काम मिळवायचे असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. मीडिया हाऊसेसमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शय्यासोबत केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाहीत..एवढेच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाहीत या आशयाची फेसबुक पोस्ट भाजपाचे नेते एस. व्ही. शेखर यांनी लिहिली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी भर पत्रकार परिषदेत महिला पत्रकाराच्या गालाला हात लावला. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि पुरोहित यांनी त्या महिला पत्रकाराची माफी मागितली.

हे प्रकरण काहीसे शमते न शमते तोच बनवारीलाल पुरोहित यांच्या समर्थनार्थ एस. व्ही. शेखर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. ‘मदुराइ युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अँड द व्हर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल’ या आशयाने व्ही शेखर यांनी ही पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी महिला पत्रकारांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरचे भाष्य केले आहे. तामिळनाडूतील प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे लोक तुच्छ, हीन आणि नीच दर्जाचे आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच काही चांगली माणसे आहेत. त्यांचा मी आदर करतो असेही या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नाही तर तामिळनाडूतील प्रसारमाध्यमे फक्त ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आरोपींच्या हातात आहे असेही यात म्हटले आहे.

दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून गदारोळ माजला आहे. आता शेखर यांचा निषेध करण्यासाठी महिला पत्रकार भाजपा मुख्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. हे सगळे प्रकरण अंगाशी आल्यानंतर शेखर यांनी मला तसे म्हणायचे नव्हते म्हणत आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टचे क्रेडिट शेखर यांनी थिरुमलइ एस नावाच्या व्यक्तीला दिले असून थिरुमलाइ हे अमेरिकेतील भाजपाचे समर्थक आहेत असे त्यांनी सांगितले आहे. थिरुमलाइ यांची पोस्ट मी शेअर केली त्याआधी वाचली नाही अशी सारवासारव त्यांनी आता सुरु केली आहे. मात्र हे सगळे प्रकरण त्यांच्यावरच शेकले आहे. तामिळनाडूच्या पत्रकारांनी शेखर यांच्याविरोधात तक्रारही केली आहे. तसेच नेटकऱ्यांनी या सगळ्या प्रकरणी शेखर यांना ट्रोल करत त्यांच्यावर टीकेचे ताशेरेही झाडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here