सरकार जनसंपर्क अधिकार्यांची 30 पदं भरणार दरसाल एक कोटी रूपयांचा नवा प्रसिध्दी बोजा
मुंबईः राज्यातील प्रत्येक मंत्र्यांकडं माहिती आणि जनसंपर्क विभागाचा एक अधिकारी कार्यरत असतो.संबंधित विभागाच्या बातम्या,खुलासे व प्रसिध्दी आणि जनसंपर्काची अन्य कामे हा अधिकारी करीत असतो.मात्र हे पूर्णवेळ सरकारी कर्मचारी आहेत.यांच्यावर सरकारचा विश्वास नाही म्हणून असेल किंवा ही सारी मंडळी समर्थपणे आपले काम सांभाळू शकत नाहीत म्हणून असेल पण सरकारनं आता प्रत्येक मंत्र्यांकडं एक जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासंबंधीचा शासकीय आदेश आज सरकारनं निर्गमित केला आहे.त्यानुसार मंत्री अस्थापनेवर 30 जनसंपर्क अधिकारी नेमले जाणार आहेत.या संबंधिच्या जीआरमध्ये म्हटले आहे की,’मर्तमानपत्रे इलेक्टॉनिक मिडिया व विविध प्रसार माध्यमांव्दारे शासकीय योजनांना प्रसिध्दी,प्रसिध्दी माध्यमांकडं खुलासे आदि कारवाईसाठी मंत्री अस्थापनेवर 30 जनसंपर्क अधिकार्यांची नियुक्ती कऱण्यात येणार आहे.त्यांना प्रतीमाह 25000 रूपये मानधन दिले जाणार आहे.मानधनावरची ही काल्पनिकपदे प्रथमतः दोन वर्षांकरीता किंवा मंत्रीमंडळाचा कालावधी संपेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तिथंपर्यंत निर्माण करण्यास सरकारनं मान्यता दिलेली आहे’ जे जनसंपर्क अधिकारी नेमले जाणार आहेत त्यांची निवड प्रक्रिया.शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,अनुभव पात्रता,मंत्री अस्थापनेवर करावयाची कामे याबाबतचा स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याचेही या जीआरमध्ये नमुद कऱण्यात आलं आहे. सरकारी अधिकार्यांवर अविश्वास दाखवत अनेक विभागात बाहेरची मंडळी भरलेली आहे.आता प्रत्येक विभागात जनसंपर्क अधिकारी नेमून सरकार दरसाल किमान एक कोटी रूपये खर्च या अधिकार्यांवर करणार आहे.दरमहा साडे सात लाख रूपये खर्च या जनसंपर्क अधिकार्यांवर होणार आहे. आम्हाला आनंद याचा की,चला 30 पत्रकारांना दोन वर्षासाठी तरी नोकरी मिळणार आहे.मग ते अगदी नागपूरचेच असले तरी हरकत नाही..