अलिबाग- रायगड जिल्हयातील मुरूड,काशिद,उरणच्या समुद्र किनाऱ्यांवर फ्लेमिंगो,पेंटेड स्ट्रोक ,सारस आदिंसारख्या परदेशी पाहुण्यांची वर्दळ दिसायला लागली असली तरी अलिकडे या पाहुण्यांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे,
थंडी पडायला लागली की,हजारो किली मिटरचा प्रवास करीत हे पाहुणे पक्षी रायगड जिल्हयातील समुद्र किनारे तसेच विविध जलाशयावर येतात. जवळपास चार महिने त्याचा मुक्काम या परिसरात असतो.उन्हाळा सुरू झाला की,हे पक्षी रायगडचा निरोप घेतात.मात्र अलिकडे जलप्रदूषण,मोठ्या प्रमाणावर होत असलेले भराव तिवरांची कत्तल आणि त्यामुळे पक्षांना जाणवणारा भक्ष्यांचा तुटवडा आदि कारणांमुळे येणाऱ्या पक्षांची संख्या रोडावत असल्याचे निरिक्षण पक्षी निरिक्षक नोंदवित आहेत.गेल्या काही वर्षांपासून फ्लेमिंगोची शिकारही मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने या पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.उरण परिसरातील जसखार,पाणजे,डोंगरी,न्हावाखाडी,सोनारी,करळ,भेडकळ आदि गावांच्या पाणवठ्यावर फ्लमिंंगो मोठ्या प्रमाणावर दिसायचे पण आता त्याची संख्या सातत्यानं कमी होत आहे.त्याबद्दल पक्षी मित्र चिंता व्यक्त करताना दिसतात.