‘राज्यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी गरज पडल्यास हिटलरपेक्षाही वाईट वागेन’ अशी धमकी काही दिवसांपूर्वी देणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आता मीडियाला धमकी दिली आहे. ‘मीडियावाल्यांनी नव्या तेलंगण राज्याच्या विरोधात काही अपमानास्पद प्रसिद्ध केल्यास त्यांना जमिनीत १० फूट खाली गाडून टाकेन,’ असे राव यांनी ठणकावले आहे.
तेलंगण राज्याविषयी अपमानास्पद कार्यक्रम दाखविणाऱ्या ‘एबीएन आंध्र ज्योती’ आणि ‘टीव्ही ९’ या दोन वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण तेलंगणमधील केबल चालकांनी सध्या थांबवले आहे. गेल्या १६ जूनपासून तेलंगणमध्ये या वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री राव यांच्या एका कार्यक्रमच्या ठिकाणी निदर्शने करून वृत्तवाहिन्यांच्या प्रक्षेपणाला परवानगी देण्याची मागणी केली.
या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना राव यांनी त्या कामगारांच्या रोजगाराच्या प्रश्नावर चकार शब्द न काढता उलट मीडियालाच धमकी देऊन टाकली. ‘टीव्ही ९’ व ‘एबीएन आंध्र ज्योती’च्या प्रक्षेपणावर बंदी घालणाऱ्या केबल चालकांना मी सलाम करतो. यानंतरही या वाहिन्या सुधारल्या नाहीत तर त्यांना मी स्वत: धडा शिकवेन. तेलंगणचे अस्तित्व आणि प्रतिष्ठेचा जे कोणी अपमान करतील त्यांना जमिनीखाली १० फूट खाली गाडेन,’ असे राव यांनी तावातावाने सांगून टाकले.
राव यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने एखादे वक्तव्य करताना संयम पाळायला हवा, असा टोला काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी हाणला.