माध्यमातील धगधगीचं जीवन,कमालीचे ताण-तणाव,अवेळी जेवण,व्यायामाचा अभाव या साऱ्यांचा परिणाम पत्रकारांच्या प्रकृत्तीवर होत असतो.पत्रकारांची मुलतःच बेफिकीर वृत्ती.हा बेफिकीरपणा प्रकृत्तीच्या बाबतीतही हमखास दिसतो.हा निष्काळजीपणाच अनेकदा जीवावर बेततो.झी-24 तासचे इनपुट डेस्कवर काम करणारे ,पत्रकार स्वानंद कुलकर्णी यांच्या अचानक निधनानं पुन्हा एकदा पत्रकारांच्या प्रकृत्तीचा विषय किमान पत्रकार संघटनांनी गाभीर्यानं घेण्याची वेळ आली आहे.अगदी कमी वयात स्वानंद कुलकर्णी याचं ह्रदयविकारानं निधन व्हावं ही गोष्ट जेवढी दुःखद आहे तेवढीच पत्रकारितेतील सर्वांसाठीच धोक्याचा इशारा देणारी ही आहे असं आम्हाला वाटतं.मध्यंतरी लोणावळा येथील पत्रकार मित्राचं असंच अचानक निधन झाल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेच्यानतीनं आम्ही राज्यातील अनेक ठिकाणी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेतली होती.त्याचा फायदा शेकडो पत्रकारांना झाला.अशी शिबिरं खर तर वारंवार आणि गावोगाव व्हायला हवीत.याचं कारण पत्रकार मुद्दाम आरोग्य तपासणी करण्याची टाळाटाळ करतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.शिबिराच्या निमित्तानं सारेच पत्रकार येतात आणि प्रकृत्तीची तपासणी होते.त्यामुळं अशी शिबिरं झाली पाहिजेत. आम्ही तसा प्रयत्न यापुढंही करीत राहणार आहोत.अशा शिबिरांबरोबर पत्रकाराचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी काय करता येईल यावर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानंही आयोजित व्हायला हवीत.ती आजची गरज आहे.
एखादया पत्रकाराचं असं अचानक निधन झालं की,केवळ हळहळ व्यक्त केली जाते,सहवेदना व्यक्त केल्या जातात ते आवश्यक असले तरी यापुढं अशी अचानक आणि अवेळी जाण्याची वेळ कोणावर येणार नाही या अंगानं प्रय़त्न व्हायला हवेत.त्याच बरोबर एखादा पत्रकार अचानक निधन पावल्यानंतर त्यांचं कुटुबं उघड्यावर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील पत्रकार संघटना,सरकार,संबंधित संस्थाची आहे.त्यादृष्टीनं देखील प्रय़त्न करण्याची गरज आहे.
स्वानंद कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रध्दांजली.हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळो एवढीच प्रार्थना.