हाडाचा पत्रकार गेला…
कर्जत येथील ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे जवळचे स्नेही मधुकर तथा नाना कुलकर्णी यांचे आज सकाळी पाचच्या सुमारास निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.त्यांच्या मागे एक अविवाहित मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.गेली पंधरा दिवस ते आजारी होते. नानांच्या निधनाच्या बातमीनं फार दुःख झाले.मी अलिबागला असताना ते कर्जतचे माझे वार्ताहर म्हणून काम करायचे.मी संपादक आणि ते वार्ताहर एवढेच आमचे नाते नव्हते तर त्यात परस्पर आपुलकी आणि स्नेहाचा धागा होता.आम्ही दोघेही रोखठोक स्वभावाचे असल्यानं अनेकदा आमचे वादही होत.एखादी बातमी आली नाही की,ते संंंंंंंंंंंंतप्त होत.प्रत्येक वार्ताहराचा तो अधिकारही असतो.मात्र नंतर ते शांत होत .लोकांच्या प्रश्नांबद्दल कमालीची अस्था असलेले नाना आयुष्यभर निष्ठेनं पत्रकारिता करीत राहिले. कर्जत तालुक्यातील लोककल्यणाकारी अनेक प्रश्नांचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांचा स्वभाव थोडा हेकट वाटावा असा असला तरी मनात द्वेष भावनेचा लवलेशही नव्हता.त्यामुळं नव्या पिढीतील पत्रकारांना ते आपला आधार वाटत.पत्रकारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या नानांनी तालुका पत्रकार संघाचं अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीपणे भूषविले होतं.अलिकडच्या काही दिवसात त्यांच्याशी माझा संपर्क नव्हता.तरीही त्याचं विस्मरण मला झालेलं नव्हतं. मी मध्यंतरी कर्जतला गेलो होतो.रायगड प्रेस क्लबने आयोजित केेलेल्या शेतकऱ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं.मात्र दिवसभराचे कार्यक्रम ठरलेले असल्यानं नानांना भेटता आले नव्हते.त्यांची संजय गायकवाड आणि अन्य पत्रकार मित्रांकडे चौकशीही केली होती.पण त्यावेळेस त्यांची प्रकृत्ती ठीक होती.आज अचानक त्यांच्या निधनाच्या बातमी आली.मी अस्वस्थ झालो.आज पत्रकारितेबद्दल अनेक प्रवाद निर्माण झालेले असताना जीवनभर निष्ठेनं.सचोटिनं पत्रकारिता करणाऱ्या नानांसारख्या पत्रकारांची गरज होती.अशा स्थितीत ते निघून गेलेत.त्याच्या निधनामुळे रायगडमधील जुन्या पिढीतील पत्रकारितेतील आणखी एक तारा निखळला आहे.पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे.व्यक्तीशःमी,माझे कुटुंबिय,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद ,रायगड प्रेस क्लब नानांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.नानांना आमची भावपूर्ण आदराजली.
( एस.एम.)