देशातील माध्यम कायदे योग्यच

0
864

एखाद्या समूहाकडे किंवा मोजक्या संस्थांकडेच देशातील सगळ्या माध्यमांची मालकी असावी का याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. अशी मालकी असेल तर हे समूह त्या माहितीवर नियंत्रण ठेवतील अशी भीतीही व्यक्त केली जात आहे; पण ती निरर्थक आहे,’ असे मत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले. 

बोट क्लब रस्त्यावर टाइम्स समूहाने सुरू केलेल्या नवीन कार्यालयाचे उद‍्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी महापालिका आयुक्त विकास देशमुख, टाइम्सचे डायरेक्टर (रिस्पॉन्स) रणजित काटे, पुण्यातील रिस्पॉन्स हेड संजीव कुमार, शाखाप्रमुख रणजित जगदाळे आणि आरएमडी हेड सिद्धार्थ वाजपेयी; तसेच टाइम्स समूहाचे कर्मचारी, जाहिरातदार,जाहिरात एजन्सीचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या वेळी प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील कायदे योग्य पद्धतीचे आहेत. अशा प्रकारे माध्यमांच्या सर्व परिमाणांची मालकी एखाद्या संस्थांकडे असली तरीही कोणत्याही माहितीवर नियंत्रण ठेवणे कोणालाही शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील स्पर्धाही असे होऊ देणार नाही. त्यामुळे ही भीती व्यक्त करणे योग्य नाही.’ 

देशातील माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘देशातील माध्यमांवरील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंदी आणण्याच्या विरोधातच आम्ही आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य कोणत्याही स्थितीत अबाधित राहीलच याची तुम्ही खात्री बाळगा. मोदी सरकारकडून त्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न केले जातील.’ 

टाइम्स ऑफ इंडिया समूहाने माध्यम क्षेत्रातील प्रत्येक परिमाणात केलेली वाटचाल ही अतिशय गौरवास्पद असून हा समूह हा ‘व्हॉइस ऑफ इंडिया’ बनला आहे. टाइम्स समूहाने प्रिंट, टीव्ही, रेडिओ व इंटरनेट यांसह माध्यम जगतातील प्रत्येक परिमाणांमध्ये अतिशय चांगली प्रगती केली आहे. भविष्यातही या समूहाकडून अधिकाधिक चांगली कामगिरी केली जाईल अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here