मिलिंद खांडेकर,पूण्यप्रसून वाजपेयी,अभिसार शर्मा पॉवरस्टॅ्रोकचे बळी?

एबीपी न्यूज,एबीपी माझाच्या प्राईम टाइमच्या शो मध्ये गेली काही दिवस व्यत्यय येत होता.हा ‘तांत्रिक घोटाळा’ असावा असं समजून प्रेक्षकांनी त्याकडं दुर्लक्ष केलं.मात्र आता स्पष्ट झालंय की,हा  तांत्रिक घोटाळा नव्हता तर तो एक ‘पॉवर स्टॅ्रोक’ होता.काही दिवस ‘व्यत्यय’चं नाटक सुरू होतं..1 ऑगस्ट रोजी अगोदर मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर यांचा राजीनामा आला.नंतर पूण्यप्रसून वाजपेयींची विकेट पडली.शेवटी अभिसार शर्मा यांना पंधरा दिवस सुट्टीवर जाण्याचं फर्मान सुटलं.तीन महत्वाचे मोहरे गळल्यानंतर एबीपी  टीआरपी कमालीचा लुडकला.मालक अभीक सरकार आणि त्यांचे चिरंजीव अरूप सरकार यांना मात्र टीआरपीची पर्वा नाही.टीआरपी पेक्षा सत्ताधार्‍यांची मर्जी सांभाळणं त्यांना महत्वाचं होतं.ते ‘कर्तव्य’ एबीपी न्यूज पार पाडतंय.

खरं तर एबीपी न्यूज म्हणजे एनडीटीव्ही नाही..’सत्ता फ्रेंडली’ अशीच एबीपी माझाची भूमिका राहिलेली आहे.मात्र पूण्यप्रसून वाजपेयी यांचा मास्टरस्टॅ्रोक हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सरकारी धोरणांचं वस्त्रहरण होऊ लागलं.आरंभीच्या काळात तर एबीपीच्या टिकेकडं दुर्लक्ष केलं गेलं.मात्र जेव्हा एबीपीच्या प्राईम टाइममध्ये थेट पंतप्रधानांनाच टार्गेट केलं गेलं तेव्हा पाणी गळ्यापर्यंत आलं होतं.आपल्या विविध योजनांमुळं छत्तीसगढ येथील एका महिलेचं उत्पन्न दुप्पट कसं झालं याची माहिती पंतप्रधानांनी देशाला सांगितली.पंतप्रधान जे बोलतात ते कितपत सत्य आहे हे तपासून घेण्यासाठी एबीपीची टीम छत्तीसगढला गेली.त्या महिलेला भेटली.त्या महिलेनं स्पष्ट शब्दात सांगितलं की,’अधिकार्‍यांनी जे सांगितलं होतं ते आपण बोललो.प्रत्यक्षात माझी आमदाणी दुप्पट झालेली नाही’.ही स्टोरी वाजपेयींनी मास्टरस्ट्रोकमध्ये अगदी आक्रमकपणे मांडली .. त्यामुळे पंतप्रधानांच्या दाव्यातील फोलपणा जगासमोर आला .हे अती झालं होतं.मग चक्र फिरली.अगोदर मास्टरस्टॅ्रोक कार्यक्रमाच्या वेळेस स्क्रीन पूर्ण काळा दिसू लागला .त्यात सातत्यानं व्यत्यय येत गेला.अनेकांना हा तांत्रिक दोष असावा असं वाटलं.पुडी अशीही सोडली गेली की,यामागं विरोधी चॅनलचा हात आहे.मात्र तीन ज्येष्ठ पत्रकारांच्या राजीनाम्यानं यामागं सत्ताधार्‍यांचं कारस्थान असावं असं बोललं जावू लागलंय.या आरोपाला पुष्ठी देणारी एक बातमी द वायर या वेबसाईटनं दिलीय.संसंदेच्या आवारात काही पत्रकारांशी बोलताना या देशाचे ‘भाग्यविधाते’ अमित शहा यांनी एबीपी न्यूजला धडा शिकविण्याची भाषा केली होती असा वायरचा दावा आहे.हा दावा सत्य यासाठी वाटतोय की,एकाएकी तीन वरिष्ठ पत्रकारांना चॅनलनं बाहेरचा रस्ता दाखविला गेलाय .मिलिंद खांडेकर गेली चौदा वर्षे एबीपी न्यूजशी जोडले गेलेले आहेत.तरीही त्यांना घरी जायला सांगितलं गेलं असेल तर नक्कीच व्यवस्थापनावर वरच्या पातळीवरून दबाव आलेला असला पाहिजे.मालकांना संपादकांपेक्षा नक्कीच सत्ताधार्‍यांची मर्जी सांभाळणे महत्वाचे वाटते..संपादकांचं काय पायलीचे पंधरा मिळतात हा मालकांचा दृष्टीकोण असतो.तो खांडेकर,वाजपेयी प्रकरणातून पुन्हा दिसलाय.

