोविंद साबळे यांनी ही चिठ्‌टीं मुरबाडला अण्णा बोकड यांच्याकडं पाठविली.बोकडांनी ती चिठ्‌टी घेऊन बदलापूरचे अण्णा घाटवळांचे घर गाठले.तेथून ते कल्याण मार्गे ठाणा पोलिस हेडकॉर्टरला पोहोचले. 31 डिसेंबरची ही घटना. ठाण्याला हॉल नावाचा डीवायएसपी होता.त्यानं बातमी मिळताच फौजफाटा बरोबर धेऊन बोरवाडी गाठले.तेथून 1 जानेवारीच्या रात्री पोलिस दलाने सिध्दगडकडं कूच केली.पहाटे साडे चार-पाचच्या सुमारास एक आदिवासी माणूस सामान घेऊन जात असताना या पथकाला दिसला.त्याला अडवून दमदाटी केल्यानंतर त्यानं कोतवालाचा मुक्काम दाखविला.पहाटची वेळ असल्यानं सारेच बेसावध होते.त्याचा फायदा हॉलच्या  पोलिसांनी धेतला.डाव साधला गेला.केवळ दहा हजाराच्या लोभापोटी आपल्याच माणसांनी केलेला हा घात होता.या घटनेत पकडलेल्या 29 ज णांवर नंतर खटले भरले गेले.ङ्घकोतवाल केसङ्घ  म्हणून हा खटला इतिहास प्रसिध्द आहे.लोकांवर दहशत बसावी यासाठी या खटल्यातील सर्व देशभक्तांवर अनन्वित अत्याचार केले गेले पण त्याचा उपयोग झाला नाही.कोतवालांना ठार केल्यानं घातपाती कारवाया थांबतील हा सरकारी अंदाजही पार खोटा ठरला. उलट कोतवाल यांच्या मृतदेहाची ज्या पध्दतीनं विटंबना केली गेली आणि  इत रांवर जे अत्याचार केले गेले ते पाहून जनता खवळली होती.सूडाची भावनाही त्यांच्यात होती.त्याचा प्रत्यय लवकरच आला.श्रीवास्तव आणि हरिभाऊ भडसावळे यांनी कोतवाल पथकाचे पुनर्गठन करून घातपाती कारवाया सुरू ठेेवल्या.कोलवाल यांना वीर मरण आल्यानंतरचा पहिला झटका म्हणून या पथकाने मुंबई जवळच्या पारसनिक बोगद्यानजिक घातपात करण्याचा प्रय़त्न केला.कोतवालांच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या दोन दिवस अगोदर पुण्या-मुंबईला वीजपुरवठा कऱणाऱ्या वीजतारांचे मुख्य पाच पायलॉन एकाच दिवशी कापले गेले.सर्वत्र हाहाःकार उडाला.29 डिसेंबर 1944 रोजी मुंबई- आणि पुणे ही शहरं काळोखात बुडाली.नगरलाही झटका बसला.गोरेगाव स्थानकाजवळही दोन रूळ उखडून मार्ग बंद केला.डहाणू जवळही त्यानी घातपात करून सेना दलाच्या सामुग्रीस आग लावली.ए़वढेच नव्हे तर कोतवाल खटल्याचे कामकाज ठाणे सत्र न्यायालयात सुरू असताना कोर्ट दालनाच्या छतावर त्यांनी टाइम बॉम्बचा स्फोट घडवून आणण्याचे धाडसही या पथकानं केलं होतं.छोडो भारत आंदोलनातील हा शेवटचा बॉम्बस्फोट असल्याचा दावा केला जातो.इतरही अनेक घातपाती कारवाया या पथकानं केल्या.याचा अ र्थ भाई कोतवाल यांनी नेरळ-कर्जत भागात पेटविलेली स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली गेली.नंतर भारत स्वतंत्र झाला पण हे स्वातंत्र्य पाहण्यासाठी भाई कोतवाल नव्हते.

 भाई कोतवालांचा जन्म 1 डिसेंबर 1912चा.2 जानेवारी 1943 रोजी त्यांना वीरमरण आलं.म्हणजे त्याचं आयुष्य जेमतेम 31 वर्षाचं.अल्प आयुष्य मिळालं असलं तरी त्यंानी अफाट कर्तृत्व गाजविलं.त्याचं त्याचं हौतात्म्य,त्याचं धैर्य त्यांची लोकांबद्दलची तळमळ आणि देशाला बंधमुक्त करण्यासाठीची त्यांची ओढ या गोष्टी नव्या पिढीला कळाव्यात यासाठी त्यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी केली गेली पाहिजे.हुतात्मा भाई कोतवालाचं भव्य स्मारक उभारलं जावं.तेथे त्यांच्या चळवळीतील महत्वाच्या घटना अधोरेखित केल्या जाव्यात अशी जनतेची अपेक्षा आहे.त्यादृष्टीनं काही करण्याची  सुबुध्दी सरकारला व्हावी एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो.

(एस.एम.देशमुख यांच्या आगामी सागरमोती या पुस्तकावरून ( या लेखाची कॉपी माझ्या ब्लॉघवरून करता येईल.त्यासाठी खालील लिंकवर क्लीक कराhttp://smdeshmukh.blogspot.in/)

)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here