माळीणचे मारेकरी

0
889

पत्ती घडली की,राजकारण्यांनी ति थं जायचं,नक्राश्रू गाळायचे,थापा मारायच्या आणि निघून जायचं हे नेहमीचं चित्र आज मंचरच्या परिसरातही  दिसलं.अनेक मान्यवर माळीणच्या “सांगाड्याला व्हिजिट”  करून गेले.काहींनी घोषणा केल्या,काहींनी बघू-पाहू अशी सोयीची भाषा वापरली तर काहींनी सुतकी  चेहेरे करून सूचनांचा भडीमार केला..मात्र ” भविष्यात पुन्हा माळीण होणार नाही” असा दिलासा  कोणीच दिला  नाही.माळीणची पुनरावृत्ती टाळायची असेल तर काय करावं लागतं हे आपल्या राजकारण्यांना नक्की माहित आहे.मात्र तसं काही करण्याची इच्छाशक्ती कोणाकडं आहे हे आज आणि यापुर्वीही दिसलं  नाही.इच्छाशक्ती नसण्याचं कारणही हितसंबंधात आहे.डोंगर कुरतडणारे,डोंगरावर कुऱ्हाडी चालवून झाडं नामशेष कऱणारे,पवन चक्क्यांच्या नावाखाली डोंगरांवर कब्जे करून तेथे मनमानी कऱणारे हे एकतर सत्ताधारीच आहेत,किंवा  सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे  नाहीतर  निवडणुकांच्या काळात त्यांच्या पाठिशी आर्थिक शक्ती उभे करणारे धनदांडगे आहेत.त्यांचे हितसंबंध कुरवावळणे हे माळीणची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यापेक्षा कारभाऱ्यांना   लाख पटीनं महत्वाचं वाटतं. त्यामुळं अशा घटनांकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं.मानवी स्मरणशक्ती फारच कमी असते हे राज्यकर्त्यांना चांगलं माहित आहे.त्यामुळं गोड-गोड भाषा वापरून ते वेळ निभावून नेतात.दोन वर्षांपूर्वी पुण्याजवळच्या कात्रच घाटात आलेल्या महापुरानंतरही अशीच मखमली भाषा वापरली गेली.वाटलं आता पुणे परिसरात डोंगराचे लचके तोडण्याचं जे काम सुरूय ते नक्की थांबवणार. डोंगर,टेकड्या मोकळा श्वास घेणार. तसं झालेलं नाही. एवढी भीषण घटना घडल्यानंतरही लचके तोड चालूच राहिली. या अगोदर 2005 मध्ये मुंबईत महापूर आला.मिठी नदीचा प्रवाह खंडित झाल्यानं मुंबई  तुंबली, जलमय झाली असे निष्कर्ष तेव्हा काढले गेले.मिठीचं पुनरूज्जीवन कऱण्याच आणाभाका तेव्हा घेतल्या गेल्या.घडलं काहीच नाही.आजही थोडा पाऊस झाला की,मुंबई तुंबते.2005मध्येच रायगडात एकाच वेळेस नऊ-दहा गावांवर दरडी कोसळल्या.300वर माणसं मेली.तेव्हाही मोठ मोठे बाईट महाराष्ट्रानं एकले.वाटलं कोकणाच्या निसर्गालाच चूड लावण्याचे जे धंदे सुरू आहेत ते थांबणार आणि पुन्हा दरडी कोसळणार नाहीत यादृष्टीनं उपाययोजना केल्या जाणार.त्यानंतरही काहीच झालं नाही.कोकणात दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत.हा मजकुरू लिहित असतानाच महाडनजिकच्या हिरकणीवाडीजवळच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याची बातमी आली.तीन वर्षांपूर्वी अशीच घटना तेथे घडली होती.असं का होतंय हे तेव्हाही पाहिलं गेलं नाही आजही नाही.तेथील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविलं गेलं.हे सुरक्षितस्थळी किती दिवस राहणार या प्रश्नाचा कोणी विचार करीत नाही.अशा प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगाच अपेक्षित असतो.परंतू अशा सर्व गोष्टी निसर्गाच्या माथी मारून पळवाट शोधण्याचा प्रयत्न होताना दिसतो.यात निसर्गाचा दोष नाही.सह्याद्रीच्या रांगामधील दगड हिमालयातील डोंगरांसारखा भुसभुसती नाही.तो टणक आहे. तुलनेत मजबूत आहे. त्यामुळंच 2005 पर्यत कोकणात कधी दरडी कोसळल्याच्या घटना घडलेल्या नव्हत्या.मात्र 2005नंतर असे प्रकार कोकण रेल्वेवर आणि अनेक ठिकाणी घडताहेत. – वारंवार घडताहेत. याचा अ र्थ “काही तरी बिघडलंय”  हे तर नक्की.