निसर्गानं कोकणाला भरभरून दिलं आहे.कोकणात अशी असंख्य ठिकाणं,समुद्र किनारे आहेत की,’नजर नही हटती’ अशी आपली अवस्था होते.डोंगराच्या रांगा,वेडीवाकडी वळणं घेत वाहणार्या नद्या,कौलारू घरांची गावं,हे सारं वेडावून टाकणारं असतं.मी रायगडात असताना निसर्गाच्या सान्निध्यात विसावलेल्या असंख्य गावांना भेटी दिल्या.निसर्ग सोदर्याचा मनमुराद आनंद लुटला.फौजी आंबवडे हे असंच निसर्गाच्या कुशित विसावलेलं एक निसर्गरम्य गाव. गेल्या शंभर वर्षांपासून सैनिकी परंपरा पाळणार्या या गावाबद्दल रायगडात गेल्यापासून मला आकर्षण होतं.त्यामुळं किमान तीन-चार वेळा तिकडं गेलो.एकदा रायगड प्रेस क्लबची बैठकही या गावात घेऊन तेथील प्रश्नांचा धांडोळा घेतला.लेखणीतून हे प्रश्न समाजासमोर मांडले.गावात पाणी नव्हतं.पाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केला.सैनिकाचं गाव अशी ओळख असलेल्या या गावाची सरकारी पातळीवर मात्र कायम उपेक्षा झाली.अजूनही चालूच आहे.याची खंत तेव्हाही वाटायची आजही कायम आहे.
महाडपासून जेमतेम वीस किलो मिटर अंतरावर असलेलं हे गाव.सैनिकी परंपरा सांंगणारं.रायगडच्या पायथ्याशी अशी अनेक गावं आहेत की,ज्यांची परंपरा सैन्याशी निगडीत आहे.मात्र फौजी आंबवडेचा गोष्टच न्यारी.23 वाड्या आणि 12 कोंडांचा समावेश असलेल्या 650 उंबरठ्याच्या या गावची लोकसंख्या चार हजारच्या आसपास आहे.या लोकसंख्येत किमान तीनशे असे माजी सैनिक आहेत की,ज्यांनी सैन्यात अत्यंत दैदीप्यमान कामगिरी बजावलेली आहे.चीन,पाकिस्तान किंवा कारगीलच्या युध्दात प्रत्यक्ष रणभूमीवर लढून देशाचं रक्षण करणारे हे जवान आहेत.जेवढे माजी सैनिक तेवढेच तरूण आज देशाच्या वेगवेगळ्या सिमांवर देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर पहारा देत आहेत.असं सांगितलं जातं की,फौजी आबवडेत असं एकही घर नाही की,ज्या घरचा तरूण लष्करात नाही किंवा नव्हता.घरटी एक तरी तरूण भारतीय लष्करात आहेच आहे.शिवाय ही परंपरा आजची नाही.शंभर वर्षाचा इतिहास आहे या परंपरेला.पहिल्या महायुध्दात फौजी आंबवडेच्या 111 तरूणांनी सहभाग घेऊन विविध आघाड्यांवर लढाई लढली होती.यापैकी सहा जवानांना युध्दात वीरगती देखील प्राप्त झाली होती.ब्रिटिशांनी त्यांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतीस्तंभ आजही गावाताली तरूणांना प्रेरणा देत असतो.भारत -पाकिस्तान युध्दातही गावच्या अनेक सुपुत्रांनी प्रत्येक्ष रणभूमीवर मर्दुमकी गाजवत रायगडचं नाव उज्ज्वल केलं आहे.या युध्दात 22 नोव्हेंबर 1964 रोजी सुभेदार रघुनाथ गणपत पवार शहिद झाले होते.2003 मध्येही लेहमध्ये मनोज रामचंद्र पवार हा जवान शहिद झाला.
