पुणेः शहराच्या मध्यवर्ती भागातच आकाशवाणीला रेंज न मिळणे…प्रक्षेपण मध्येच खंडित होणे….प्रक्षेपणात खरखर येणे… अशा आकाशवाणीच्या मध्यम लहरींवर चालणाऱ्या केंद्रांबाबतच्या तक्रारी लवकरच इतिहासजमा होणार आहेत. आकाशवाणीची मध्यम लहरी अर्थात मीडियम वेव्हवर चालणारी केंद्र लवकरच फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजेच एफ एम वाहिन्यांमध्ये रूपांतरित होणार आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘आकाशवाणीच्या मध्यम लहरींवर चालणाऱ्या केंद्रांच्या प्रक्षेपणात वारंवार अडथळे येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर मीडियम वेव्हजवर चालणारी केंद्र एफ एम वाहिन्यांमध्ये परावर्तित करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे,’ असे जावडेकर यांनी सांगितले.
‘मोबाइल फोनचा वाढता वापर तसेच अन्य कारणांमुळे हवेत ध्वनी लहरींची दाटी होते. त्यामुळे मध्यम लहरींवर चालणाऱ्या प्रक्षेपणात अडथळे निर्माण होत आहेत. मध्यम लहरींच्या केंद्रांचे एफएम मध्ये रूपांतर झाल्यानंतर हे सर्व अडथळे दूर होऊन या केंद्रांचे प्रक्षेपण स्पष्टपणे ऐकू येऊ शकेल,’ असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. ‘आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही सरकारी वाहिन्यांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. या वाहिन्या प्रेक्षकांच्या प्रथम पसंतीच्या वाहिन्या बनाव्यात, यासाठी दर्जेदार कार्यक्रम प्रसारित केले जातील, प्रसार भारतीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती लवकरात लवकर केली जाईल तसेच प्रसार भारतीची स्वायत्तता कायम ठेवण्यात येईल,’ असे जावडेकर यांनी सांगितले. (मटावरून साभार)