आयुष्यभर जगाची उठाठेव कऱणाऱ्या अनेक पत्रकारांच्या नशिबी उत्तर आयुष्यात जे भोग वाट्याला येतात ते शहारे आणणारे असतात.काही दिवसांपूर्वी मराठीतील एका मासिकेच्या माजी संपादिकेची दर्दभरी कहाणी येथे आम्ही दिली होती.तसेच मध्यप्रदेशमधील एका पत्रकाराचे निधन झाल्यानंतर चंदा जमा करून त्याच्यावर कसे अंत्यसंस्कार करण्यात आले होते तो किस्साही सांगितला होता.आज अशीच एक स्टेारी आपल्यासमोर मांडताना नक्कीच दुःख होत आहे.ही स्टोरी वाचल्यानंतर आम्ही गेली अनेक वर्षे पत्रकार पेन्शन योजनेचा आग्रह का धरतोय हे देखील वाचकांच्या ध्यानात यायला मदत होईल.
ही कहाणी आहे बनारसमधील पत्रकार गोपाल ठाकूर यांची.1976 ते 1984 या काळात मुंबईमध्ये धर्मयुग सारख्या प्रतिष्ठित साप्ताहिकात कार्यरत असलेले गोपाल ठाकूर नंतर बनारसला गेले आणि तेथे त्यांनी जागरण,आज,सन्मार्ग,यासारख्या मान्यवर दैनिकात काम केले.नंतर एका प्रकाशन संस्थेत त्यांनी दीर्घकाळ संपादनाचे काम केले.नंतर तेथे काही कारणांनी मतभेद झाल्यानंतर त्यांनी नोकरीला लाथ मारली आणि ते नंतर थेट रस्तायावर आले.आज फुटपाथच त्याचं निवासस्थान झालं असून येणारे -जाणाऱे जे देतील त्यावर त्यांची गुजराण होताना दिसते आहे.मात्र त्यांच्याकडं कोणाचं लक्ष नाही.ना सरकारचं,ना पत्रकार संघटनांचं.त्यांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची,आश्वासक आधाराची गरज आहे तो मिळाला नाही तर बातमीच्या मागे धावणारा हा हाडाचा पत्रकार एक दिवस हे जग सोडून निघून जाईल आणि त्याची बातमी देखील कुठं येणार नाही.
देशात आणि महाराष्ट्रात अनेक वयोवृध्द पत्रकारांची हीच अवस्था असल्यानं पत्रकार पेन्शन योजना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर लागू कऱण्याची गरज आहे.त्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येत लढा उभारण्याचीही गरज आहे.