वर्तमानपत्रे कायम विरोधीपक्षांच्या भूमिकेत असावीत

0
891

सरकार कोणतेही असो, व्यवस्थेच्या विरोधात लढत राहणे हे वर्तमानपत्राचे काम असून परदेशातील नियतकालिके त्या पद्धतीनेच काम करीत असतात. गार्डियन हे त्याचे उत्तम उदाहरण असून हे वर्तमानपत्र नेहमीच व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, विरोधकांची भूमिका वर्तमानपत्रांनी निभावण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी डोंबिवली येथील वाचक मेळाव्यात केले. डोंबिवली येथील बोडस सभागृहामध्ये वाचकांनी संपादक गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधला. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी वाचकांच्या वतीने त्यांना प्रश्न विचारले.
गेल्या १०० वर्षांत मराठी पत्रकारितेत गोविंदराव तळवलकर हे एकमेव संपादक लक्षात ठेवावे, अनुकरण करावे असे आहेत. त्यांची साधना आणि सादरीकरणाच्या तसेच सामाजिक व्यक्तिमत्त्वाच्या जवळपास पोहोचणाराही कुणी नाही. त्यामुळे एखाद्या लेखाबद्दल अभिप्राय देताना कुणी गोविंदरावांची आठवण झाली असे म्हटले की ती खूप मोठी पोचपावती असते. तळवलकरांसारखे लिखाण आपल्याला जमावे अशी इच्छा कायम राहिली आहे. टिळकांचा पत्रकारितेतील तुटलेला धागा तळवलकरांजवळ येऊन थांबतो, असे मत कुबेरांनी आपल्या आवडत्या संपादकाबद्दल व्यक्त केले. भाषासौष्ठव, विषयाची मांडणी याप्रमाणेच चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा गुण संपादकाच्या अंगी असावा लागतो. शिवाय या सर्वापासून अलिप्त राहण्याची वृत्ती त्यांच्यात असायला हवी. या अलिप्तपणामध्ये मला ब्रिटिश परंपरा अधिक जवळची वाटते. या अलिप्तपणामुळे कोणत्याही प्रकारचे दडपण संपादकीयमध्ये येत नाही, असेही ते म्हणाले.
प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र पेडन्यूज संस्कृती बोकाळलेली दिसत असली तरी एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाने ते आमिष नाकारले आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
समस्या मांडणे हे वर्तमानपत्रांचे काम असून त्यासाठी वेगळ्या चळवळी राबवण्याची गरज नसते. वर्तमानपत्रातून समाजाला दिशा दिली जाते. त्या मार्गाने वाटचाल करणे ही समाजाची जबाबदारी असते. लोकसत्ता कायम अशा प्रकारे जागल्याची भूमिका बजावत आल्याचे त्यांनी सांगितले. जाहिरात हा वर्तमानपत्रांचा अविभाज्य घटक असून त्यामुळेच महागाईच्या काळातही तुलनेने अतिशय स्वस्त दरात ही सेवा घराघरांत पोहोचविणे शक्य होते. मात्र जाहिरातींप्रमाणेच वर्तमानपत्रांची पाने आणि मजकूरही वाढला, या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. या मेळाव्यात डोंबिवलीकरांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली, तसेच त्यांच्या शंकांचेही निरसन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here