बरंय माझं आडनाव देशमुख आहे ते..
यात माझा फायदा असा की,
यावरून माझ्या जातीचा,धर्माचा बोध होत नाही..
मुद्दे संपले की,माणसं जाती,धर्माचा आधार घेतात…
अशा वेळी ‘चकवा देणारी’ आडनावं नक्कीच मदतीला येतात…
मी राजकारणात नाही तरीही मला आलेला अनुभव सांगतो..
मध्यंतरी एका शासकीय समितीच्या अध्यक्षपदाची मी निवडणूक लढविली त्याचा प्रचार सुरू असताना मला किमान पंचवीस वर्षे ओळखणारा एक मित्र माझ्याकडं आला आणि हळू आवाजात
म्हणाला,एक विचारू,?
मी ‘हं’ म्हटलं.
त्यावर तो म्हणाला, ‘तुम्ही मुस्लिम आहात काय’?
त्याच्या या अनपेक्षित प्रश्नानं मी गोधळून आणि ओशाळून गेलो.
मी कोणत्या जातीचा,धर्माचा आहे याचा मी लढवत असलेल्या निवडणुकीसी काय संबंध ? हे मला कळत नव्हतं.
मी म्हणाले,का रे बाबा,तू मला पंचवीस वर्षे ओळखतोस हा प्रश्न कधी नाहीस विचारलास मग आजच का ?.
त्यावर त्यानं जे सांगितलं त्यानं मी चक्राऊन गेलो.
तो म्हणाला,तुम्ही मुस्लिम असल्याची चर्चा आहे. तुम्ही बीडचे आहात आणि बीडमध्ये मुस्लिम समजातील एक देशमुख घराणे प्रसिध्द होते.त्या कुटुंबातले तुम्ही आहात असं काहीजण सांगत आहेत.
मी मुस्लिम असलयाचे मतदारांना पटवून देण्यासाठी जो तर्क लावला जात होता तो ही मजेशीर होता.
देशमुख, ‘एस.एम’.असंच नाव का लावतात, ?
त्याचं पहिलं नाव ते कधी का लिहित नाहीत ?
कोणाला तरी त्याचं पहिलं नाव माहिती आहे का ?
त्यामुळं ते बीडच्या प्रसिध्द मुस्लिम देशमुख घराण्यातीलच असले पाहिजेत.असा दावा केला गेला..मी रायगडात होतो..मुस्लिम समाजात तिकडंही देशमुख आहेत.तो देखील संदर्भ दिला गेला…
मला विशिष्ट धर्माचं लेबल जे लावू इच्छित होते त्यांचा उद्देश निकोप नव्हता हे तर उघडच आहे..
देशमुख हिंदुत आहेत तसेच मुस्लिमांत आहेत.
ते मराठयात आहेत,ब्राह्मणात आहेत,वाण्यात आहेत,सीकेपीत आहेत,आणि इतरही काही जातींमध्ये आहेत.
मला या सर्वाशी काही देणं घेणं नसलं तरी ऐन निवडणुकीत माझ्या धर्माबद्दल चर्चा केली गेली.त्यामुळं मी नक्कीच अस्वस्थ झालो.
मी जात धर्म कधी पाळत नाही.त्यामुळं कोण कोणत्या जातीचा,धर्माचा आहे याच्याशीही मला देणंःघेणं नसतं.परंतू काही हितसंबंधी निवडणुकांत हे मुद्दे हटकून उकरून काढतात.
बर्याचदा मतदारांची दिशाभूल करण्याचाच उद्देश त्यामागं असतो..गुजरातमधील निवडणुकांच्या निमित्तानं बुनियादी प्रश्नांपेक्षा कोण हिंदु,कोण मुस्लिम हेच संदर्भहिन मुद्दे चर्चेत आणले जात आहेत.
एका समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते मोठया निवडणुकांपर्यंत जात आणि धर्म हेच कळीचे मुद्दे बनविले जात आहेत..
दुर्दैव्य असे की,यात धर्मनिरपेक्ष विचारांची हारच होताना दिसते आहे…
जशी माझी झाली…
राजकारणातलं हे धर्मकारण पुढील पन्नास वर्षे तरी थांबेल असं वाटत नाही…