टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय क्राईम शो ठरलेल्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा निवेदक सुहैब इलियासी स्वतः गुन्हेगार ठरला. पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली इलियासला दिल्लीतील सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १७ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’द्वारे देशभरातील खतरनाक गुन्हेगारांसाठी सुहैब इलियासी अडचण ठरला होता. त्याच्या या शोमुळे कित्येक गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या घातल्या होत्या. यामुळे प्रेक्षकांसाठी नायक ठरलेला सुहैब स्वतःच्या आयुष्यात मात्र खलनायक ठरला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीची हत्या केल्यानंतर सुसाईड नोट लिहून ती आत्महत्या असल्याचे त्याने भासवले होते. मात्र, कायद्याच्या नजरेतून तो वाचू शकला नाही.
सरकारी वकिलांनी या खटल्यात दोषी ठरलेल्या सुहैब इलायासीच्या फाशीची मागणी केली आहे. सुहैब इलियासीच्या कुटुंबियांनी सांगितले की, सुहैब गुन्ह्यांवर मालिका बनवत होता. यातूनच प्रेरणा घेत त्याने ही घटना घडवून आणली. त्याने हत्येचे प्रकरण आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो.
दरम्यान, ‘मी निरपराध असून वरच्या कोर्टात या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सुहैबने प्रतिक्रिया देताना सांगितले. आता दिल्ली उच्च न्यायालयात मी सर्व पुरावे घेऊन जाईन, तिथे मल्ला नक्की न्याय मिळेल’ असेही तो म्हणाला. ‘माझ्याविरोधात कुठलाच ठोस पुरावा नाही. माझ्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, हे संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य साक्षींवर आधारित आहे. याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. त्यामुळे हे प्रकरण दुर्लभ प्रकरणाच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही.’ असेही त्याने म्हटले आहे.
१९८८मध्ये आपला क्राईम शो सुरु केल्यानंतर सुहैब इलियासी टिव्ही क्षेत्रातील चर्चित चेहरा बनला होता. या शोमुळे सुहैबचे नाव खूपच प्रसिद्ध झाले होते. मात्र, १७ वर्षांपूर्वी घडलेले हत्या प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे स्टारडम लयाला गेले. ११ जानेवारी २००० रोजी सुहैबची पत्नी अंजू इलीयासी हीचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. परिस्थीतजन्य पुराव्यांवरुन ही आत्महत्या असल्याचे वाटत होते. मात्र, सुहैबनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.
लोकसत्तावरून साभार