नारायण राणे रत्नागिरीत उध्दव ठाकरे यांच्यावर बरसले आहेत.उध्दव ठाकरेंचा त्यानी एकेरी उल्लेख करीत त्याचं वस्त्रहरण करण्याचीही धमकी दिली आहे.राणे नाराज आहेत कॉग्रेस नेत्यांवर .ते घसरले मात्र उध्दव ठाकरेंवर.हा काय प्रकार आहे? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे.उत्तर अवघड नाही.गेल्या दोन महिन्यातील राजकीय घडामोडी बघता शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांनी कोकणातील नारायण राणे यांच्या वर्चस्वाला पध्दतशीर सुरूंग लावण्याचा प्रय़त्न केल्याचं दिसेल.लोकसभेच्या वेळेस शिस्तबध्द नियोजन करून शिवसेनेने राणेच्या पुत्राचा लाजीरवाणा पराभव घडवून आणला.कोकणातील राणे विरोधकांना एकत्र करीत राणेना एकटे पाडण्यातही उध्दव ठाकरे यशस्वी झाले.दीपक केसरकर आणि राणे यांची जुंपल्यानंतर केसरकरांना कुरवाळत त्यांनी त्यांना शिवसेनत आणण्याचा प्रय़त्न केला. राणेच्या बालेकिल्ल्यात घडत असलेल्या या साऱ्या घटना राणेंना अस्वस्थ कऱणाऱ्या होत्या.अशा स्थितीत खऱं तर नारायण राणे यांनी संय़म दाखवत बदलत्या परिस्थितीशी तडजोड करायला हवी होती.आपल्याच बालेकिल्लयात झालेल्या पराभवाचं खापर इतरावर न फोडता पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गप्प बसणे हे कॉग्रेस संस्कृतीला धरून झालं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. आततायीपणा करीत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तो कॉग्रेस नेते आणि मुख्यमंत्र्यानी गंभीरपणे घेतलाच नाही.तो स्वीकारला की नाही हे त्यांना कळविण्याच्या कोणी भानगडीत पडलं नाही.ते देखील पाठपुराव करीत नाहीत असं दिसल्यानं कॉग्रेस नेत्यांनी त्यांची अगतिकता ओळखली आणि त्याचं पक्षातलं महत्वही कमी झालं.तरीही राणे यांनी काही” वाकडी चाल” चालू नये म्हणून मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या हुलकावण्या उठविल्या जात होत्या.राणेंना दिल्लीत बोलावून खास कॉग्रेसी स्टाईलचं चॉकलेटही त्यांना दिलं जात होतं.प्रत्यक्षात घडत काहीच नव्हतं. अखेरीस मुख्यमंत्री कायम राहिले.राणे पक्षातच एकाकी पडले.ही कोडी फोडण्यासाठी राणेंनी मग भाजपमध्ये जाता येईल काय याची चाचपणी केली.चर्चा अशी आहे की,एका उद्योगपतीच्या माध्यमातून राणे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनाही भेटले.त्या भेटीत काय ठरले असेल ते अजून बाहेर आले नाही पण याची वार्ता उद्दव ठाकरे यांना समजताच त्यांनी “भाजपने नारायण राणेंना प्रवेश देऊ नये” असे साकडे घालायला सुरूवात केली.त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांची ढाल वापरली. “ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना भाजप पक्षात घेणार नाही” असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं.भाजपवर दबावही आणण्याचा त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला.याचा परिणाम झालेला असावा.काऱण आजच देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे “भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटले नाहीत” असं सांगून हात झटकण्याचा प्रय़त्न केला.उध्दव यांच्या या नाकेबंदीमुळंच आपला प्रवेश ऱखडतो आहे ही गोष्टही राणेंच्या जिव्हारी लागणारी होती.आपल्याकडं आता ऑप्शन राहिलं नाही,त्याबद्दल राज्यात टिंगल सुरू झाली याची बोचही राणे यांना आहे.म्हणूनच ” मर्दाला सगळीकडे मागणी असते” असं सांगून खोटं समाधान मिळवलं आहे.हे सांर उध्दव ठाकरेंमुळंच होतंय या जाणिवनं राणे अस्वस्थ झाले आहेत. त्यातून त्यांनी आपला सारा राग उध्दव ठाकरेंवर काढला.उध्दव ठाकरे आणि भाजपवर टीका करून आगामी निवडणुकीत आपणच महायुतीच्या विरोधात राज्यात रान पेटवू शकतो,त्यासाठी आपली एकेरीवर यायचीही तयारी आहे,राज्यात कॉग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्यात महायुतीला असं आव्हान देण्याची धमक नाही हे दाखवून पक्षश्रेष्टींची मर्जी संपादन करण्याचा प्रय़त्नही राणेंनी उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपामागे असू शकतो.हे सारं दाखवून पक्षात काही मिळवता आलं तर पहावं असा प्रयत्न यामागं असू शकतो.
