रायगडात 242 ग्रामपंचायतीवर नवे कारभारी
रायगड जिल्हयातील 242 ग्रामपंचायतीमधील 2198 जागांसाठी निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केला होता.प्रत्यक्षात यातील 51 ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि 810 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने 191 सरपंच आणि 1280 सदस्य निवडीसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि दुसर्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाले.निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाचे किती सरपंच विजयी झाले हे नक्की सांगता येत नसले तरी शिवसेना 67 जागा जिंकून आघाडीवर राहिल्याचे बोलले जाते.दुसर्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीने 44 जागा जिंकल्या तर कॉग्रेसच्या वाटयाला 32 सरपंच आले.शेतकरी कामगार पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला,या पक्षाच्या वाटयाला फक्त 24 ग्रामपंचायती आल्या तर भाजपने फक्त 9 ठिकाणी आपले सरपंच निवडुन आणण्यात यश मिळविले.निकालानुसार असे दिसते की,विविध राजकीय पक्षांनी आपले बालेकिल्ले सांभाळले आहेत.अलिबागमध्ये सहा पैकी पाच पंचायती जिंकून शेकापनं आपला बालेकिल्ला राखला आहे.रोहा,खालापूरमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले तर महाड,मुरूडमध्ये शिवसेनेने प्राबल्य दाखविले.पनवेल-उरणमध्ये भाजपला यश मिळाले.महाड आणि अन्यत्र काही ठिकाणी कॉग्रेसनं यश संपादन केले.ग्रामीण भागावर कोणाचा प्रभाव आहे हे या निवडणुकांतुन दिसणार असल्याने जिल्हयातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या.निवडणुका अटीतटीच्या वातावरणात पण शांततेत पार पडल्या.–
कोकणाला मेरीटाइमची दिवाळी भेट
सागरी मार्गाने कोकण मुंबईला जोडण्याचे प्रयत्न नव्यानं सुरू झाले आहेत.कोकणाच्या पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिकांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.मुंबईच्या भाऊच्या् धक्क्यापासून उरण किंवा रेवस पर्यंत बोटीची वाहतूक सुरू आहे.तसेच गेट वे ते मांडवा आणि एलिफन्टा अशीही कॅटमरान सेवा सुरू आहे.मात्र आता मेरीटाइम बोर्डाने भाऊचा धक्का ते दिघी आणि दिघी ते दाभोळ या मार्गावर बोटसेवा सुरू केल्यानं कोकणवासियांची मोठीच सोय झाली आहे.लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून म्हणजे 19 ऑक्टोबरपासून मुंबई-दिघी-दाभोळ या मार्गावर बोटसेवा सुरू झाली आहे.मेरीटाइम अॅन्ड इंडस्ट्रियल स्किल ट्रेनिंग इन्स्ट्यूट या कंपनीच्या एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटींना आणि विध्यवासिनी मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या केपीएस या बोटीला प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे.भाऊचा धक्का ते दिघी हे अंतर कापण्यासाठी या बोटींना साडेचार ते पाच तास लागतात.सकाळी 9 वाजता भाऊच्या धक्क्यावरून सुटणारी ही बोट दिघी पोर्ट येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचते तर दिघी पोर्ट येथून 2.30 वाजतानिघणारी बोट रात्री 7.30 वाजता पोहचेल.मुंबई ते दिघी प्रती व्यक्ती 330 आणि मुंबई ते दाभोळ या अंतरासाठी प्रती व्यक्ती 660 रूपये भाडे आकारले जात आहे.या बोट सेवेमुळे रायगड जिल्हयातील मुरूड,श्रीवर्धन,म्हसळा,महाड या दक्षिण रायगडमधील तालुक्याना जाण्यासाठी चांगलीच सोय झाली आहे.ः-
अलिबाग येतंय मुंबईच्या अधिक जवळ
वडखळ ते अलिबाग हा तीस किलो मिटरचा प्रवास म्हणजे स्थानिक आणि पर्यटकांचा अंत पाहणारा.मात्र हे अंतर आता केवळ 12 मिनिटात कापणे शक्य होणार आहे.कारण हा मार्ग आता चौपदरी होत असून त्याची जनसुनावणी देखील नुकतीच पार पडली.प्रांताधिकार्याने या मार्गावरील 24 गावातील लोकांची मतं ऐकून घेतली.जनसुनावणी दरम्यान 305 हरकती आणि 11 निवेदनं आली असली तरी गोंधळपाडा ते चेंढरे असा उड्डाणपूलची मागणी सोडता या मार्गाचे स्वागतच करण्यात आले आहे.1700 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून एक बायपास,एक बोगदा,या मार्गावर होणार असून अत्यंत सुपर मॉडेल डिझाइन केले जाणार आहे. भूसंपादन केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.भूसंपादनासाठी 900 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.हा मार्ग चौपदरी झाल्यानंतर पर्यटकांना अलिबागला जाणे अधिक सोयीचे होणार आहे.या महामार्गामुळं अलिबाग मुंबई आणि पुण्याच्या अधिक जवळ येणार आहे.
कर्जमाफीस पात्र शेतकर्यांचा सन्मान
रायगड जिल्हयातील 30 हजार 250 शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरले आहेत.त्यातील 5 हजार 408 शेतकरी थकबाकीदार आहेत तर 24 हजार 842 शेतकरी मुदतीत कर्जफेड करणारे आहेत.रायगड जिल्हयातील कर्जमाफीस पात्र शेतकरी कुटुंबांचा सत्कार सोहळा नुकताच रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते पार पडला.यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजना हा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय असल्याचं मत व्यक्त केलं.यावेळी जिल्हयातील लोकप्रतनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.या योजनेअंतर्गत लाभ मिळालेले म्हसळा तालुक्यातील खामगाव येथील शेतकरी गणेश शिर्के म्हणाले,शासनाने माझ्या डोक्यावरील आर्थिक भार कमी केला आहे.त्यामुळं मी खूप आनंदी आहे.कर्जमाफीबद्दल सरकारचे आभार.-
शोभना देशमुख