सैन्यात भरती होणं हे फौजी आंबवडेच्या प्रत्येक तरूणाचं स्वप्न असतं.’तुला मोठेपणी कोण व्हायचंय’ असा प्रश्न विचारताच आंबवडेचा प्रत्येक मुलगा म्हणतो ‘मला मोठेपणी लष्करात जाऊन देशाची सेवा करायचीय’.म्हणजे देशभक्ती बाळकडू येथील मुलांना लहानपणापासूनच मिळतंय.मात्र अलिकडं एक तक्रार केली जाते.रायगड परिसरातील अनेक तरूण उंचीनं कमी असल्यानं सैन्यात भरती होताना उंचीचा प्रश्न निर्माण होतो.या गावच्या तरूणांची मागणी आहे की,’गावची परंपरा आणि गावानं देशासाठी केलेला त्याग या गोष्टींचा विचार करून या परिसरातील तरूणांना उंचीची अट शिथिल करावी’ .तसेच सैन्य भरती पूर्वशिक्षणाची खास व्यवस्था केली जावी.ते होत नाही.रायगड मिलिटरी स्कूल ही संस्था होती.पण ती आता बंद पडल्यानं सैनिक शिक्षणाची कोणतीच व्यवस्था येथे नाही.त्यादृष्टीनं सुविधा पुरवावी अशी मागणी केली जातेय.फौजी आंबवडेचे जे तरूण शहिद झाले त्यांच्या स्मरणार्थ भव्य शहिद स्मारक येथे बांधावे अशीही ग्रामस्थांची मागणी आहे.पहिलं महायुध्द संपलं या घटनेला पुढील वर्षी शंभर वर्षे होत आहेत.त्यानिमित्त आंबवडेच शासकीय कार्यक्रम व्हावेत अशीही येथील सैनिक मंडळाची मागणी आहे.हे सारं व्हायला पाहिजे पण होत नाही हे दुःखद आहे.
एकीकडं देशाची कोणाला चिंता नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्या देशभक्तांकडं दुर्लक्ष करायचं ही आपली रीत आहे.वरील सर्व प्रश्नांच्या बाबतीत तर सरकार उदासिन आहेच.त्याचबरोबर देशाला गवसणी घालून जेव्हा तरूण सैनिक आपल्या गावी येतात तेव्हा त्यांना पिण्याच्या पाण्यापासून विविध समस्यांशी सामना करावा लागतो.रस्ते धड नाहीत,आरोग्य सेवेचा आनंदी आनंद आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 2008 मध्ये बांधलेला आंबवडे फाटा ते गाव हा रस्ता आज रस्ता राहिलेला नाही.तो पूर्ण फुटला आहे.रस्ताच नसल्यानं दळणवळणाची साधनं नाहीत.हा नन्नाचा पाढा थांबत नाही.रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून रायगडातील पत्रकारांनी हे सारे प्रश्न मांडले होते.मात्र सरकारी उदासिनता येथेही दिसली.सरकारनं या गावाला विशेष दर्जा देऊन,गावाचा विकास करावा अशी रायगड प्रेस क्लबची मागणी आहे.एखादया खासदाराला स्वतःचं गाव नसेल तर त्यानं जरूर फौडी आंबवडे दत्तक घेऊन या गावचा विकास करावा.त्याला आत्मिक समाधान नक्कीच लाभेल.रायगड जिल्हा बॅकेचे माजी संचालक वासुदेव पवार यांनीही माध्यमांशी बोलताना अशीच मागणी केली आहे.माध्यमांनी फौजी आंबवडेच्या प्रश्नाकडं पुन्हा एकदा जनतेचं लक्ष वेधल्यानंतर आता जिल्हाधिकारी या गावाला भेट देत आहेत.त्यांच्या या भेटीनंतर तरी फौजींच्या या गावाचं गेल्या अनेक वर्षाचे प्रश्न सुटावेत आणि राज्याला भूषण ठरेल असा विकास या गावाचा व्हावा एवढीच अपेक्षा ः
एस.एम.देशमुख