मुंबई- मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली.येत्या 3 डिसेंबर रोजी परिषद 75 वर्षे पूर्ण करीत आहे.मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील मराठी पत्रकारांची पहिली आणि सर्वसमावेशक संघटना असल्याने या संस्थेला मातृसंस्था देखील म्हटले जाते.राज्यातील 35 जिल्हयातील जवळपास सात हजार पत्रकार संसथेचे सदस्य आहेत.अशा या संस्थेचा वर्धापनदिन येत्या 3 डिसेंबर रोजी प्रथमच साजरा कऱण्याचे नियोजन आहे.याचा एक भाग म्हणूनच प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचं आवाहन परिषदेच्यावतीनं कऱण्यात येत आहे.गेल्या दोन-तीन महिन्यात सात पत्रकार ह्रदयक्रिया बंद पडून मृत्यूमुखी पडले आहेत.त्यामध्ये 32वर्षांच्या स्वानंद कुळकर्णी यांचाही समावेश आहे.या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे स्वतःच्या प्रकृतीकडे होणारे दुर्लक्ष हा चितेचा विषय झालेला असल्यानेच परिषदेने 3 डिसेंबर रोजी प्रत्येक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे ठरवले आहे.स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्यातून हे शिबिर घेतले जावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष किऱण नाईक,माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,उपाध्यक्ष सुभाष भारद्वाज ,सरचिटणीस संतोष पवार आणि कोषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी केले आहे.रायगडमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय़ घेण्यात आला आहे.