जे बिघडलंय ते दुरूस्त करण्याचं ज्यांच्या हातात आहे तेच इको सेन्सेटीव्ह झोनला विरोध करतात. इकोचं लचांड म्हणजे माधव गाडगीळ किंवा कस्तुरीरंगन याचं विकास विरोधी कारस्थान आहे असे आरोप केले जातात.हे आरोप करणारे सामांन्य नाहीत, सारेच राजकारणी आहेत.निसर्गाचा बळी देऊन त्यांना कोकणाचा नव्हे तर स्वातःचा विकास अपेक्षित आहे.पोटतिडकीनं विरोधामागचं तेच खरं कारणय. इको सेन्सेटीव्ह झोन लागू झाला तर कोकणात जी बेकायदेशीर मायनिंग सुरू आहे ती थांबवावी लागेल,जी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरूय तिलाही आडकाठी येणार,डोंगर कुरतडून स्वतःच्या तुंबड्‌या भऱण्याचे जी काम सुरू आहेत ती देखील बंद पडणार त्यामुळे कोकणातील बहुतेक बडे नेते इकोला विरोध करीत आहेत.त्यांच्या या विरोधातच माळीण सारख्या घटनांचं राज लपलेलं आहे.लवासा सारखी शंभर शहरं उभी कऱण्याच्या स्वप्नातही माळीण सारखा विनाश दडलेला आहे.असं सांगतात की,भिमाशंकरच्या परिसरातही लवासा सारखं शहर उभं कऱण्याचा प्रय़त्न झाला होता.माळीणच्या माळावरचं सपाटीकरण करून ति थं काही प्रयोग सुरू होते.निसर्गाशी सुरू असलेल्या या छेडछाडीतूनच  माळीणची दुर्घटना घडली. अशा अनेकांचा निष्कर्ष आहे. – हे सत्य असेल तर ही छेडछाड ज्यांच्या आदेशानं किंवा ज्यांच्या कृपेन सुरू होती त्यांच्यावर काय कारवाई होणार हा कळीचा प्रश्न आहे.तो आज ज्या मान्यवरांनी व्हिजिट केल्या त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षिला. एका कृषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. तो ही एका आरटीओ कार्यकर्त्याच्या तक्रारी नंतर .म्हणजे सरकारनं स्वतः कोऊन काहीच क ेलेल नाही. यचमागचा कार्यकारण भा व लक्षात घेतला पाहिजे.  खरी गरज डोंगरावर जे  “प्रयोग:  सुरू होते त्याला वरच्या  पातळीवरून समंती देणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.ज्या  हात यात ओले झाले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा.ते होत नाही.होणारही नाही.आम्ही काही तरी करतोय,हे दाखविण्यासाठी आणि रडत्याचे डोळे पुसण्यासाठी असे गुन्हे वगैरे दाखल करावेच लागतात.ते केले गेले आहेत.त्यातून हाती काहीच लागणार नाही.ज्यांच्यावर हा  आघात झाला ते बिचारे निष्कारण  हितसंबंधियांचे महत्वाकांक्षेचे शिकार ठरले आहेत.रस्त्यापासून दूर जंगलात,डोंगर कपारीत आपलं करपलेलं आय़ुष्य जगणाऱ्या माळीणच्या गावकऱ्यांची चूक काय होती की,त्यांना एवढी मोठी शिक्षा दिली गेलीय?  याचं उत्तर निसर्गावर निर्दय़पणे वार करण्यास परवानग्या देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे.माळीणच्या डोंगरावर जे सपाटीकऱण सुरू होतं त्याबाबतच्या अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या.त्याकडं कोणी आणि कोणाच्या सूचनेवरून दुर्लक्ष केलं गेलं ?

हे देखील महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे.हे दुर्लक्ष झालं नसतं तर कदाचित माळीणचं अस्तित्व पुसलं गेलं नसतं.माळीणवरचा आघात हा निसर्गाचा प्रकोप आहे असं म्हणून घटनेचं गाभीर्य कमी करू पाहणाऱ्यांनी कायम लक्षात असू द्यावं की आता ही तोंडचलाखी पचणारी नाही.भूस्खलनाच्या घटना कशामुळं होताहेत हे जनतेच्या लक्षात आलं आहे.ही जनता  आता माळीणच्या मारेकऱ्यांना क्षमा करणार नाही.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here