केडीएमसीच्या अंदाज पत्रकात ५0 लाख रुपये पत्रकार आपत्कालीन निधीची तरतूद
 
डोंबिवली : पत्रकारांसाठी आनंदाची.आश्‍वासक आणि राज्यभर अनुकरणीय बातमी कल्याण-डोंबिवलीतून आली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेने पत्रकारांसाठी तब्बल 50 लाख रूपयांची तरतूद पत्रकार आपत्कालीन निधी म्हणून केली आहे.या निधीतून आजारी पत्रकारांवर उपचार करण्यासाठी किंवा एखादा पत्रकार अपघातात सापडला तर त्याच्यावरील उपचारासाठी मदत मिळणार आहे..कल्याण डोंबिवली महापालिकेचा हा निर्णय अभिनंदनीय असून मराठी पत्रकार परिषद महापालिकेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना धन्यवाद देत आहे.तसेच पत्रकारांसाठी निधीची तरतूद करावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा कऱणारे कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचेही परिषदेच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.महाराष्ट्रात मुंबई-ठाण्याच्या पाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेने अशी तरतूद केली आहे.राज्यातील अन्य महापालिका तसेच नगरपालिकांनी देखील आपआपल्या क्षेत्रात पत्रकारांसाठी अशा प्रकारची तरतूद करावी आणि त्यासाठी परिषदेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
 
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २०१८ – १९ च्या अंदाज पत्रकात यंदा प्रथमच पत्रकार आपत्कालीन निधी म्हणून रुपये ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .आपले काम करताना त्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते . अनेकदा दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते .कधी अपघातात अपंगत्व येते तर कधी जीवाला मुकावे लागते . आधीच पत्रकारांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असते ,त्यातच अशाप्रकारचे संकट ओढावते , त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांची खूप ओढाताण होत असते .मुंबई व ठाणे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना वा त्यांच्या कुटुंबियांना या संकट काळात मदत करता यावी , म्हणून ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे .
त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने सुद्धा यंदाच्या अंदाज पत्रकात विशेष तरतूद करावी , अशी मागणी कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल दामले,विरोधी पक्षनेता मंदार हळबे, सभागृह नेता राजेश मोरे व पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे एक निवेदन देऊन केली होती . या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत अखेर अंदाज पत्रकात पत्रकार आपत्कालीन निधी या नवीन लेखा शिर्षकाअंतर्गत प्रथमच रुपये ५० लाख तरतूद केली आहे .या निधीचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा, यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे .पत्रकारांसाठी अशा प्रकारे अंदाज पत्रकात तरतूद करून पत्रकारांना दिलासा दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांचे विशेष आभार व्यक्त केले .

1 COMMENT

  1. आपण ज्या बातम्या प्रसिद्ध करून पत्रकार मदत करता त्या बद्दल आपले मना पासून आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here