हिंदवी स्वराज्याची राजधानी,शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार आणि शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या किल्ले रायगडला जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रातील नव्या सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.आज किल्ले रायगडावर 341 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना उपस्थित अनेक शिवप्रेमींनी या मागणीचा आग्रह धरला.
श्री शिवाजी रायगड मंडळ पुणे यांच्यातर्फे या संबंधिचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाकडं पाठविला गेला होता.त्यानंतर राज्य सरकारने तो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे डिसेंबर 2012मध्ये पाठविला.तथापि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून याबाबत अध्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी युनोस्को कडे केंद्रातर्फे प्रस्ताव पाठवावे लागतात.दरवर्षी फेब्रुवारीअखेरपर्यत प्रस्ताव पोहचला पाहिजे.त्यानंतर युनोस्कोची तज्ज्ञ समिती संबंधित वास्तू अथवा स्थळाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करते आणि नंतर त्यासंबंधीचा निर्णय घेतला जातो.रायगडसाठी अद्याप असा प्रस्ताव पाठविला गेलेला नसल्याचे सांगितले जाते.मोदी सरकारने याबाबतचा प्रस्ताव युनोस्कोकडं पाठवावा आणि रायगडला जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शोभना देशमुख