अत्यंत खालच्या पातळीवरून राणेंनी केलीली टीका नारायण राणेंना अधिकच गाळात घेऊन जाणारी आहे .लोकसभेच्या वेळेस राज ठाकरे यांनी ज्या पध्दतीनं उध्दव ठाकरेंवर टीका केली ती राज्यातील जनतेला आवडलेली नाही.त्याचं ” योग्य ते माप” जनतेनं राज ठाकरेंच्या पदरात टाकलं.यापासून बोध घेत टीका करतााही राणेंनी संयम दाखवायाल हवा होता.पातळी सोडायला नको होती.पण परिस्थिती हातून सुटत चालली आहे हे डोळ्यासमोर दिसत असल्यानं सैरभैर झालेल्या राणेंनी उध्वव ठाकरेंना टिंबटिंब उल्लेख करून नामर्द असल्याचं म्हटलं आहे.हे सारं संयमी,शांत कोकणी जनतेला आवडेल काय ? नक्कीच नाही.याचा उलट परिणाम विधानसभेच्या वेळेस दिसून येणार आहे.कोकणात नारायण राणे आज एकाकी पडले आहेत.राणे विरोधात अन्य सारे अशीच कोकणातली लढाई आहे.या लढाईत आता राणें मोठी कसरत करावी लागणार आहे.त्यामुळंच निवडणुकीपुर्वीच सुरक्षित ठिकाणी जावं असं त्याचं गणित होतं.ते उध्दव ठाकरेंनी उधळून लावलंय.त्याचा राणेंना संताप आहे.तो त्यांनी रत्नागिरीत व्यक्त केला.
आता राणे पुढं काय करणार? अनेक जण अनेक शक्यता व्यक्त करतात.मला मात्र आजही असं वाटतंय की,राणे कॉग्रेस सोडणार नाहीत.मत्रीपदाचा राजीनामा देण्याची भाषा हे त्यांच्या दबावतंत्राचा भाग असू शकतो.असं नसतं तर त्यांनी आज कॉग्रेसवरही टीका केली असती.ते म्हणाले, “मी राजीनामा का देणार हे सोमवारी जाहीर करेल” .तीन दिवसाचा त्यांनी जो स्पेस ठेवला आहे तो पॅचअप कऱण्यासाठीच असावा असं मला वाटतं.याचा अर्थ ते कॉग्रेसमध्ये राहू इच्छितात असं नाही,पण त्यांना काही पर्याय मिळेपर्यत तरी त्यांना कॉग्रेसमधील मुक्काम वाढविण्याशिवाय मार्ग नाही.त्यामुळं दोन दिवस ते कोकणात उध्दव ठाकरेंचा उद्दार करीत फिरणार आणि मुंबईत येऊन थंडोबाच्या भूमिकेत जाणार असं अनुमान काढता येऊ शकेल.कॉग्रसमधील नऊ वर्षात त्यांनी अशी बंडाची भाषा अनेक दा केली आहे.नंतर ते शातही झाले आङेत.त्यांचा स्वभाव एक घाव दोन तुकडे अशा आहे.शिवसेना सोडताना त्यंानी असे वायदे केले नव्हते.कारण त्यांच्यासमोर कॉग्रेसच्या रूपानं एक समर्थ पर्याय होता आणि कॉग्रेसकडून त्यांना आमिषंही दिली गेली होती.आज तशी स्थिती नाही.भाजप त्यांच्यासाठी रेडक ार्पेट टाकून बसलेला नाही.शिवाय राणेंना काय वाटतं ? भाजप राणेंना मुख्यमंत्री करील? नक्कीच नाही. तिथं अगोदरच मोठी रांग आहे.शिवाय काल पक्षात आलेल्यांना भाजप कधीच मुख्यमंत्री कऱणार नाही.त्यांना पक्षात घेतलं तरी त्यांना जेवढा पानउतारा होईल तेवढा करून.पक्षात घेतल्यावर त्यांचा वापर करून त्यांना कॉग्रेस स्टाईल सडविण्याचा प्रयत्न होईल.भाजपमध्ये गेल्यावर राणेंना कळेल की,कॉग्रेस परवडली.भाजपचं एक वेगळं कल्चर आहे.त्या कल्चरमध्ये राणे “आऊट ऑफ प्लेस” ठरणार आहेत.त्यामुळं काहीही केलं तरी राणेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत नाही.हे त्यंानाही उमजलं असावं .या परिस्थितीला बऱ्याच अंशी उध्वव ठाकरे कारणीभूत आहेत असे त्यांना वाटत .त्यामुळ ते ठाकरेवर घसरले आहेत.हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
(एस.एम.देशमुख
हा लेख आपणास माझ्या ब्ला्रगवरून कॉपी करता येईल.कृपया त्यासाठी http://smdeshmukh.blogspot.in/ इथॅं क्लीक करा.लेख छापताना कृपया बातमीदारवरून असा उल्लेख करावा