गंमत अशीय की,तीन महत्वाच्या पत्रकारांचे राजीनामे आल्यानंतरही कोणीच काही बोलत नाही.एडिटर्स गिल्ड किंवा पत्रकारांच्या तत्सम संघटना मौनात आहेत.एवढंच कश्याला स्वतः मिलिंद खांडेकर किंवा वाजपेयी देखील काहीच बोलत नाहीत.त्यांनी यासाठी बोलणं आवश्यक आहे की,हा प्रश्‍न आता त्यांचा व्यक्तीगत प्रश्‍न राहिलेला नाही.हा प्रश्‍न देशातील माध्यमांच्या स्वातंत्र्याशी निगडीत झालेला आहे.त्यामुळं नेमकं काय घडलंय हे त्यानी जगासमोर येऊन कथन केलं पाहिजे.आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात तीन न्यायाधीश मिडियासमोर येऊन आपली व्यथा मांडत असतील तर खांडेकर,वाजपेयी गप्प का आहेत ? हा देखील कळीचा प्रश्‍न आहे.मास्टरस्टॅ्रोक बेडरपणे सादर करणारे पूण्यप्रसून वाजपेयी आज कोणाला घाबरत आहेत ? मिडियाच्या संदर्भात ज्या घटना घडत आहेत त्या बघितल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते की,या देशात सुप्त सेन्सॉऱशीप सुरू आहे.आणीबाणीत उघडपणे देशातील माध्यमांचा गळा घोटला गेला होता.आज अत्यंत गुप्तपणे हे  काम होताना दिसत आहे.त्यासाठी मालकांना विकत घेणे,किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचे उद्योग सर्रास सुरू आहेत.अलिकडच्या काही दिवसात देशातील दीड डझन वरिष्ठ पत्रकारांना बळीचा बकरा व्हावा लागले आहे.जे पत्रकार सत्ता फ्रेंन्डली भूमिका घेणार नाहीत त्यांना वेगवेगळ्या पध्दतीनं धडे शिकविले जातात.एनडीटीव्हीचा केला गेलेला छळ आपणास माहितीच आहे.एका वेबसाईटवर शंभर कोटींचा दावा दाखल करून त्या वेबसाईटचाही आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे.हे सारं सहज करता यावं यासाठी देशातील छोटी वर्तमानपत्रे बंद पडतील अशी धोरणं आखली जात आहेत.छोटी वर्तमानपत्रं बंद झाल्यानंतर विशिष्ठ उद्योग समुहांच्या हातात सारा मिडिया देऊन अशा ‘पाळीव मिडिया’कडून हवं ते करवून घेण्याचा प्रयत्न होतो आहे.’मिडियाची ही एकाधिकारशाही’ केवळ माध्यम स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर देशासाठी घातक ठरणार आहे.या विरोधात संघटीत आवाज व्यक्त झाला पाहिजे.कारण काल एनडीटीव्ही,आज एबीपी न्यूजचा नंबर लागला असला तरी इतरांनी आपण सुपात आहोत हे समजून घेतलं पाहिजे.सुपातले जात्यात जायलं वेळ लागत नाही हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here