अजमेर, – मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदची भेट घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी संसदेविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. हाफीज सईदची भेट घेतल्याने संसदेतील ५४३ खासदारांनी एकमताने मला फाशी देण्याचा निर्णय घेतला तर मी त्या संसदेवर थुंकतो असे बेताल वक्तव्य वैदिक यांनी केले आहे.
अजमेर येथील साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये वैदिक यांनी संसदेविषयी संतापजनक विधान केले. ‘मला जे सत्य वाटतं त्यासाठी मी लढा देतो, संसदेतील दोन खासदारांनी माझ्या अटकेची मागणी केली. संसदेतील दोनच नव्हे तर सर्व ५४३ खासदारांनी एकमताने माझ्या अटकेची आणि मला फाशी देण्याची मागणी केली तर अशा संसदेवर मी थुंकतो’. अशी मागणी करणारे खासदार चूलीत गेले पाहिजे, ते सर्व मुर्ख असून मी त्यांची मागणी कधीच ऐकून घेणार नाही असेही वैदिक यांनी सांगितले. मात्र वैदिक यांनी संसदेविषयी असे आक्षेपार्ह विधान केल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी हाफीज सईदची भेट घेतल्याने वैदिक वादाच्या भोव-यात सापडले होते.