गेले अनेक दिवस डिएसके प्रकरण सुरू आहे. काही जणांना त्यांच्या विषयी आस्था आहे, काहींना नाही. काहींना डीएसकेंच्या जातीचा मुद्दा महत्वाचा वाटतोय. डिएसकेंना कोर्टानं स्पष्ट शब्दांत खडसावल्यावर अनेकांना आनंद झाला. जवळपास चार हजारांहून अधिक ठेवीदारांनी डिएसकेंविरूद्ध पोलीस तक्रार केली. प्रकरणाने चांगलाच पेट घेतला आहे.
या सगळ्या गदारोळात सिंहगड काॅलेजच्या प्रकरणाकडे कुणाचं फारसं लक्ष गेलेलं दिसत नाही. दोनच दिवसांपूर्वी सिंहगड अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र या काॅलेजेसवर केंद्रशासनाद्वारे प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. दीड वर्षापासून कर्मचाऱ्यांना वेतनच नाही. प्राध्यापक व कर्मचारी वर्ग असहकार आंदोलनात उतरला आहे आणि दुसरीकडे लाखो रूपये फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.
शिक्षकांनी असहकार पुकारणं, आताच्या व्यावहारिक जगात मुळीच गैर नाही. शिक्षकांचा हा त्रागा पगारवाढ किंवा सोयी-सुविधांकरिता नाही, तर थकीत पगार मिळण्याकरिता आहे. शिवाय प्रवेशबंदीमुळे या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या टिकतील की नाही, हाही यक्षप्रश्न उभा राहिला आहे. या शिवाय, अभियांत्रिकीच्या जवळपास चार हजार जागांचा प्रश्न निर्माण झाला आहे.सिंहगड संस्थेच्या एकूण २२ महाविद्यालयांवर ही प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. पुढच्या वर्षीची प्रवेशबंदी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य तर धोक्यात आहेच, शिवाय शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कॅम्पस रिक्रुटमेंटवर सुद्धा परिणाम व्हायला सुरूवात झाली आहे.
पुण्यात मुलाला शिक्षणासाठी ठेवायचं असेल तर साधारणपणे दर महिन्याकाठी खर्च किती येत असेल? आपण एक ढोबळ हिशोब मांडून पाहू –
काॅट बेसिसवर राहणे – किमान ३ हजार ₹
दोन वेळची मेस – किमान ४ हजार ₹
दोन वेळचा चहा व नाष्टा – किमान १५०० ₹
मोबाईल खर्च – किमान ५०० ₹
स्टेशनवरी खर्च – किमान ५०० ₹
रविवारी एकवेळ बाहेर जेवणे – किमान १००० ₹ (महिन्याभरासाठी)
लाॅंड्री खर्च – किमान ८०० ₹
बसचा पास – किमान १८०० ₹
म्हणजे कमीतकमी १३ हजार रूपये दर महिन्याकाठी राहण्याचाच खर्च होतो, काॅलेजची फी आणि क्लासची फी चा खर्च वेगळा. म्हणजे केवळ दैनंदिन खर्चच होतो ४३३₹. गेल्या दीड वर्षापासून पालकांचा हा खर्च सुरू आहे, पण त्यांच्या पदरात काय पडतंय?
याच्या व्यतिरिक्त खाजगी फ्लॅट घेऊन राहणे, अभ्यासिका लावणे, जिम, दोनचाकी किंवा चारचाकी गाडी आणि अर्थातच पेट्रोल/डिझेल, लॅपटाॅप, महागडा मोबाईल फोन, ब्रॅन्डेड कपडे, (झालंच तर गर्लफ्रेंड किंवा बाॅयफ्रेंड ) हे आणखी खर्च असतातच.
ऐपत नसूनही कष्टाने चार पैसे कमावून आपल्या मुलांना शिकवणाऱ्या पालकांचं काय? त्यांच्यापैकी अनेकांनी कर्जं काढली असतील, शेती-वाडी गहाण टाकली असेल, बायकोच्या अंगावरचे दागिने मोडले असतील.. अशा पालकांनी आता काय करायचं? कुणाकडे जायचं? पेट्रोलची भाववाढ झाली म्हणून बातम्या फिरवणाऱ्या मीडियाने कधी पालकांच्या व्यथा, पगार थकलेल्या शिक्षकांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? मीडीयाला यासाठी वेळच नाही. गेले ५५० दिवस हा गोंधळ सुरू आहे. पण, कुणालाही त्याचं गांभीर्यच वाटत नाही. जनतेलाही काहीच वाटत नाही.
पण, इतकं सगळं होऊनही, कन्हैय्याकुमार, मेवाणी, उमर खालिद या तथाकथित युवा नेत्यांचं दीड वर्षांत एवढ्या मोठ्या समस्येकडे लक्ष गेलं नाही. ही टाळकी तर विद्यार्थी नेतृत्व म्हणूनच पुढे आली. आणि त्यातले दोघे तर विद्यमान आमदार आहेत. एल्गार परिषद घ्यायला पुण्यात येतात, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायला येत नाहीत. जितेंद्र आव्हाड फर्ग्युसन काॅलेजच्या प्राचार्यांशी भांडायला पुण्यात आले, पण सिंहगड काॅलेजच्या बाबतीत मात्र गप्प आहेत. मुंबई विद्यापीठाच्या फाटकाला आव्हाडांनी कुलूप लावलं होतं, तसं ते या प्रकरणात का करत नाहीत? कोळसे पाटील तर निवृत्त न्यायमूर्ती आहेत, पण त्यांना विद्यार्थी आणि पालकांचा कळवळा येत नाही? रत्नाकर महाजन मोठे विद्वान, पण त्यांनी या प्रकरणात मौन पाळलंय.
या काॅलेजची पोलखोल प्रसन्न जोशी, निखिल वागळे करत नाहीत. अंजली दमानियांचा तर पत्ताच नाही. विद्या बाळांना हळदी-कुंकू दिसतं, पण विद्यार्थिनींचे अश्रू दिसत नाहीत का?
या प्रकरणात शेकडो दलित विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, पण प्रकाश आंबेडकर काहीच बोलत नाहीत. शेकडो मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, पण संभाजी ब्रिगेड काहीच करत नाही. शेकडो विद्यार्थिनींच्या भवितव्याचा प्रश्न आहे, पण तृप्ती देसाई काहीच करत नाहीत. राज्यात धनंजय मुंडे आणि केंद्रात मल्लिकार्जुन खर्गे हे दोन्ही दिग्गज नेते या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. पवार साहेब तर अत्यंत ज्ञानी आणि जाणतं व्यक्तिमत्व, पण तेही काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जसे हे नेते बोलले, तसे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर यांच्यापैकी कुणी का बोलत नाहीत? प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
या देशात अनेक विषयांवरून रणकंदन माजवलेले हे सगळे जबरदस्त पाॅवरफुल लोक नेमके या प्रकरणी गप्प का आहेत?
याचं कारण जनतेला कळू शकेल का?
(राजेंद्र जोशी यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)